शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहास प्रारंभ
शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटनपर परिसंवादात बोलताना शिवाजीराव देशमुख. |
कोल्हापूर, दि. १० एप्रिल:
कृषीमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारकार्याविषयी सखोल संशोधन व चिंतन
होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक
तथा माजी कृषी व फलोत्पादन सचिव शिवाजीराव देशमुख यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या
वतीने आजपासून फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. सप्ताहाचा उद्घाटन
समारंभ मानव्यशास्त्र सभागृहात आज सकाळी झाला. आज सप्ताहाच्या पहिल्या दिवशी डॉ.
पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘भारतातील शेतीच्या समस्या’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादाचे प्रमुख पाहुणे
म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते,
तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यावर राजर्षी शाहू
महाराजांच्या विचारांचा मोठा पगडा होता. १९१७ साली खामगाव येथे झालेल्या परिषदेत
शाहू महाराजांचे विचार त्यांनी ऐकले होते. त्या विचारांचा मोठा पगडा त्यांच्या
मनावर होता. महाराजांच्या विचारकार्याचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. अमरावतीत
शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्मयातून शैक्षणिक कार्यास प्रारंभ केला. त्याचप्रमाणे
शेतकऱ्यांच्या हिताची काळजी वाहणाऱ्या भारत कृषक समाजाची स्थापनाही केली.
कोल्हापूरच्या भूमीत जसे शाहू महाराजांचे विचार रुजले आहेत, त्या धर्तीवरच
पंजाबराव देशमुखांचे विचार होते. त्यांची रुजवात होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज
आहे. विद्यापीठांनी डॉ. देशमुखांच्या कार्याविषयी सखोल संशोधन करावे, असे आवाहन त्यांनी
केले.
यावेळी शेतीला भेडसावणाऱ्या समकालीन समस्या आणि त्यांचे समाधान या अनुषंगानेही
श्री. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शेती हा अतिव्यापक विषय आहे.
मजुरांची अनुपलब्धता, खते, बियाणे आदींच्या बाबतीत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, न
परवडणारी जिरायती शेती आणि राज्याचा अवर्षणग्रस्त राहणारा ४० टक्के भूभाग या
महाराष्ट्रातील शेतीसमोरील सर्वसाधारण समस्या आहेत. त्यासाठी उपलब्ध पाणी योग्य
प्रकारे साठवून त्याचा नियोजनबद्ध वापर करणे, केवळ शेतीवरील अवलंबित्व कमी करून
शेतीपूरक अथवा अन्य व्यवसायांची त्याला जोड देणे, तरुणांमधील आणि विशेषतः तरुणींमधीलही
शेतीविषयक अनास्था दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आदी बाबी कराव्या लागतील. शेतीला
पर्याय काढल्याखेरीज हे प्रश्न सुटणारे नाहीत. हे प्रश्न केवळ शेतकऱ्यांकडून
सुटणारे नसून त्यांना सोडविण्यासाठी बाह्य तज्ज्ञ व्यवस्थांनीच पुढे यायला हवे,
असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ
यांच्यामुळे समग्र पर्यावरण बदलून गेले आहे. त्याचा शेतीसह मानवाच्या जीवनमानावर
विपरित परिणाम दिसून येतो आहे. त्यामुळे आपल्या सर्वंकष ज्ञानाच्या आधारे शाश्वत
विकास आणि फिरते अर्थकारण (सर्क्युलर इकॉनॉमी) यांचा जास्तीत जास्त वापर करून आपले
पर्यावरण स्वच्छ व शुद्ध राखण्याची जबाबदारी आपणावर आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी
स्वतःचे ज्ञानवर्धन करीत स्वतंत्र विचार करण्याची क्षमता स्वतःमध्ये विकसित करण्यास
प्राधान्य द्यायला हवे. तरच जागतिक समस्या ओळखून त्यावर उपाय योजण्यासाठी आपण सिद्ध
होऊ शकू.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या
कार्याविषयी संशोधन करण्यासाठी विद्यापीठातील विविध अधिविभागांनी एकत्र येऊन स्वरुप
ठरवून त्या अनुषंगाने पुढे जावे. फुले-शाहू-आंबेडकर आणि डॉ. देशमुख या नेत्यांच्या
विचारकार्याचा एकत्रित विचार केला जाणे आवश्यक आहे. तसे झाल्यासच त्यांच्यातील
सर्वंकष सहमतीचे आणि व्यापक सामाजिक न्यायाच्या धोरणाचे स्वरुप आपल्यासमोर उभे
राहील. डॉ. आंबेडकर हे शेतीकडे उद्योग म्हणून पाहण्याची दृष्टी राखून होते. तथापि,
त्यांचे म्हणणे आपण समजून घेतले नाही. पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ
नोकरी असा प्राधान्यक्रम होता. मात्र, काळाच्या ओघात तो आता उलटा का झाला, याचे
चिंतन केल्याखेरीज शेतीसमोरील समस्यांचे आकलन आपल्याला नीटपणे होऊ शकणार नाही. शाहू
महाराजांनी त्यांच्या कार्यातूनच शिक्षण, आर्थिक विकास, सिंचन, ऊर्जा आणि विपणन ही
आत्मोन्नतीची पंचसूत्री देऊन ठेवलेली आहे. सर्वच महामानवांनी मानवासमोरील समस्यांचे
योग्य सूत्रण करून त्यावरील उपायही सुचविले आहेत. आपण त्यांची अंमलबजावणी करून
आवश्यक त्या पाठबळ देणाऱ्या व्यवस्थेची उभारणी कधी करणार, हाच कळीचा मुद्दा आहे.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून
अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रोपट्यास पाणी वाहून सप्ताहाचे उद्घाटन करण्यात
आले. यावेळी मंचावर धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाचे अर्थतज्ज्ञ डॉ. एस.टी.
बागलकोटी, शिवाजी विद्यापीठाचे अर्थतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांबळे, तर उपस्थितांत डॉ.
नितीन माळी, समाजशास्त्रज्ञ डी. श्रीकांत, वसंत लिंगनूरकर, आनंद खामकर आदी होते. डॉ.
आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ.
अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दीपा श्रावस्ती यांनी परिचय करून दिला
व आभार मानले.
पाली भाषा व आरक्षणविषयक अभ्यासक्रमांना मान्यता
विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्राच्या पाली भाषा आणि आरक्षणाचे
संविधानात्मक धोरण या दोन विषयांवरील प्रत्येकी तीन महिन्यांच्या दोन
अभ्यासक्रमांना व्यवस्थापन परिषदेची मान्यता प्राप्त झाल्याची माहिती संचालक डॉ.
श्रीकृष्ण महाजन यांनी यावेळी दिली.
सप्ताहात उद्या विशेष परिसंवाद
सप्ताहात उद्या, मंगळवारी महात्मा जोतीराव फुले
यांच्या जयंतीनिमित्त ‘फुले आंबेडकरांची भारतविषयक संकल्पना’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. परिसंवादात डॉ. भारती पाटील, डॉ. अरूण शिंदे, टेकचंद सोनवणे (पुणे) हे सहभागी होणार आहेत.
No comments:
Post a Comment