Tuesday 26 September 2023

सुप्रसिद्ध लॉरेन्स अँड मेयो कंपनीचा शिवाजी विद्यापीठासमवेत सामंजस्य करार

 

लॉरेन्स अँड मेयो कंपनीसमवेत सामंजस्य करार प्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कंपनीचे समूह संचालक (विपणन) डॉ. विवेक मेंडोंसा. सोबत श्रीधर करंदीकर, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. महादेव देशमुख, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. कविता ओझा, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील आदी.


कोल्हापूर, दि. २६ सप्टेंबर: ऑप्टीक्सच्या क्षेत्रातील आघाडीच्या सुप्रसिद्ध लॉरेन्स अँड मेयो प्रा. लि. (मुंबई) या कंपनीसमवेत आज शिवाजी विद्यापीठाने सामंजस्य करार केला. सायबर सिक्युरिटी, ड्रोन तंत्रज्ञान आणि तत्सम आधुनिक डिजीटल ऑप्टीकल तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने सहकार्यवृद्धीसाठी करार करण्यात आला आहे.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य करारावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि कंपनीच्या वतीने समूह संचालक (विपणन) डॉ. विवेक मेंडोंसा यांनी स्वाक्षरी केल्या.

या सामंजस्य कराराचे स्वागत करताना प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले की, लॉरेन्स अँड मेयो ही केवळ कंपनी नसून एक सर्वंकष व्यवस्था म्हणून उदयास आली आहे. ऑप्टीक्सच्या क्षेत्रात अनेक गतिमान बदल होताहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत त्याचे ज्ञान आणि लाभ पोहोचविणे आवश्यक बनले आहे. उद्योगामध्ये सामावण्यास तयार अशी प्रशिक्षित तरुणांची फळी घडविण्याच्या दृष्टीने आवश्यक शिक्षण, प्रशिक्षण व तंत्रज्ञान यांची गरज या सामंजस्य कराराद्वारे पूर्ण होईल. अन्वेषण, नवोन्मेष आणि पूरक सुविधा उभारण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशन या सेक्शन-८ कंपनीने विशेष लक्ष पुरवून या करार यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. विवेक मेंडोंसा यांनी लॉरेन्स अँड मेयो कंपनीच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, गेल्या १४६ वर्षांत कंपनीने भारतासह जगभरात विश्वासार्हता प्राप्त केली आहे. ऑप्टोमेट्रीमधील शिक्षण देशात सुरू करण्यामध्येही कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वैद्यकीय संस्थांसाठी अत्याधुनिक क्रिटीकल व अॅनालिटीकल साधने निर्माण केली आहेत. विविध शैक्षणिक संस्थांसमवेत औद्योगिक प्रशिक्षणाबाबत करार केले आहेत. स्टार्ट-अप सुरू करण्यासाठी कंपनी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देत आली आहे. शिवाजी विद्यापीठासमवेत करारान्वयेही विद्यार्थ्यांना अत्याधुनिक अभ्यासक्रम, विशेष कोर्सेस, नवसाधनांचा परिचय करून देऊन उद्योगास पूरक मनुष्यबळ निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात येईल.

यावेळी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रमास वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, तंत्रज्ञान अधिविभाग प्रमुख डॉ. एस.एन. सपली, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेजिस केंद्राचे समन्वयक डॉ. एस.डी. डेळेकर, संगणकशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. कविता ओझा, डीएसटी, पुणे येथील माजी संचालक श्रीधर करंदीकर, लॉरेन्स अँड मेयो कंपनीचे श्री. पिल्लई, श्री. लिअँडर आणि श्री. गिरीधर आदी उपस्थित होते.

उद्योगकेंद्री विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त करार: कुलगुरू डॉ. शिर्के

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के हे बैठकीच्या निमित्ताने बाहेर असल्याने सदर कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. तथापि, विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा सामंजस्य करार महत्त्वाचा आहे. लॉरेन्स अँड मेयो या कंपनीच्या अनुभवाचा लाभ घेऊन विद्यापीठात उद्योगकेंद्री युवक निर्माण होतील. त्या दृष्टीने विद्यापीठ सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.

Monday 25 September 2023

शिवाजी विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती

 



कोल्हापूर, दि. २५ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय भवनात पंडित उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ. एस.एन. सपली, इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग प्रमुख डॉ. पवन गायकवाड, डॉ. पी.ए. कदम, डॉ. एस.ए. शिंदे, डॉ. एस.एम. मस्के यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Friday 22 September 2023

सहकारी बँकिंगसमोरील समस्या कमी होतील: डॉ. उदय जोशी यांचा आशावाद

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. उदय जोशी. मंचावर (डावीकडून) डॉ. राजन पडवळ, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व वैशाली आवाडे.


कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर: सहकार क्षेत्राने गेल्या काही वर्षांत अनेक चढउतार अनुभवले असले तरी नजीकच्या कालखंडात सहकारी बँकिंग क्षेत्रासमोरील समस्या कमी होतील, असा आशावाद नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज् लिमिटेड तथा नॅफकबचे संचालक डॉ. उदय जोशी यांनी काल येथे व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठाच्या बँक ऑफ इंडिया अध्यासन आणि गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. लक्ष्मणराव इनामदार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सहकारी बँकांची भविष्यातील वाटचाल या विषयावरील विशेष व्याख्यानात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे, संजय परमणे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. उदय जोशी म्हणाले, देशात बँकांच्या वाढीला मोठी संधी आहे. सहकारी बँकांचे देशातील प्रमाण अवघे ३ टक्के आहे. त्यांनाही वाढीची संधी आहे. मात्र, त्यांची सेंद्रिय वाढ झालेली नाही. गेल्या तीनेक वर्षांत आम्ही सहकारी बँकांच्या वतीने धोरण बदलासाठी म्हणून रिझर्व्ह बँकेकडे खूप रदबदली केली आहे. या बँकांवरील नियंत्रण, नियमन प्रणाली अधिक सक्षम करा, पण परवानगी द्या, असा आग्रह धरला. परिणामी, रिझर्व्ह बँकेने आता सहकारी बँकांच्या अनुषंगाने धोरणात्मक लवचिकता स्वीकारली आहे. धोरणांमध्ये बँकेने अनेक सकारात्मक बदल केल्याचे जाणवते आहे. आपण आपले म्हणणे योग्य पद्धतीने मांडल्यास त्याचा परिणाम दिसून येतो. त्यातूनच आज सहकारी बँकिंगसाठी पोषक परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे. नजीकच्या काळात आणखी चांगले बदल दिसतील आणि या क्षेत्रासमोरील समस्या कमी होतील.

अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी सहकार क्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, सहकारी बँकांनी आधुनिकतेची कास धरीत डिजीटल सुविधा उपलब्धतेच्या दिशेने जायला हवे. रिझर्व्ह बँकेच्या या संदर्भातील धोरणांचाही संशोधनात्मक अभ्यास गरजेचा असून या विषयाच्या अनुषंगाने विद्यापीठ स्तरावर सातत्यपूर्ण चर्चा होणे लाभदायी ठरेल.

यावेळी वैशाली आवाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी प्रास्ताविक केले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. राजन पडवळ यांनी आभार मानले.

शिवाजी विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

 






कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठात आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या प्रांगणातील कर्मवीर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. त्याच बरोबर मुख्य प्रशासकीय भवनामध्ये कर्मवीर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. कैलास सोनावणे, अधिसभा सदस्य अॅड. अभिषेक मिठारी, सरलाताई पाटील, भूगोल अधिविभागाचे डॉ. एस.के. पवार, डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. जे.बी. सपकाळे, डॉ. पी.टी. पाटील, डॉ. मीना पोतदार, डॉ. अभिजीत पाटील, सुनिल जाधव यांच्यासह संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

Saturday 16 September 2023

वाढत्या सायबर प्राबल्यामुळे परिवर्तनवादी चळवळींचा अवकाश आक्रसतोय: डॉ. रणधीर शिंदे

 

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेत बोलताना ज्येष्ठ समाक्षक डॉ. रणधीर शिंदे. मंचावर (डावीकडून) पल्लवी कोरगावकर, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. अविनाश भाले. 

शिवाजी विद्यापीठाच्या प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेत बोलताना ज्येष्ठ समाक्षक डॉ. रणधीर शिंदे.


कोल्हापूर, दि. १६ सप्टेंबर: सायबर समाजाच्या वाढत्या प्राबल्यामुळे मानवाचा तसेच परिवर्तनवादी चळवळींचा अवकाश आक्रसतो आहे. त्यातून एकांगी समाजनिर्मितीचा धोका आज महाराष्ट्रासह एकूणच मानवतेसमोर उभा आहे, असे प्रतिपादन मराठी साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्रातील समाजजीवन व परिवर्तन या विषयावर ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक तथा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन होते, तर पल्लवी कोरगावकर प्रमुख उपस्थित होत्या.

डॉ. शिंदे म्हणाले, डिजीटल, संगणकीय व स्मार्टफोनसारख्या संवाद माध्यमांच्या अफाट उपलब्धतेमुळे आजची पिढी सायबर समाज बनली आहे. खऱ्या, खोट्या माहितीच्या सैरभैर करणाऱ्या भोवतालामध्ये समाजाचा अवकाश मर्यादित होत चालला आहे. भास-आभासांच्या दुनियेमध्ये स्वमग्न समाज निर्माण होऊ पाहतो आहे. अनुत्पादक समाज निर्मितीमागे भांडवलदारी षडयंत्र कार्यरत आहे की काय, अशी शंका येण्याइतपत वातावरण गढुळले आहे. मानवाच्या बौद्धिकतेवर संशय व्यक्त व्हावे, इतके कृत्रिम बुद्धिमत्तेकडे आपण वळलो आहोत. यामुळे एकूणच मानवी सर्जनशीलता धोक्यात आली आहे. एकच सूर मोठा होऊ पाहात असताना बहुआवाज मात्र नष्ट होत आहेत. यामुळे एकूणच सामाजिक चळवळींचा अवकाश आक्रसत चालला आहे. परिवर्तनवादास खीळ बसली की त्यातून सामाजिक अनारोग्याचा धोका निर्माण होतो. त्या धोक्याच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत, असे त्यांनी सांगितले.

डॉ. रणधीर शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीचा आपल्या व्याख्यानात साद्यंत वेध घेतला. ते म्हणाले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि संतपरंपरेच्या पुरोगामी विचारसरणीच्या पायावर महाराष्ट्राची उभारणी झाली आहे. महात्मा फुले यांनी मनुवादी व्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस दाखविले, तर बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन करून तेच पुगोमागित्वाचे सूत्र अधिक विस्तृत केले. त्यांचा संपूर्ण लढा हा समतेसाठी, मानवी अधिकारांसाठी होता. सामाजिक, राजकीय स्वातंत्र्यासाठीचा झगडा होता. साठच्या दशकात यशवंतराव चव्हाण यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या पुनर्घटनेत योगदान दिले, तेच मुळी फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्स यांच्या दृष्टीकोनातून विकास करण्याचे स्वप्न बाळगून. भौतिक जीवनात उन्नती साधत असतानाच त्याच्याशी साहित्यिक, सांस्कृतिक मिलाफ आवश्यक आहे, याचे भान त्यांच्या ठायी होते. म्हणूनच तर ते कधी कोयना धरणाची सफर ते कवी, साहित्यिकांना घडवित, तर सांस्कृतिक केंद्र हे महाराष्ट्राचे ऊर्जाकेंद्र व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत.

साठोत्तरी कालखंडात उदयास आलेल्या अनेक सामाजिक चळवळींचा मागोवा घेताना डॉ. शिंदे म्हणाले, साठोत्तरी कालखंडात साठ ते ऐंशीचे दशक आणि ऐंशी ते दोन हजार असे टप्पे येतात. द्वंद्वात्मक समाजाची आवश्यकता अधोरेखित करणारा हा झंझावाती कालखंड होता. याच काळात दलित पँथरसारखी जातशोषणाविरुद्ध बुलंद आवाज घेऊन उभी राहिलेली चळवळ होती, युक्रांद होती. साहित्याच्या क्षेत्रात दलित साहित्य चळवळ, लघु-नियतकालिक चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, स्त्रीवादी चळवळ आणि तेथून पुढे जागतिकीकरणाचा सामाजिक-आर्थिक चळवळींचा अवकाश मर्यादित करणारा कालखंड असे टप्पे आहेत. या चळवळी म्हणजे भाषा-वाङ्मयाच्या परिवर्तनाचे टप्पे आहेत. ध्रुवीकरणातून, असमिताकरणातून साहित्य, वाङ्मयाचा लंबक अधिक विस्तारतो, समाज अधिक गतीशील होतो, त्यामुळे द्वंद्वात्मक चळवळींची समाजाचे प्रवाहीपण टिकविण्यासाठी आवश्यकता असते. मात्र, चळवळींमध्ये एकारलेपण अथवा एकांगीपण येणे मात्र एकूण सामाजिक आरोग्याला हानीकारक असते, याची जाणीव ठेवून सुदृढ समाजनिर्मितीसाठी महाराष्ट्रामध्ये परिवर्तनवादी चळवळींचे महत्त्व सातत्याने अधोरेखित करीत राहणे महत्त्वाचे आहे. मी माणसाचे गीत गात आहे, या कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितेने त्यांनी व्याख्यानाचा समारोप केला.

कोरगावकरांचे दातृत्व आदर्शवत

प्रभाकरपंत कोरगावकर यांनी सत्पात्री दान कसे असावे, याचा आदर्श आपल्या स्वतःच्या उदाहरणातून घालून दिला. पडद्यामागे राहून अत्यंत विरक्त वृत्तीने त्यांनी बाबा आमटे यांच्यापासून माधवराव बागल, आचार्य जावडेकर, आचार्य भागवत, प्र.के. अत्रे, गो.नी. दांडेकर यांच्यापर्यंत अनेकांना मदत केली. काहींना तर वार्षिक स्वरुपात आर्थिक मदत दिली, पण त्याची कोठेही वाच्यता केली नाही. दुष्काळाच्या कालखंडात कोल्हापूरकरांना बार्शीहून ज्वारी आणून वाटली. प्रभाकरपंतांची जोंधळ्याची रांग म्हणून ती प्रसिद्ध झाली. अत्यंत विरक्त वृत्तीने त्यांनी लोकांना मदत केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू भा.शं. भणगे यांच्याशीही त्यांचे मैत्रीचे अनुबंध होते, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. महाजन म्हणाले, समाजाची वाटचाल होत असताना सकारात्मकता व नकारात्मकता यांमधील द्वंद्व आवश्यक असते. विविध दृष्टीकोनांचा परस्परपूरक साकल्याने विचार करून त्याचा सामाजिक विकासासाठी वापर करणे आवश्यक असते. महाराष्ट्राने सातत्याने परिवर्तनवादाला बळ दिलेले आहे. यातूनच त्याचे महाराष्ट्रपण विकसित झालेले आहे. त्याला बाधा येणे कोणालाही परवडणारे नाही. सद्यस्थितीत सामाजिक स्वमग्नतेतून निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड देण्याबरोबरच स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचे अस्तित्व टिकविण्याचेही आव्हान आपल्यासमोर उभे असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरगावकर व्याख्यानमालेअंतर्गत अनेक मान्यवर वक्त्यांची व्याख्याने झाली आहेत. त्या व्याख्यानांचे संपादित ग्रंथरुपात प्रकाशन करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले.

