डॉ. विनय सहस्रबुद्धे, डॉ. फुकाहोरी यासुकाता यांच्या उपस्थितीत उद्घाटन
डॉ. विनय सहस्रबुद्धे |
डॉ. फुकाहारी यासुकाता |
कोल्हापूर, दि. ५ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठात
येत्या ७ ते ९ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १३व्या भारत-जपान विज्ञान व तंत्रज्ञान
कॉन्क्लेव्हअंतर्गत आंतरराष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले
आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, मुंबईतील जपानचे
कॉन्सुलेट जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता यांच्यासह कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के,
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ सप्टेंबर रोजी सकाळी
९.३० वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू (सिनेट) सभागृहात परिषदेचे उद्घाटन होईल.
ही माहिती विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय कक्षाचे प्रमुख डॉ. एस.बी. सादळे यांनी
दिली.
डॉ. सादळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीनदिवसीय
आंतरराष्ट्रीय परिषदेत भरगच्च विज्ञान व तंत्रज्ञानविषयक चर्चासत्रांसह सांस्कृतिक
कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. ८ सप्टेंबरला होणाऱ्या उद्घाटन समारंभास भारताचे
जपानमधील राजदूत सिबी जॉर्ज, आयसीटी मुंबईचे इमॅरिटस प्राध्यापक डॉ. जी.डी. यादव, जपान
सोसायटी फॉर दि प्रमोशन ऑफ सायन्स (जेएसपीएस) या संस्थेचे अध्यक्ष सुजीनो सुयोशी
आणि इंडियन जेएसपीएस अल्युम्नाय असोसिएशनचे (आयजेएए) अध्यक्ष प्रा. डी. शक्ती
कुमार उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनानंतर पद्मश्री डॉ. जी.डी. यादव यांचे ‘दि नेट झिरो गोल अँड
सस्टेनॅबिलिटी’ या विषयावर बीजभाषण होईल. प्रा. हिरोफुमी यामादा
अध्यक्षस्थानी असतील. त्यानंतर प्रा. ओसामु साकाई, प्रा. इंद्रदेव समजदार यांचीही
व्याख्याने होतील. यावेळी जपान सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी एजन्सी (जेएसटी) यांच्याकडून
प्रात्यक्षिके सादर केली जातील. दुपारच्या सत्रात निमंत्रितांची व्याख्याने होतील.
सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होतील. दि. ९ सप्टेंबर रोजी प्रा. यामादा, प्रा.
साकाई यांच्यासह प्रा. मुरुकेशन माथम, प्रा. युजी मियाटो, डॉ. श्याम नंदी, डॉ.
सुदीप्ता बर्मन, प्रा. स्मिता पवार, प्रा. इरी इकेडा, डॉ. रुपेश देशमुख आदींची
व्याख्याने होतील. त्याचप्रमाणे टोक्यो युनिव्हर्सिटी, जपान आणि जेएसपीएस बिझनेस,
जपान यांच्या वतीने सादरीकरणे होतील. सायंकाळी सव्वाचार वाजता समारोप समारंभ होईल.
विद्यार्थी व
सर्वसामान्य नागरिकांसाठीही विशेष व्याख्याने
संशोधकांव्यतिरिक्त विज्ञान व तंत्रज्ञानाचा परीघ
सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विस्तारण्यासाठी या आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत
विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठीही विशेष व्याख्यानांचे आयोजन केल्याची
माहिती डॉ. सादळे यांनी दिली. परिषदेच्या पूर्वसंध्येला ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी
५ वाजता प्रा. योशिरो अझुमा यांचे ‘जपानमधील वैज्ञानिक संशोधनाची संस्कृती व शिक्षण: आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन व समकालीन समस्या’ या विषयावर खुले
व्याख्यान होईल. वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात हे व्याख्यान होईल. त्याचप्रमाणे
शनिवारी, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ईग्नाइटिंग माईंड्स ऑफ स्कूल चिल्ड्रेन’ या विषयावर
वनस्पतीशास्त्र विभागाच्या नीलांबरी सभागृहात विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या
कार्यक्रमांचा शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सादळे
यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment