Thursday 13 April 2023

शिवाजी विद्यापीठाच्या कणबरकर पुरस्काराने दातृत्वाची परंपरा निर्माण केली: खासदार श्रीनिवास पाटील

भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना पुरस्कार प्रदान

शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना कासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे व प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत.



शिवाजी विद्यापीठात प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान समारंभाच्या प्रमुख पाहुणे पदावरुन बोलताना खासदार श्रीनिवास पाटील. 


शिवाजी विद्यापीठात प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान समारंभात सत्काराला उत्तर देताना भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम.



कोल्हापूर, दि. १३ एप्रिल: शिवाजी विद्यापीठाच्या प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्काराने दातृत्वाची परंपरा निर्माण केली, असे गौरवोद्गार सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार-२०२३ भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांना खासदार पाटील यांच्या हस्ते आज राजर्षी शाहू सभागृहात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

खासदार पाटील यांच्या हस्ते डॉ. शिवाजीराव कदम यांना प्राचार्य कणबरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र, ग्रंथभेट, पुष्पगुच्छ आणि एक लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप होते.

यावेळी खासदार पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासूनचा मी साक्षीदार आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची परंपरा पुढे वाहून नेणारे अनेक पाईक या भूमीमध्ये निर्माण झाले. त्यांच्या समृद्ध विचारांची परंपरा शिवाजी विद्यापीठ पुढे चालवित हीरकमहोत्सव साजरा करीत आहे, याचा अभिमान वाटतो. कणबरकर पुरस्कारप्राप्त बहुतांश मान्यवरांनी आपल्याला मिळालेली पुरस्काराची रक्कम ही पुन्हा जनहितार्थ पुढे दानच केल्याचा इतिहास आहे. शिवाजीराव कदम यांनीही तोच कित्ता गिरवित भाई माधवराव बागल विद्यापीठास देणगी जाहीर केली, ही मोलाची बाब आहे.

खासदार पाटील पुढे म्हणाले, गरीब आईबापाच्या पोटी जन्मलेल्या पतंगराव आणि शिवाजीराव कदम या बंधूंनी स्वतः अथक परिश्रम करीत शिक्षण घेतले आणि प्रगती साधली. मात्र, त्यांनी ही प्रगती स्वतःपुरती न राखता समाजातील अन्य गोरगरीब घटकांतील विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा चंग बांधला. त्यातून भारती विद्यापीठाचा वटवृक्ष निर्माण झाला आणि देशभरात फोफावला. शिवाजीरावांमध्ये विविध समाजघटकांप्रती खूप कणव आणि जिव्हाळा आहे. आज या प्रसंगी पतंगराव असते तर त्यांनी हा सोहळा डोळेभरून पाहिला असता आणि त्यांचे डोळे पाणावले असते. या दोघाही बंधूंच्या कर्तृत्वाचा यथोचित गौरव आज शिवाजी विद्यापीठाने केला, ही समाधान देणारी बाब आहे.

यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले की, बंधू पतंगराव आणि मी दोघेही शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहोत. त्यामुळे विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्याचा केलेला हा गौरव आहे, अशी माझी भावना आहे.  आजचा दिवस जितका भाग्याचा, तितकाच सामाजिक प्रतिष्ठा वाढविणाराही आहे. अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी अत्यंत विनम्रतापूर्वक स्वीकारतो. भारती विद्यापीठातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी हा पुरस्कार अर्पण करतो.

शिवाजी विद्यापीठाने गेल्या साठ वर्षांच्या वाटचालीमध्ये शैक्षणिक, संशोधन आणि प्रसासकीय दृष्टीने अनेक महत्त्वाचे मानदंड निर्माण केले असून ते राज्यातील प्रत्येक विद्यापीठासाठी आदर्शवत् स्वरुपाचे आहेत, अशी भावना डॉ. कदम यांनी व्यक्त केली.

भाई माधवराव बागल विद्यापीठास रु. ५,००,००१/- ची देणगी

यावेळी डॉ. कदम यांनी पुरस्काराच्या १ लाख ५१ हजार रुपयांच्या रकमेमध्ये भर घालून कोल्हापूरच्या भाई माधवराव बागल विद्यापीठास ५ लाख एक रुपयांची देणगी जाहीर केली. बागल विद्यापीठाचे कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी या देणगीचा स्वीकार केला. आपल्या उमद्या स्वभावाला धरूनच आपले हे कृत्य आहे, असे कौतुकोद्गार डॉ. पवार यांनी डॉ. कदम यांच्याविषयी काढले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंच्या नावे असणारा एकमेव आणि सर्वोच्च मानाचा कणबरकर पुरस्कार माजी विद्यार्थ्यास देण्यात येत असल्याचा अभिमान वाटतो. त्यांनी स्वकर्तृत्वाने इथपर्यंत मजल मारली आहे, त्यामुळेच एकमताने त्यांची यासाठी निवड झाली. त्यांच्या कर्तृत्वाचे फलित म्हणून भारती विद्यापीठाचा विद्यार्थी आज या देशाच्या कानाकोपऱ्यात कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत असल्याचे दिसते. कणबरकर पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी या पुरस्काराच्या रकमेमध्ये स्वतःकडील भर घालून त्याचा समाजोपयोगी कार्यासाठी विनियोग केला. यामध्ये डॉ. एन.डी. पाटील, डॉ. डी.वाय. पाटील आणि आता डॉ. शिवाजीराव कदम यांचा समावेश झालेला आहे. 

यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. भालबा विभूते यांनी मानपत्राचे वाचन केले. कणबरकर कुटुंबियांतर्फे डॉ. अरुण कणबरकर यांनी शाल व श्रीफळ देऊन डॉ. कदम यांचा सत्कार केला. नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही.एम. चव्हाण, बी.पी. साबळे, प्राचार्य डॉ. बी.एम. हिर्डेकर, प्राचार्य डॉ. डी.आर. मोरे, डॉ. डी.यु. पवार, प्राचार्य रा.तु. भगत, प्राचार्य प्रकाश कुंभार, डॉ. नमिता खोत, डॉ. अंजली साबळे यांच्यासह कणबर कुटुंबिय, अधिष्ठाता, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, भारती विद्यापीठाचे पदाधिकारी, प्राचार्य व सदस्य, अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment