जपानचे मुंबईतील कॉन्सूल जनरल डॉ. फुकाहारी यासुकाता यांच्याशी चर्चा करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत कॉन्सूल श्रीमती हामुरी मेगुमि. |
कोल्हापूर, दि. ७
सप्टेंबर: छत्रपती शिवाजी महाराज
हे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर अखिल भारताचे आराध्यदैवत आहे. त्यांचे
कार्यकर्तृत्व पिढ्यानपिढ्यांना प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या नावे
असलेल्या विद्यापीठात प्रथमच येत असताना होणारा आनंद अवर्णनीय आहे, अशी भावना
मुंबईतील जपानचे कॉन्सूल जनरल डॉ. फुकाहारी यासुकाता यांनी आज येथे व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठात सुरू होत असलेल्या इंडो-जपान आंतरराष्ट्रीय विज्ञान
तंत्रज्ञान परिषदेच्या पूर्वसंध्येला डॉ. यासुकाता यांचे विद्यापीठात आगमन झाले. त्यांनी
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते. डॉ. यासुकाता यांच्यासमवेत
डॉ. यासुकाता म्हणाले, मी महाराष्ट्रासह दिल्ली येथेही वास्तव्य केले आहे. तेथेही
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रचंड आदर दिसून येतो. महाराष्ट्रभूमी तर आजही
त्यांची ऋणी आहे. त्यामुळे येथे विविध स्मारकांना व वास्तूंना त्यांचे नाव
दिल्याचे दिसते. शिवाजी विद्यापीठासारखी शैक्षणिक संस्थाही महाराजांच्या नावे उभी
आहे, याचाही अभिमान वाटतो. महाराजांचा विद्यापीठाच्या प्रांगणातील भव्य पुतळा
पाहून प्रचंड प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले.
भारत आणि जपान या दोन्ही राष्ट्रांमध्ये अनेक प्रकारची साम्यस्थळे असल्याचे
सांगून डॉ. यासुकाता म्हणाले, दोन्ही देशांमध्ये प्राचीन काळापासून विविध प्रकारचे
सहसंबंध राहिले आहेत. दोन्ही शांतिप्रिय देश असून मानवतेच्या उदात्त कल्याणासाठी
झटणारे आहेत. मानवतेचा विचार येथे सर्वोच्च स्थानी आहे. दोन्ही देशांना
परस्परांच्या संस्कृतीविषयी जाणून घेण्याची ओढ आहे. त्यामुळेच या देशांत भाषिक, शैक्षणिक,
सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच तंत्रज्ञानात्मक बंध सातत्याने अधिकाधिक विकसित होत
असल्याचे दिसते.
यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागात जपानी
भाषा शिकण्याकडे कोल्हापूर परिसरातील विद्यार्थी, उद्योजक व व्यावसायिकांचा कल
वाढत असल्याचे सांगितले. जपानशी स्थानिक नागरिकांचे संबंध दृढ होत असल्याचे हे
निदर्शक आहे. जपानमधील विविध विद्यापीठांशी शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार
असून अनेक शिक्षक, विद्यार्थी तेथील
विद्यापीठांमध्ये शिकत वा शिकवत असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वतः प्र-कुलगुरू
डॉ. पाटील आणि डॉ. सादळे हे जपानी विद्यापीठांशी शैक्षणिक संबंध राखून असल्याचेही
त्यांनी सांगितले. भविष्यात शिवाजी विद्यापीठाचे जपानशी असणारे बंध अधिक वृद्धिंगत
करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी कॉन्सूल जनरल डॉ. यासुकाता यांना डॉ. बाळकृष्ण
लिखित ‘शिवाजी दि ग्रेट’ हा ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास
शिंदे, परिषद समन्वयक डॉ. एस. बी. सादळे, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment