Wednesday 31 March 2021

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात उगवला सुवर्णदिन

३.५२ सीजीपीए गुणांकनासह ‘नॅक’चे ‘अ++’ मानांकन

शिवाजी विद्यापीठास 'नॅक'चे 'अ++' मानांकन जाहीर झाल्यानंतर कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मनोभावे अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, प्रा. आर.के. कामत, प्रा. एम.एस. देशमुख, प्राचार्य क्रांतीकुमार पाटील, प्राचार्य डी.जी. कणसे, प्राचार्य व्ही.एम. पाटील, प्राचार्य मंगलकुमार पाटील, प्रा. व्ही.एस. मन्ने आदी.


कोल्हापूर, दि. ३१ मार्च: ‘नॅक (बंगळुरू)च्या चौथ्या पुनर्मूल्यांकनामध्ये येथील शिवाजी विद्यापीठाने ३.५२ सीजीपीए गुणांकनासह ++’ मानांकन प्राप्त करून सुवर्णाक्षरांत नोंदवावी, अशी कामगिरी केली आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅकच्या चौथ्या पुनर्मूल्यांकन फेरीअंतर्गत नॅक पिअर टीमने १५ ते १७ मार्च २०२१ या कालावधीत शिवाजी विद्यापीठास भेट दिली. नॅकच्या बदललेल्या नव्या निकषांतर्गत गुणांकन करण्यात आलेले शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील दुसरे विद्यापीठ आहे. यामध्ये विद्यापीठाने नॅकला सादर केलेल्या स्वयं मूल्यनिर्धारण अहवालाचे (एसएसआर) सात निकषांवर सुमारे ७०० गुणांचे मूल्यांकन केले जाते. उर्वरित ३०० गुणांचे मूल्यांकन पिअर टीममार्फत करण्यात येते. सात निकषांमध्ये अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन प्रणाली, संशोधन, नवनिर्मिती व विस्तार, पायाभूत सुविधा व अध्ययन स्रोत, विद्यार्थी सहाय्यता व प्रगती, प्रशासन, नेतृत्व व व्यवस्थापन आणि संस्थात्मक मूल्ये व उत्तम व वेगळे उपक्रम यांचा समावेश असतो. यामध्ये अभ्यासक्रम, विद्यार्थी सहाय्यता व प्रगती आणि उत्तम उपक्रम यामध्ये शिवाजी विद्यापीठाने चमकदार कामगिरी केली आहे. प्रशासनाच्या संदर्भात तर शिवाजी विद्यापीठाची एक स्वतःची अशी परंपरा आहे. प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवारांपासून सर्वच कुलगुरूंनी त्याकामी योगदान दिलेले आहे. विशेषतः डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या काळात नॅक सुरू झाले, तेव्हा त्यांनी या अनुषंगाने उपयुक्त अशी पायाभरणी करण्याचे काम केले. त्यामुळे अवघ्या चारच फेऱ्यांत शिवाजी विद्यापीठाने पासून ते ++’पर्यंतचा प्रवास केला आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही निकषांवर विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विशेषतः नॅक पिअर टीमने त्यांच्या एक्झिट मिटींगमध्ये शिवाजी विद्यापीठामधील एकजुटीने आणि एकदिलाने काम करण्याच्या प्रवृत्तीचे खुल्या मनाने कौतुक केले, असे त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, नॅकचे अ++ मानांकन प्राप्त झाल्यामुळे आपले संशोधक, विद्यार्थी, शिक्षक यांना अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होणार आहेत. संलग्नित महाविद्यालयांना सुद्धा त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे विद्यापीठ परिक्षेत्रातच नव्हे, तर देशभरातील विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. काम करणाऱ्या सर्वांमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे. मिळालेले यश टिकविणे आणि वृद्धिंगत करणे ही आता आमची जबाबदारी आहे, याची जाणीव आम्हाला आहे. विद्यापीठाच्या या यशामध्ये आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, सर्व अधिकार मंडळांचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी व सेवक, संलग्नित महाविद्यालये, विद्यापीठावर प्रेम करणारे समाजातील सर्व स्तरांतील घटक या सर्वांचा बहुमोल स्वरुपाचा वाटा आहे. यापुढील काळातही सर्वांकडून असेच सहकार्य लाभत राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, आयक्यूएसीचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख उपस्थित होते. प्रा. आर.के. कामत यांनी नॅकच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी आभार मानले.

नॅकची बातमी कळताच महाराजांना अभिवादन

आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिवाजी विद्यापीठास नॅकचे अ++ मानांकन मिळाल्याची वार्ता समजताच कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले आणि कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विविध बैठकांच्या निमित्ताने विद्यापीठात आलेले व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभेचे सदस्य, प्राचार्य आणि शिक्षक यांनीही तेथे कुलगुरू डॉ. शिर्के यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. विविध अधिविभागांचे प्रमुख व शिक्षकांनीही कुलगुरूंसह सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. कुलगुरूंनी त्यानंतर मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रत्येक विभागात जाऊन नॅकसाठी परिश्रम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले. सायंकाळच्या सत्रात काही अधिविभागांनाही त्यांनी भेटी देऊन शिक्षकांचे अभिनंदन केले.

कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेटी टाळण्याचे आवाहन

शिवाजी विद्यापीठास प्राप्त नॅकच्या उच्च मानांकनामुळे सर्वच घटकांना आनंद होणे स्वाभाविक आहे. तथापि, सध्या महाराष्ट्रासह देशात कोविड-१९ची लाट पुन्हा उसळते आहे. या पार्श्वभूमीवर, मान्यवरांनी तसेच नागरिकांनी दूरध्वनी, ई-मेलद्वारे अभिनंदन करावे. प्रत्यक्ष भेटूनच अभिनंदन करण्याची जोखीम टाळावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी केले आहे.


Thursday 25 March 2021

राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची शिवाजी विद्यापीठास सदिच्छा भेट

 

राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचा सत्कार करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. ए.डी. जाधव, डॉ. व्ही.एस. मन्ने आदी.

कोल्हापूर, दि. २५ मार्च: राहुरी (अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नूतन कुलगु्रु डॉ.प्रशांतकुमार पाटील यांनी काल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांची सदिच्छा भेट घेतली.

कुलगुरू डॉ.पाटील मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद येथील आहेत. यापूर्वी ते भारतीय कृषी अनुसंधान परिषद येथे संचालक म्हणून कार्यरत होते. कृषी विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या दरम्यान विविध विषयांच्या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यास मोठी संधी असल्याचे कुलगुरू डॉ. पाटील यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभाग, रेशीमशास्त्र, जैविक कीड नियंत्रण तसेच विविध कृषी पीक किडींचा बंदोबस्त, मत्स्य विज्ञान आणि वनस्पतीशास्त्रामध्ये विविध जाती, पिके, औषधी वनस्पती, सुगंधी तेल, केळी, टिश्यू कल्चर इत्यादी बाबत संशोधन व सहकार्यास मोठा वाव आहे.  तसेच, जैवतंत्रज्ञान, ॲग्रोकेमिकल, पेस्ट मॅनेजमेंट, फूड व नॅनो सायन्समध्ये देखील संशोधन सहकार्य करता येईल.

यावेळी प्र-कुलगुरु डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकरवित्त  लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. व्ही. एस मन्ने, सेंटर ऑफ एक्सलन्स ॲन्ड इनक्युबेशनचे समन्वयक डॉ. ए. डी. जाधव आदी उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी डॉ. पाटील यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह  ग्रंथभेट देऊन सत्कार केला.

Wednesday 24 March 2021

विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन पृथक्करण सुविधांचा संशोधकांनी लाभ घ्यावा: डॉ. राजेंद्र सोनकवडे

 

शिवाजी विद्यापीठाच्या सामान्य सुविधा केंद्रातील अत्याधुनिक संशोधन पृथक्करण सामग्री

शिवाजी विद्यापीठाच्या सामान्य सुविधा केंद्रातील अत्याधुनिक संशोधन पृथक्करण सामग्री

शिवाजी विद्यापीठाच्या सामान्य सुविधा केंद्रातील अत्याधुनिक संशोधन पृथक्करण सामग्री

शिवाजी विद्यापीठाच्या सामान्य सुविधा केंद्रातील अत्याधुनिक संशोधन पृथक्करण सामग्री


कोल्हापूर, दि. २४ मार्च: शिवाजी विद्यापीठाच्या सामान्य सुविधा केंद्रामध्ये अत्याधुनिक संशोधन पृथक्करण उपकरणांची वापराची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संशोधकांसह विविध उद्योग-व्यवसायांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ विज्ञान उपकरण केंद्र व सामान्य सुविधा केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी केले आहे.

Dr. R.G. Sonkavade
डॉ. सोनकवडे यांनी म्हटले आहे की, शिवाजी विद्यापीठात विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्याद्वारे १९७९ साली 'विद्यापीठ विज्ञान उपकरण केंद्राची (USIC) उभारणी करण्यात आली. या केंद्रांतर्गतच १९८४ साली 'सामान्य सुविधा केंद्राची' (सी.एफ.सी.- कॉमन फॅसिलिटी सेंटर) सुरुवात करण्यात आली. संशोधन क्षेत्रातील विविध पदार्थांच्या नमुन्यांच्या पृथक्‍करणाची सुविधा अत्यंत अल्पदरात सर्वांना उपलब्ध करून देणे, विद्यापीठांतर्गत तसेच बहिर्विद्यापीठीय अधिविभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांतील संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, तांत्रिक अधिकारीवृंद यांच्यासाठी कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम यांची अंमलबजावणी करणे हा उद्देश 'सामान्य सुविधा केंद्र' सुरू करण्यामागे होता. केंद्राची सुरवात अवघ्या चार उपकरणांपासून झाली. आज या केंद्रात अत्याधुनिक, अद्ययावत अशी एकूण १३ उपकरणे आहेत.

या केंद्रात फॉरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्र्टोफोटोमीटर (एफटीआयआर), गॅस क्रोमॅटोग्राफी- मास स्पेक्ट्रोमीटर (जीसीएमएस), थर्मल ग्रॅव्हीमॅट्रीक- डिफरन्शियल थर्मल एनालिसीस- डिफरन्शियल स्कॅनिंग कॉलॉरीमीटर (टीजी-डीटीए-डीएससी), इंडक्टीव्हली कपल्ड प्लाझ्मा ऑप्टीकल एमिशन स्पेक्र्टोस्कोप, मायक्रोवेव्ह डायजेस्टीव्ह सिस्टीम, आणि पार्टीकल साइझ एनालायझर विथ झेटा पोटॅन्शियल ही वैज्ञानिक उपकरणे उपलब्ध आहेत. अलिकडेच यांमध्ये अत्यंत अत्याधुनिक अशा एक्स-रे डिफ्रॅक्टोमीटर (एक्सआरडी एडव्हान्स्ड डी-८), व्हेक्टर नेटवर्क अनालायझर (व्हीएनए), अल्ट्रा सेंट्रिफ्युज, बायो-एटॉमिक फोर्स मायक्रोस्कोप (बायो-एएफएम) आणि मायक्रो-रामन स्पेक्र्टोमीटर या उपकरणांची भर पडली आहे. याचबरोबर वैज्ञानिक विश्लेषणासाठी अत्यावश्यक मात्र सर्वांना सहजासहजी उपलब्ध होऊ न शकणारी एक्स-रे फोटोइलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोप (एक्सपीएस) आणि ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (टीईएम) ही उपकरणेही या केंद्रात उपलब्ध आहेत.

विद्यापीठातील गुणवंत संशोधक विद्यार्थ्यांना सुद्धा येथील उपकरणांच्या हाताळणीचे पूर्वप्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांच्यावरही देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्याचा उपक्रम प्रगतीपथावर आहे. येथे उपलब्ध असणारी वैशिष्ट्यपूर्ण उपकरणे संशोधक विद्यार्थ्यांसह उद्योग, कारखानदारी, तंत्रज्ञान क्षेत्रांसाठी सुद्धा उपयुक्त आहेत. कुशल व मेहनती मनुष्यबळामुळे परीक्षणासाठी पाठवलेल्या पदार्थांच्या नमुन्यांचे पृथक्करण जास्तीत जास्त अचूक व विश्वसनीयरित्या प्राप्त होऊ शकते. प्रयोगशाळा उपकरणांची स्वच्छता व गुणवत्ता याबाबतही केंद्र सजग आहे.

