कृत्रिम बुद्धिमत्तेपासून जैवतंत्रज्ञानापर्यंतच्या शंकांचे आंतरराष्ट्रीय परिषदेत समाधान
शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत 'इग्नाइटिंग माईंड्स ऑफ स्कूल चिल्ड्रेन' उपक्रमात सहभागी विद्यार्थी. |
शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत 'इग्नाइटिंग माईंड्स ऑफ स्कूल चिल्ड्रेन' उपक्रमात सहभागी विद्यार्थी आणि मार्गदर्शक संशोधक. |
शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत 'इग्नाइटिंग माईंड्स ऑफ स्कूल चिल्ड्रेन' उपक्रमात सहभागी विद्यार्थी. |
कोल्हापूर, दि. ९
सप्टेंबर: कृत्रिम
बुद्धिमत्तेमुळे भारतासारख्या देशासमोर बेरोजगारीचे संकट गहिरे होणार नाही का?... मानवी मेंदूला मागे टाकून हे
तंत्रज्ञान पुढे जाईल का?... विज्ञान-तंत्रज्ञानात्मक प्रगती
मानवतेला धोकादायक ठरेल का?...
जैवतंत्रज्ञानाच्या बाबतीत सरकारने कोणती धोरणे स्वीकारणे अभिप्रेत आहेत?... चंद्रावर पूर्णपणे मानवरहित
रोबोटिक प्रयोगशाळा उभारणे शक्य आहे का?...
सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही कधी ना कधी उमटणाऱ्या या आणि अशा अनेक प्रश्नांना
शालेय विद्यार्थ्यांनी वाट मोकळी करून दिली आणि त्या प्रश्नांची अतिशय
शास्त्रशुद्ध आणि उद्बोधक उत्तरे उपस्थित संशोधक, शास्त्रज्ञांनी दिली.
निमित्त होते शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या १३व्या भारत-जपान विज्ञान व तंत्रज्ञान कॉन्क्लेव्हअंतर्गत
आंतरराष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान परिषदेमध्ये आयोजित ‘ईग्नाइटिंग माईंड्स ऑफ स्कूल
चिल्ड्रेन’ या विशेष उपक्रमाचे!
विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांच्या वेळी एरव्ही
उपस्थित शास्त्रज्ञांच्या घनगंभीर
चर्चासत्रांमुळे संशोधनपर चिंतनाचे अधिकच गंभीर वातावरण निर्माण होते. आजची सकाळ
मात्र त्या बाबतीत वेगळी ठरली. वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या नीलांबरी
सभागृहामध्ये कोल्हापुरातील विविध शालेय विद्यार्थ्यांसमवेत आंतरराष्ट्रीय
ख्यातीच्या संशोधकांच्या संवादाचे आयोजन करण्यात आले. तासाभरासाठी आयोजित करण्यात
आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दोन तासांहून अधिक काळ
चालला. एरव्ही गंभीर असणारे संशोधकही या निमित्ताने आपल्या शालेय जीवनातील आठवणींत
रमले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील या सुवर्णकाळाचा आपल्या
भविष्याच्या उन्नतीसाठी पुरेपूर लाभ उठवण्याचे आवाहन केले.
उपस्थित संशोधकांनी विद्यार्थ्यांना एकूणच विज्ञान
तंत्रज्ञानाचे त्यांच्या आयुष्यातील महत्त्व पटवून दिले. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे
प्रचंड विश्लेषण क्षमता आहे. मानवतेच्या हितासाठी त्याचा वापर केला पाहिजे.
विज्ञानातून निर्माण होणारी प्रत्येक बाब दुधारी आहे. तिचा वापर मानवजातीच्या
कल्याणासाठी करावयाचा की विध्वसांसाठी, हे ती वापरणाऱ्या हातांवर अवलंबून राहील.
प्रचंड लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी जैवतंत्रज्ञानाची आधुनिक विज्ञानाचा
अवलंब करण्याखेरीज पर्याय नाही. मानवतेला अहितकारक असणाऱ्या हरितगृह वायू
उत्सर्जन, ग्लोबल वॉर्मिंग, प्रदुषणादी बाबी टाळणे हेही आपल्याच हाती आहे. त्या
दृष्टीने प्रत्येक पिढीने काम करायला हवे. ऐकण्यात, पाहण्यात येणारी प्रत्येक बाब
ही विज्ञानाच्या कसोटीवर पारखून पाहण्याची सवय विद्यार्थ्यांनी लावून घ्यावी.
मोबाईल, टीव्ही आदींवर जाणारा आपला स्क्रीन टाईम कमी करून मैदानी खेळांवर
जाणीवपूर्वक भर द्यावा, जेणे करून शारीरिक व मानसिक आरोग्याच्या समस्या भेडसावणार नाहीत.
तसेच, व्हिडिओंमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याऐवजी दर्जेदार पुस्तके
मुळापासून वाचण्याची सवय अंगी बाणवा, असे आवाहनही या संशोधकांनी विद्यार्थ्यांना
केले.
डॉ. इरी इकेदा यांनी विद्यार्थ्यांनी देशविदेश पाहून
आपल्या ज्ञानात भर घालावी. विज्ञानाच्या साथीने मानव्यशास्त्रांचा अभ्यासही समृद्ध
करणारा ठरतो. त्यामुळे त्यांना कमी लेखू नये, असे सांगितले.
आयआयटी दिल्ली येथे कार्यरत जपानी संशोधक डॉ. इरी
इकेदा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. श्याम नंदी, हैद्राबादच्या
ओस्मानिया विद्यापीठाच्या जैवतंत्रशास्त्रज्ञ डॉ. स्मिता पवार, गोव्याच्या नॅशनल
इन्स्टिट्यूट ऑप ओशनोग्राफीचे डॉ. जयकुमार सीलम, बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे
रसायनशास्त्रज्ञ डॉ. शक्ती शहा आणि इंडियन जेएसपीएस अल्युम्नाय असोसिएशनचे
(आयजेएए) अध्यक्ष प्रा. डी. शक्ती कुमार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि
त्यांच्या शंकांचे समाधान केले.
या उपक्रमात कोल्हापुरातील श्री वसंतराव चौगुले
इंग्लीश मीडियम स्कूल, कोरगावकर हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, वि.स. खांडेकर
प्रशाला, छत्रपती शाहू विद्यालय, सेव्हन्थ डे एडव्हांटिस्ट हायर सेकंडरी स्कूल या
शाळांमधील सुमारे शंभर विद्यार्थी अरुंधती शुक्ला, मालती हरळीकर, सतीश नंदनवार,
शिवप्रसाद चौगुले, प्रमोद कुलकर्णी, क्षितिजा लांबोरे, पद्मा कोरवी आणि शिवाजी
तिवडे आदी शिक्षकांसह उपस्थित राहिले.
वनस्पतीशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजाराम गुरव
यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. मनोज लेखक यांनी संचालन केले, तर डॉ.
स्वरुपा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ.
आशिष देशमुख, डॉ. वर्षा जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर, उपकुलसचिव डॉ.
वैभव ढेरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment