Friday 21 April 2023

विद्यापीठात शिवस्पंदन मॅरेथॉनला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शिक्षकांचाही लक्षणीय सहभाग

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'शिवस्पंदन' क्रीडा महोत्सवांतर्गत मॅरेथॉनला फ्लॅग-ऑफ करून प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. शरद बनसोडे, डॉ. प्रकाश गायकवाड आदी.


कोल्हापूर, दि. २१ एप्रिल: शिवाजी विद्यापीठातील आजची सकाळ उगवली तीच मुळी सळसळत्या चैतन्याचे किरण घेऊन! शिवस्पंदन क्रीडा महोत्सवांतर्गत आज सकाळी ७ वाजता कॅम्पस मॅरेथॉन पार पडली. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने मॅरेथॉन कमालीची यशस्वी ठरली.

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन क्रीडा महोत्सवाअंतर्गत आज (दि. २१) सकाळी ७ वाजता पाच किलोमीटर अंतराच्या कॅम्पस मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. शिवस्पंदन क्रीडा महोत्सवात सहभागी झालेल्यांमधील सुमारे ३५०हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, वनस्पतीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आर.व्ही. गुरव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी फ्लॅग ऑफ करून मॅरेथॉनला प्रारंभ केला. मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या बरोबरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची संख्याही लक्षणीय होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून मॅरेथॉनला प्रारंभ होऊन भूगोल अधिविभाग, विद्यार्थिनी वसतिगृह, पाच बंगला, क्रीडा पॅव्हेलियन, गेट क्रमांक आठ, परीक्षा भवन क्र. १, भाषा भवन, रसायनशास्त्र अधिविभाग ते सिंथेटिक ट्रॅक मैदान असा पाच किलोमीटरचा मार्ग सर्वच सहभागींनी पूर्ण केला. डॉ. सागर डेळेकर, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. कैलास सोनावणे, डॉ. ए.ए. कोळेकर, डॉ. नीलेश तरवाळ आदी शिक्षकांच्या सहभागाने  विद्यार्थ्यांत उत्साह होता. अंतिम रेषेजवळ कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सर्वांचेच अभिनंदन केले.

सर्वाधिक प्राधान्य आरोग्यालाच: कुलगुरू डॉ. शिर्के

मॅरेथॉनच्या यशस्वी सांगता प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सर्वच सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अभिनंदन करताना सांगितले की, आयुष्यात उत्तम शिक्षण आणि करिअर हे प्राधान्याचे विषय असतातच, पण उत्तम आरोग्याखेरीज त्यांची साध्यता मुश्कील होऊन बसते. त्यामुळे सर्वांनीच उत्तम आरोग्यसंपदेला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. आजच्या मॅरेथॉनमुळे विद्यापीठातला पाच किलोमीटरचा उत्तम ट्रॅक सर्वांना माहिती झाला आहे. त्यामुळे येथून पुढे या सरावात सातत्य ठेवून आरोग्य संवर्धन करीत राहावे, असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.

No comments:

Post a Comment