 

परीक्षणासाठी ऑनलाईन बुकिंगचीही सुविधा करणार

संशोधनांतर्गत विविध पदार्थांच्या नमुन्यांचे पृथक्करण अत्यंत जलद व अल्प दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सामान्य सुविधा केंद्रात पृथक्करणासाठी ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील केंद्राच्या पृष्ठावरच ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल. देय रक्कम  केंद्राला प्राप्त झाल्यानंतर ऑनलाईन बुकिंगचा संदेश संबंधितास त्यांच्या मोबाईलवर प्राप्त होईल, अशी माहितीही डॉ. सोनकवडे यांनी दिली.

 

व्यवसायदूतांच्या नियुक्तीमुळे स्थानिक रोजगाराभिमुखतेला बळ: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

बिझनेस कॉरस्पाँडंट मॉडेल अँड इट्स रोल इन बँकिंग सेक्टर’ या प्रासंगिक शोधनिबंध पुस्तिकेचे प्रकाशन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. के.व्ही. मारुलकर, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, डॉ. एस.एस. महाजन, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि डॉ. ए.एम. गुरव.


डॉ. एस.एस. महाजन यांच्या प्रासंगिक शोधनिबंध पुस्तिकेचे प्रकाशन

कोल्हापूर, दि. २४ मार्च: व्यवसायदूतांच्या (बिझनेस कॉरस्पाँडंट) नियुक्तीमुळे बँकांच्या व्यवसायाभिमुखतेबरोबरच स्थानिक रोजगाराभिमुखतेला बळ लाभले आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता तसेच दि युनायटेड वेस्टर्न बँकेच्या रा.ना. गोडबोले अध्यासनाचे प्रमुख डॉ. एस.एस. महाजन यांनी लिहीलेल्या बिझनेस कॉरस्पाँडंट मॉडेल अँड इट्स रोल इन बँकिंग सेक्टरया प्रासंगिक शोधनिबंधाच्या पुस्तिकेचे प्रकाशन आज कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. ए.एम. गुरव उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, बँकांनी गतिमान स्पर्धेला तोंड देण्याच्या दृष्टीने तसेच व्यवसाय विस्तारासाठी विविध उपाय योजले. त्यामध्ये बिझनेस कॉरस्पाँडंट्सची नियुक्ती हा एक महत्त्वाचा ठरला. या व्यवसायदूतांमुळे बँकांना थेट कर्मचारी न नेमता सुद्धा आपल्या व्यवसायाचा पाया ग्रामीण भागापर्यंत विस्तारता येऊ शकला. आज विविध बँकांचे मिळून एकूण ५ लाख ४१ हजारांहून अधिक व्यवसायदूत कार्यरत असल्याची आकडेवारी लक्षात घेतली असता या मॉडेलचा बँकांना लाभ झाला, हे तर खरेच आहे. मात्र, त्याचबरोबर बँकांच्या कक्षेत येऊ न शकणारे ग्राहकही बँकेशी जोडले गेले, हा दुसरा लाभ झाला. तिसरा आणि अखेरचा लाभ म्हणजे ग्रामीण भागातील युवकांना जागेवर रोजगार उपलब्ध झाले. एरव्ही बँकांमध्ये नोकरीसाठी यातायात आणि प्रचंड स्पर्धेला तोंड देण्याची वेळ येत असताना व्यवसायदूत म्हणून बँकांचे अधिकृत व्यवसाय प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी त्यांना लाभली. ही वाढलेली रोजगाराभिमुखता अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच, वंचित घटकांचे बँकिंग क्षेत्रामध्ये आर्थिक समावेशन होण्याच्या दृष्टीनेही हे मॉडेल उपयुक्त ठरत असल्याचे आशादायक चित्र आहे.