पल्लवी कोरगावकर यांनी प्रभाकर कोरगावकरांनी आपली सर्व संपत्ती ट्रस्टच्या माध्यमातून लोकांच्या सेवेसाठी दिल्याचे सांगितले. प्रभाकरपंत कोरगावकरांच्या दातृत्वाचा वारसा सांभाळण्यासाठी आम्ही सारे कुटुंबिय वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सदर व्याख्यानमालेसाठी आणखी सव्वालाख रुपयांचा निधी लवकरच कुलगुरूंकडे सुपूर्द करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात सुरवातीला डॉ. अविनाश भाले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले. कार्यक्रमास आजीवन अध्ययन विभागाचे डॉ. रामचंद्र पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकाप्पा भोसले, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. औदुंबर सरवदे, डॉ. प्रभंजन माने, भरत शास्त्री यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday 15 September 2023

‘कथक आदिकथक’ माहितीपटाने जिंकली रसिकांची मने

 कथकचा भारतीय शिल्प संस्कृतीमधील उमगस्थानांचा शोध

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'कथक आदिकथक' माहितीपटाच्या विशेष प्रदर्शन प्रसंगी निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती सांगताना लेखक-दिग्दर्शक रेवा रावत. सोबत अनीष फणसळकर आणि नृत्यांगना आभा औटी.

माहितीपट प्रदर्शनास उपस्थित शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आदी



कथक आदिकथक माहितीपटाने जिंकली रसिकांची मने

कथकचा भारतीय शिल्प संस्कृतीमधील उमगस्थानांचा शोध

कोल्हापूर, दि. १५ सप्टेंबर: कथक नृत्यशैलीच्या इतिहासाचा मागोवा घेत अगदी मागे बुद्धकाळापर्यंत जाऊन भारतीय संस्कृतीमध्ये लपलेल्या त्याच्या विविध उमगस्थानांचा शोध मांडणाऱ्या कथक-आदिकथक या सुमारे ९० मिनिटांच्या माहितीपटाने आज जाणकार कोल्हापूरकर रसिकांची मने जिंकली.

अभिजात नृत्यशैलीच्या कुशल नृत्यांगना, संरचनाकार, सक्षम गुरू व व्यासंगी कलासंशोधक असणाऱ्या गुरू रोशन दात्ये यांना पुणे येथील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटची संशोधनवृत्ती प्राप्त झाली. त्याअंतर्गत त्यांनी कथक या नृत्यशैलीविषयी संशोधन करण्याचे ठरविले आणि प्राचीन भारतीय मंदिरे, बौद्ध स्तूप आदी ठिकाणी कोरण्यात आलेल्या नृत्य-नाट्य शिल्पाकृतींचा सुमारे वीस वर्षे अभ्यास केला. यातून कथक नृत्यशैली ही मोगलकालीन नव्हे, तर त्याही आधीपासून इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाच्या आधीपासून अस्तित्वात असल्याचे पुरावे अथक संशोधनांती सामोरे आणले. गुरू रोशन दात्ये यांच्या या संशोधनावर बेतलेला कथक आदि-कथक हा माहितीपट पुण्याची युवा लेखक-दिग्दर्शक रेवा रावत हिने निर्माण केला आहे. या माहितीपटाचे सातवे प्रदर्शन आज शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात कै. ग.गो. जाधव अध्यासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. रेवा रावत यांच्यासह रोशन दात्ये यांच्या शिष्या आभा औटी आणि माहितीपटाचे सिनेमॅटोग्राफर अनिष फणसळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

दात्ये यांचे सुमारे वीस वर्षांचे प्रचंड संशोधन सुमारे ८० तासांच्या चित्रीकरणातून अथक मेहनतीने अवघ्या ९० मिनिटांमध्ये अतिशय कलात्मक व कौशल्यपूर्ण पद्धतीने मांडण्याची कामगिरी या चमूने सदर माहितीपटामध्ये केली आहे. निवडक शिल्पांमधील भावमुद्रा, शारीरभाव यांचा साकल्याने विचार करून त्यामधून कथकच्या विविध शैलींशी त्याचे साधर्म्य पटवून देण्यामध्ये हा माहितीपट निश्चितपणे यशस्वी होतो. महत्त्वाचे म्हणजे कथकचे भारतीय संस्कृती व परंपरेमधील प्राचीनत्व अधोरेखित करण्याची महत्त्वाची कामगिरी हा माहितीपट करतो. तरुण, कामाप्रती अत्यंत गंभीर निष्ठा बाळगणाऱ्या या चमूने दीड तासामध्ये कथकची अतिशय दमदार मांडणी केली आहे. विषयाची फारशी माहिती नसताना सुद्धा या माहितीपटाने प्रदर्शनाला उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले.

प्रदर्शनानंतर रावत, औटी आणि फणसळकर यांनी श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधला आणि त्यांच्या विविध शंकांचे समाधानही केले. यावेळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे डॉ. विनोद ठाकूर-देसाई, निखिल भगत, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख तथा ग.गो. जाधव अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. प्रसाद ठाकूर, डॉ. सुमेधा साळुंखे-घाटगे, डॉ. अनमोल कोठडिया, लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर, वरदराज भोसले, सुभाष नागेशकर, यांच्यासह विविध अधिविभागांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि कोल्हापुरातील कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून अतुल परीट यांनी आभार मानले. मल्हार जोशी यांनी संयोजन केले.


Thursday 14 September 2023

प्रामाणिक कष्ट व सेवेप्रती भक्ती हीच यशाची गुरूकिल्ली: रघुनाथ मेडगे

  

शिवाजी विद्यापीठात मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष रघुनाथ मेडगे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या प्रसंगी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना  (डावीकडून) डॉ. उमेश गडेकर, डॉ. महादेव देशमुख, श्री. मेडगे आणि डॉ. नितीन माळी.


शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष रघुनाथ मेडगे

समोर उपस्थित श्रोते

कोल्हापूर, दि. १४ सप्टेंबर: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक कष्ट आणि मनात सेवेप्रती भक्ती असणे नितांत आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष रघुनाथ मेडगे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटमार्फत आयोजित इंडक्शन प्रोग्रॅममध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख अध्यक्षस्थानी होते. विभागाचे प्रभारी संचालक डॉ. नितीन माळी आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. उमेश गडेकर मंचावर उपस्थित होते.

श्री. मेडगे म्हणाले, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येयनिश्चिती करावी लागते. निर्धारित ध्येय प्राप्तीसाठी  सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. क्षेत्र कोणतेही असो, यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणास कष्ट आणि मनामध्ये सेवेप्रती भक्ती हेच खरे कौशल्य आवश्यक असते. मुंबई डबेवाला संघटनेमध्ये सुमारे पाच हजार सदस्य, ८०० मुकादम आणि ९ संचालक  आहेत. त्यांचे सरासरी माध्यमिक शिक्षण झालेले आहे. संघटना कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान वापरत नाही. तसेच दैनंदिन कार्यात प्रदूषणविरहित साधनांचा वापर केला जातो. मनुष्यबळाचे योग्य नियोजन, कामातील समन्वय आणि सदस्यांचा प्रामाणिक सहभाग यांच्या आधारे दररोज सुमारे चार लाख जेवणाच्या डब्यांची निर्धारित वेळेमध्ये देवाणघेवाण केली जाते. त्यामुळे संघटनेवर विश्वास ठेवणारे ग्राहक पूर्णपणे संतुष्ट व समाधानी आहेत. म्हणूनच मुंबई डबेवाला संघटनेच्या कार्यपद्धतीवर जगभरातील विविध नामवंत संस्थांनी संशोधन केले आहे, तर विविध माध्यमांनी माहितीपट बनविले आहेत. संघटनेला सर्वोच्च अशा ‘सिक्स सिग्मा’ पुरस्काराने गौरविले असल्याचेही श्री. मेडगे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुंबई डबेवाला संघटनेचा इतिहास, कार्यपद्धती व संघटन रचना याबाबत माहिती दिली आणि विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. देशमुख यांनी कौशल्य आणि रोजगाराच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जागतिक क्रमवारीतील भारताचे स्थान, भारत सरकारच्या कौशल्य आधारित योजना आणि नवसंशोधन व नाविन्यता याबाबत सविस्तर मांडणी केली. तत्पूर्वी त्यांनी विद्यापीठाच्या कार्याचा घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी कौशल्ये आणि नवीन शैक्षणिक धोरण याबाबत माहिती दिली.

डॉ. नितीन माळी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गडेकर यांनी आभार मानले. डॉ. तेजश्री मोहरेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील विद्यार्थी, संशोधक, शिक्षकांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कला-संस्कृतीचा वारसा तरुणांनी वृद्धिंगत करावा: कुलगुरू डॉ. शिर्के

विविध युवा महोत्सवांत सहभागी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवात लोकवाद्यवृंद सादरीकरण करणारा शिवाजी विद्यापीठाचा संघ.

युवा महोेत्सवांत सहभागी विद्यार्थ्यांच्या गुणगौैरव समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. प्रकाश गायकवाड, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. तानाजी चौगुले.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. शरद बनसोडे, डॉ. तानाजी चौगुले यांच्यासमवेत विविध युवा महोत्सवांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे यशस्वी प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी.



कोल्हापूर, दि. १४ सप्टेंबर: भारतीय कला, संस्कृतीचा वारसा वृद्धिंगत करणे ही तरुणांची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने युवा पिढीने कार्यरत राहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सन २०२२-२३मध्ये राष्ट्रीय कव्वाली स्पर्धा, इंद्रधनुष्य युवा महोत्सव, पश्चिम विभागीय युवा महोत्सव, राष्ट्रीय युवा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय युवा महोत्सव आदींमध्ये पदकांसह यश प्राप्त केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गौरव समारंभ आज सकाळी राजर्षी शाहू सभागृहात झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विविध युवा महोत्सवांमध्ये आपले वर्चस्व सातत्याने टिकवून ठेवले आहे. प्रचंड आत्मविश्वास आणि उर्जेसह मंचावर सादरीकरण करून आपले विद्यार्थी विद्यापीठाचा लौकिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत उंचावित आले आहेत. त्यांनी आपल्या कला, संस्कृतीचा वारसा असाच वृद्धिंगत करीत राहण्यासाठी प्रयत्नरत राहणे आवश्यक आहे. विद्यापीठात विविध प्रकारच्या वाद्यांच्या सादरीकरणाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस असून त्यासाठी सर्व युवा वर्गाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवावयाची असली तरी आपले लक्ष्य इतके उंच ठेवावे की त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला पाहिजे. अशा संघर्षातून प्राप्त केलेल्या यशाचे मोल फार मोठे असते.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, माणसाला आयुष्य उत्तम जगण्यासाठी जिविका आणि उपजिविका या दोन बाबींची गरज असते. अन्नातून आपली उपजिविका भागते. पण, कलेसारख्या माध्यमातूनच आपली जिविका चालते. आयुष्य सुंदर बनते. त्यामुळे कलेला आपल्या आयुष्यातून कधीही वर्ज्य न करता तिची असोशीने जपणूक करा. चांगले आयुष्य जगल्याचे समाधान ती आपल्याला मिळवून देईल.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. यामध्ये १८व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ सांस्कृतिक इंद्रधनुष्य युवा महोत्सवामध्ये २१ स्पर्धांत सहभागी होऊन ६ सुवर्ण, ४६ रौप्य आणि ३ कांस्य पदके, ३६व्या पश्चिम विभागीय युवा महोत्सवात १० सुवर्ण व १६ कांस्य, ३६व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात ४५ सुवर्ण व १० कांस्य पदके प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसह आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी झालेल्या २३ विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या संघाचा समावेश होता. संघ व्यवस्थापक शीला मोहिते, भाग्यश्री कालेकर, तुकाराम शिंदे, संगीता पाटील, डॉ. एस.ए. महात, सुरेश मोरे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवात सादरीकरण करणाऱ्या संघांनी लोकवाद्यवृंद, नकला आणि राग यमन कल्याणवर आधारित गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. तुकाराम शिंदे यांनी आभार मानले. यावेळी क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले प्रमुख उपस्थित होते.

