शिवाजी विद्यापीठात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे.
कोल्हापूर, दि. २१ एप्रिल: कृषी क्षेत्राच्या विकासासाठी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे
क्षमतावर्धन अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन
भारतीय रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे
बँक ऑफ इंडिया अध्यासन व गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने
विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये
कोल्हापूर, सांगली व सातारा
जिल्ह्यातील विविध कार्यकारी
सहकारी सोसायटींच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'ग्रामीण विकासात प्राथमिक कृषी
पतसंस्थांची भूमिका' या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण
कार्यक्रमामध्ये श्री. मराठे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू
डॉ. दिगंबर शिर्के उपस्थित होते. प्र-कुलगुरू
डॉ. प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
श्री. मराठे यांनी
आपल्या भाषणात भारतीय विकास संस्थांची अत्यंत सूक्ष्म आकडेवारी मांडली. केंद्र
शासन खेड्यांचा विकास करण्यासाठी विकास संस्थांना भरीव मदत करण्यासाठी करीत
असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यामध्ये आपण अधिक प्रगतीशील होण्याची
आवश्यकताही त्यांनी विविध आकडेवारीसह अधोरेखित केली.
यावेळी विशेष अतिथी
नेहरू मेमोरियल फेलो डॉक्टर परशुराम पाटील, महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभाग
कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. डॉ.
मुरुडकर, एस. बी. जाधव, बिपिन मोहिते व नारायण परजणे या तज्ज्ञांनीही
विविध विषयांवर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानावरून
बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी सहकारी संस्थांच्या सबलीकरणासाठी आणि त्यांना पूरक शैक्षणिक
व संशोधकीय मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ सदैव तत्पर असल्याचे सांगितले. त्यांनी सहकार प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेमागील भूमिका विषद
केली. विविध विद्याशाखांचे शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यापीठ
सर्वोतोपरी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
बँक ऑफ इंडिया अध्यासनाचे
समन्वयक डॉ. राजन पडवळ यांनी स्वागत केले. अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी प्रास्ताविक केले. डॉ. केदार मारूलकर यांनी आभार मानले. या प्रशिक्षणास शाहूवाडी, पन्हाळा व करवीर तालुक्यातील ९० संस्थांमधील १९० सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment