Friday, 8 September 2023

भारत-जपानमधील सहसंबंध ज्ञानाधारित आवश्यक: डॉ. विनय सहस्रबुद्धे

 शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटन

शिवाजी विद्यापीठात १३ व्या भारत-जपान विज्ञान व तंत्रज्ञान कॉन्क्लेव्हअंतर्गत आंतरराष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान परिषदेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे व जपानचे मुंबईतील कॉन्सूल जनरल डॉ.फुकाहारी यासुकाता. सोबत (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रा. डी. शक्तीकुमार, पद्मश्री डॉ. जी.डी. यादव, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, डॉ. शिवाजी सादळे.

शिवाजी विद्यापीठात १३ व्या भारत-जपान विज्ञान व तंत्रज्ञान कॉन्क्लेव्हअंतर्गत आंतरराष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे. मंचावर (डावीकडून)अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार,प्रा. डी. शक्तीकुमार,पद्मश्री डॉ. जी.डी. यादव, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, जपानचे मुंबईतील कॉन्सूल जनरल डॉ.फुकाहारी यासुकाता, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील,  डॉ. शिवाजी सादळे.

शिवाजी विद्यापीठात १३ व्या भारत-जपान विज्ञान व तंत्रज्ञान कॉन्क्लेव्हअंतर्गत आंतरराष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे. समोर सहभागी संशोधक, विद्यार्थी व मान्यवर.


शिवाजी विद्यापीठात १३ व्या भारत-जपान विज्ञान व तंत्रज्ञान कॉन्क्लेव्हअंतर्गत आंतरराष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलताना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे. (व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. ८ सप्टेंबर: भारत आणि जपान या उभय देशांमधील सहसंबंध हे ज्ञानाधारित असावेत. त्याद्वारे दोन्ही देशांमध्ये प्रगतीच्या अनेकविध संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात आयोजित १३व्या भारत-जपान विज्ञान व तंत्रज्ञान कॉन्क्लेव्हअंतर्गत आंतरराष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान परिषदेचे आज सकाळी डॉ. सहस्रबुद्धे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिगंबर शिर्के होते, तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. जी.डी. यादव, जपानचे मुंबईतील कॉन्सूल जनरल डॉ. फुकाहारी यासुकाता, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. विनय सहस्रबुद्धे म्हणाले, भारत आणि जपान यांच्यामध्ये भगवान बुद्धाच्या काळापासून आध्यात्मिक संबंध प्रस्थापित झाले आहेत. दुसऱ्या महायुद्धोत्तर कालखंडात सन १९५२मध्ये द्विपक्षीय कराराद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित झाले, त्याला यंदा ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हापासून उभय देशांमध्ये केवळ वाणिज्य-व्यापारविषयकच नव्हे, तर सांस्कृतिक आणि ज्ञानाचे बहुस्तरीत संबंधही निर्माण झाले. अगदी जपानच्या ल्युपेक्स या चांद्रयान मोहिमेसाठी जपानी अवकाश संस्थेशी इस्रोने सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. असे ज्ञानसंबंध यापुढील काळात अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने ही परिषद अमूल्य भूमिका बजावेल.

डॉ. सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, पाश्चात्य असणे गैर नाही. मात्र, सर्व पाश्चात्य ते आधुनिक आणि सर्व आधुनिक ते पाश्चात्यच असायला हवे, हा आग्रह गैरलागू आहे. स्वतःची ओळख घेऊन जपान उभा राहिला, म्हणून तो देश जगाच्या पाठीवर स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करू शकला. ही बाब भारतालाही लागू आहे. भारतानेही स्वतःची ओळख घेऊन उभा राहणे आवश्यक आहे. त्यासाठी जपानकडून निश्चितपणे प्रेरणा घ्यावी.

बुद्धाचा ज्ञानसंदेश आत्मसात करा

भगवान बुद्ध हा आपला अत्त दीप भवः अर्थात स्वयंप्रकाशित व्हा, असा संदेश घेऊन जपानसह जगभर पसरला. त्याखेरीज भारत तमसो मा ज्योतिर्गमय हा संदेशही देत आला आहे. हे दोन्ही संदेश ज्ञानाशी निगडित आहेत. शिवाय बुद्धाने संघं सरणं गच्छामि हा आणखीही एक संदेश देऊन ठेवला आहे. समूहशक्तीने विज्ञानाचा, ज्ञानाचा अंगिकार केल्यास प्रगतीच्या वाटा सर्वदूर निर्माण होतात. बुद्धाचा हा ज्ञानसंदेश आत्मसात करण्याचे आवाहनही डॉ. सहस्रबुद्धे यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्तेचे समर्थन एकवेळ ठीक, मात्र कृत्रिम भावनांच्या मात्र फंदात पडू नका. त्यातून असह्य एकटेपणा निर्माण होईल, जो नेहमीच मानवतेच्या प्रगतीला खीळ घालेल, असे आवाहन त्यांनी केले.

जपानचे मुंबईतील कॉन्सूल जनरल डॉ. फुकाहारी यासुकाता म्हणाले, भारत हा आर्थिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्याही जपानचा महत्त्वाचा भागीदार आहे. उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने जपानी कंपन्यांना भारतात मोठा रस असून नजीकच्या कालखंडात भारतात जपानी गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणात येऊ लागेल. आध्यात्मिक संस्कृतीच्या बाबतीतही बुद्धाखेरीज भगवान शिव, सरस्वती, कुबेर आदी देवताही जपानमध्ये अनुक्रमे दायकोकुतेन, बेंझातेन, बिशामोन आदी नावांनी असल्याचे दिसते.

यावेळी जपानमधील भारताचे राजदूत सिबी जॉर्ज, जपान सोसायटी फॉर दि प्रमोशन ऑफ सायन्स (जेएसपीएस) या संस्थेचे अध्यक्ष सुजीनो सुयोशी यांनी ऑनलाईन माध्यमातून परिषदेत सहभाग दर्शवित परिषदेच्या यशस्वितेसाठी आपले संदेश दिले. भारत-जपान यांचे सहसंबंध दृढ होण्याच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने जपानमधील दहाहून अधिक शैक्षणिक संस्था व विद्यापीठांसमवेत सामंजस्य करारान्वये शैक्षणिक व संशोधनपर सहकार्य संबंध प्रस्थापित केलेले आहेत. अनेक संयुक्त संशोधन प्रकल्पांसह शोधनिबंध प्रकाशनाच्या बाबतीतही हे सहकार्य वृद्धिंगत होते आहे. या परिषदेमुळे शिवाजी विद्यापीठ आणि जपान यांच्यामध्ये ज्ञानसंवर्धनाबरोबरच आता आध्यात्मिक व सांस्कृतिक संबंधही अधिक दृढ होण्यास बळ मिळेल. शिवाजी विद्यापीठातही जपानी भाषा व संस्कृती परिचयाच्या दृष्टीने उपक्रम वृद्धी करण्यात येईल. आणि जपानखेरीज आशियातील इतरही अनेक अपरिचित देशांपर्यंत पोहोचण्याचा शिवाजी विद्यापीठाचा या पुढील काळात प्रयत्न राहील, याची ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमात सुरवातीला डॉ. सहस्रबुद्धे आणि डॉ. यासुकाता यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे साडेतीनशेहून अधिक सहभागींच्या शोधनिबंधांचे सार असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर डॉ. शिवाजी सादळे यांनी आभार मानले. यावेळी मंचावर इंडियन जेएसपीएस अल्युम्नाय असोसिएशनचे (आयजेएए) अध्यक्ष प्रा. डी. शक्ती कुमार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार उपस्थित होते.

दिवसभरात चर्चासत्रे, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम

या परिषदेमध्ये उद्घाटन सत्रानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. जी.डी. यादव यांचे दि नेट झिरो गोल अँड सस्टेनॅबिलिटीया विषयावर बीजभाषण झाले. प्रा. हिरोफुमी यामादा यावेळी अध्यक्षस्थानी होते. त्यानंतर दिवसभरात विविध चर्चासत्रांमध्ये प्रा. ओसामु साकाई, प्रा. इंद्रदेव समजदार, प्रा. योशिरो अझुमा,डॉ. जया सीलम, डॉ. सचिनकुमार भालेकर, डॉ. नकुल मैती यांचीही व्याख्याने झाली. जपान सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी एजन्सी (जेएसटी) यांच्याकडून प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सायंकाळी जपानी पाहुण्यांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

उद्या शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम

उद्या (दि. ९) सकाळी ११ वाजता या परिषदेमध्ये कोल्हापुरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष ईग्नाइटिंग माईंड्स ऑफ चिल्ड्रेन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेत सहभागी जपानमधील मान्यवर संशोधक यावेळी शालेय विद्यार्थ्यांशी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने चर्चा करतील व मार्गदर्शन करतील. वनस्पतीशास्त्र विभागाच्या नीलांबरी सभागृहात हा कार्यक्रम होईल.

No comments:

Post a Comment