Wednesday 13 September 2023

घरगुती रसायन निर्मिती कार्यशाळेतून विद्यार्थ्यांत व्यावसायिक दृष्टीकोनाची रुजवात

 रसायनशास्त्र अधिविभागाच्या उपक्रमात १२० विद्यार्थ्यांचा सहभाग

शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागात आयोजित घरगुती रसायने निर्मिती कार्यशाळेअंतर्गत प्रयोगशाळेत रसायने तयार करताना सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनी.



शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागात आयोजित घरगुती रसायने निर्मिती कार्यशाळेअंतर्गत तयार केलेल्या रसायनांसह सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि मार्गदर्शक.


कोल्हापूर, दि. १३ सप्टेंबर: दैनंदिन घरगुती वापरासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या वस्तू वा पदार्थ विकत घ्याव्या लागतात, त्यांची निर्मिती जर आपल्यालाच कमी खर्चात करता आली, तर त्यातून मिळणाऱ्या आनंदाचे मोल करता येणे अशक्यच! नेमकी अशीच अवस्था शिवाजी विद्यापीठातल्या रसायनशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांची झाली जेव्हा त्यांना प्रयोगशाळेमध्ये डिटर्जंट पावडर व साबण, हँडवॉश, फिनाईल यांची निर्मिती करता आली. या निर्मितीमधून या विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण होण्यासही मदत झाली. निमित्त होते ते घरगुती रसायने तयार करण्यासाठी आयोजित एकदिवसीय कार्यशाळेचे!

शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार कक्ष आणि रसायनशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घरगुती रसायने तयार करण्याची एकदिवसीय कार्यशाळा गेल्या शनिवारी (दि. ९) आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत रसायनशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या १२० विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला. राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयातील डॉ. किशोर गायकवाड यांनी घरगुती रसायनांचे उत्पादन कसे करावे, याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर प्रशिक्षण दिले. यामध्ये फ्लोअर क्लिनर्स, द्रव साबण, कपडे धुण्याचा साबण, डिटर्जंट पावडर आदी रसायनांचे उत्पादन करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने घरगुती रसायनांचे उत्पादन केले. या प्रशिक्षण शिबिरातून मिळालेला व्यावसायिक दृष्टीकोनाचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत होता.

कार्यशाळेच्या उदघाटन समारंभात एमबीए अधिविभागाचे संचालक डॉ. आण्णासाहेब गुरव यांनी व्यवसाय सुरू करण्याच्या मूलभूत गोष्टींबद्दल माहिती दिली. व्यवसाय योजना, व्यवसाय वित्तपुरवठा आणि व्यवसाय व्यवस्थापन आदी बाबींच्या अनुषंगाने त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या भागात जनसंपर्क अधिकारी डॉ. लोक जत्राटकर यांनी मूलभूत आणि उपयोजित संशोधन यांचे वेगळेपण आणि महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांत उद्योजकीय दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत झाली असून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा त्यांच्या मनात जागृत झाल्याचे मत रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांनी समारोप प्रसंगी व्यक्त केले.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. गजानन राशीनकर, डॉ राजन पडवळ, प्रमोद समुद्रे, प्रदीप पाटील, क्रांतिवीर मोरे, अर्जुन कोकरे, साजिद मुलाणी यांनी विशेष परिश्रम घेतले.