Friday 14 April 2023

फुले-शाहू-आंबेडकरांकडून भारताला सामूहिक शहाणपणाचा समृद्ध वारसा: डॉ. रमेश कांबळे

 

शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समाजशास्त्रज्ञ डॉ. रमेश कांबळे. मंचावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसटिव डॉ. विलास शिंदे.


कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजाला सामूहिक शहाणपणाचा समृद्ध वारसा दिला आहे. हा वारसा वृद्धिंगत करणे हेच त्यांच्या कार्याचे खरे फलित ठरेल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समाजशास्त्रज्ञ डॉ. रमेश कांबळे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत आज डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सार्वजनिक चिकित्सक अवकाश या विषयावर त्यांचे राजर्षी शाहू सभागृहात व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. रमेश कांबळे म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकर हे समाजातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व आर्थिक समस्यांचा साकल्याने विचार करून त्यांच्या मूलभूत पुनर्रचनेसाठी आग्रही असणारे नेते होते. एकूण समाजाची मानसिक जडणघडण ही मानवी मूल्यांवर होणे त्यांना अभिप्रेत होते. या मूल्यांप्रती समाजात समर्पणशीलता असल्याखेरीज आपल्याला खऱ्या अर्थाने या त्रयीच्या विचारांना साजरे करता येणार नाही. आज समाजात परस्परभेद, विषमता आणि अन्य समाजाच्या दुःखाबद्दलची असंवेदनशीलता मोठ्या प्रमाणात आहे. आपण एक समाज म्हणून जर एकत्र येऊ शकत नसू, तर एक राष्ट्र म्हणून कसे उभे राहू शकू, हा आजघडीचा कळीचा मुद्दा आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार असल्याचे सांगून डॉ. कांबळे पुढे म्हणाले, आधुनिक विचारांच्या पायावर आधुनिक भारताची जडणघडण करण्याची कामगिरी डॉ. आंबेडकर यांनी केली. गेल्या दशकभरात बाबासाहेब परीघावरुन चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आले आहेत, त्याला त्यांची हीच कामगिरी कारणीभूत आहे. बाबासाहेबांकडे दुर्लक्ष करून आपल्याला पुढे जाता येणार नाही. जोपर्यंत इथल्या प्रत्येक व्यक्तीचे अधिकार आणि व्यवस्थेवरील दावा प्रत्यक्षात येत नाही, तसेच संविधानिक नैतिकता आणि संविधानिक मूल्यांची प्रस्थापना होत नाही, तोवर या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही विकसित होऊ शकणार नाही. असमानता, शोषण, अन्याय आणि गुलामगिरी या मुद्द्यांना भिडल्याखेरीज भारत ही संकल्पना पूर्णत्वास जाऊ शकत नाही. त्यासाठी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे, या देशातील राजकीय समानता आणि सामाजिक-आर्थिक असमानता यांमधील दरी कमी केल्याखेरीज खरी लोकशाही अस्तित्वात येणे अशक्य आहे.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, भारताने आता विकसित राष्ट्र होण्यासाठी संघर्ष करण्यास सिद्ध असायला हवे. त्यासाठी शाश्वत विकासाची १७ कलमे साध्य करावयाची असतील आणि गरीबी, विषमता संपुष्टात आणावयाची असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गानेच जावे लागेल. त्यासाठी स्वतःची सामाजिक व सार्वजनिक कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडावीत, असे आवाहन त्यांनी केले.


अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचन व ग्रंथप्रेम या किमान दोन गोष्टी आजच्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्या, तरी त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल. महापुरूषांच्या चरित्रावरुन जितके शिकता येईल, तितके शिकण्याचा प्रयत्न करावा. मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांनी डॉ. आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या अनुषंगाने काही संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेता येतील का, याचा विचार जरुर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. आंबेडकर केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. डॉ. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

वक्तृत्व स्पर्धेत तेजस्विनी पांचाळ, शुभम राऊत प्रथम

यावेळी डॉ. आंबेडकर केंद्राच्या वतीने फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत पदव्युत्तर व पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण कुलगुरू तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.

स्पर्धेचा निकाल अनुक्रमे पुढीलप्रमाणे: पदव्युत्तर गट- तेजस्विनी संजय पांचाळ (डी.आर.के कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर), बन्सी रमेश होवाळे (शिक्षणशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), मोहन मुकुंद कांबळे (विधी अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर).

पदवी स्तर गट- शुभम दशरथ राऊत (डॉ. घाळी महाविद्यालय, गडहिंग्लज), साक्षी सुनील बावडेकर (श्री व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी), विधिरा राजाराम विभूते (विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर). उत्तेजनार्थ- ज्ञानेश्वरी लक्ष्मण सालगर (संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, महागाव), अरविंद शंकर कांबळे (न्यू कॉलेज, कोल्हापूर), जयेश बागूल (डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर).

No comments:

Post a Comment