विद्यापीठातील संशोधकांनी शोधपत्रिकांमधून आपले शोधनिबंध प्रकाशित केले पाहिजेत, हे जरी आवश्यक आणि खरे असले तरी प्रासंगिक शोधनिबंध प्रकाशनांच्या माध्यमातूनही आपले संशोधन समाजाला सादर करण्याचे महत्त्व डॉ. महाजन यांनी अधोरेखित केले आहे. अशा प्रकारे संशोधनाधारित उत्तम प्रकाशने अधिकाधिक प्रमाणात विद्यापीठातील संशोधकांकडून निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, आंतरराष्ट्रीय, खाजगी बँकांचे जाळे देशभरात विस्तारत असताना ग्रामीण भारताच्या आर्थिक सबलीकरणासाठी व्यवसायदूत ही संकल्पना महत्त्वाची आणि उपकारक ठरली आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी आदी सर्वसामान्य ग्राहकापर्यंत बँकेच्या सेवांचे लाभ पोहोचविण्याच्या दृष्टीने ही चळवळ उपयुक्त आहे. संशोधकांनी अधिक सूक्ष्म पातळीवर जाऊन या मॉडेलमधील दूरगामी लाभ-हानी या विषयी सुद्धा अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

सुरवातीला प्रा. महाजन यांनी सदर प्रासंगिक शोधनिबंधाविषयी माहिती देऊन स्वागत व प्रास्ताविक केले.  डॉ. के.व्ही. मारुलकर यांनी आभार मानले.

 

Tuesday 23 March 2021

स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांविषयी ग्रंथांचे वाचन आवश्यक: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 


आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या समवेत डॉ. अवनिश पाटील, डॉ. नीलांबरी जगताप व डॉ. नमिता खोत आदी.


ग्रंथ प्रदर्शनातील पुस्तकांची पाहणी करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के


(ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन समारंभाची लघु-चित्रफीत)

आजादी का अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. २३ मार्च: देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तेजस्वी कामगिरी बजावणाऱ्या महान नेतृत्वांविषयी उपलब्ध ग्रंथांचे विद्यार्थ्यांनी वाचन करावे. त्यांचा आदर्श अंगिकारण्याचा प्रयत्न करावा. तेव्हाच आजादी का अमृतमहोत्सव हा उपक्रम खऱ्या अर्थाने सार्थक झाला, असे म्हणता येईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या वतीने केंद्र सरकारच्या आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील पुस्तकांचे प्रदर्शन छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्रात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.

डॉ. शिर्के म्हणाले, प्रदर्शनातील पुस्तके पाहून विद्यार्थ्यांमध्ये ती वाचण्याची प्रेरणा जागृत होणे अधिक आवश्यक आहे. किंबहुना, हा उपक्रम आयोजित करण्यामागील भूमिका तीच आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या विषयी तसेच स्वातंत्र्ययोद्ध्यांविषयी अधिविभागात तसेच ग्रंथालयात उपलब्ध विविध पुस्तकांचे वाचन करावे. त्यावर मनन, चिंतन करावे आणि त्याविषयीचे आकलन वाढवावे, हे या उपक्रमातून अभिप्रेत आहे.

उद्घाटनानंतर कुलगुरूंनी प्रदर्शनात मांडलेल्या पुस्तकांची पाहणी केली. नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्या जीवनपटासह त्यांच्याविषयीच्या शंभरहून अधिक पुस्तकांची मांडणी प्रदर्शनात करण्यात आली आहे. या प्रसंगी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, डॉ. नीलांबरी जगताप, दत्तात्रय मछले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

कोविडविषयक नियमांचे पालन करून सदर प्रदर्शन गुरुवार (दि. २५) पर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे आजादी का अमृतमहोत्सवउपक्रमांतर्गत मानव्यशास्त्र इमारतीमध्ये महात्मा गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने महात्मा गांधींचे दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य या विषयावरील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. ते सुद्धा शनिवारपर्यंत (दि. २७) पाहण्यास खुले राहणार आहे.

शिवाजी विद्यापीठात शहीद दिन

 





कोल्हापूर, दि. २३ मार्च: शिवाजी विद्यापीठात आज शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनीही शहीदांच्या प्रतिमांना पुष्प वाहून आदरांजली व्यक्त केली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Saturday 20 March 2021

माणगाव परिषदेच्या ‘मूकनायक’मधील वार्तांकनाचा विविध भाषांत अनुवाद

संकलित पुस्तकाच्या प्रकल्पाची कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडून माणगाव भेटीत ग्वाही

 

माणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. एस.एस. महाजन, अनिल माणगावकर आदी.



माणगाव येथील स्मारकास भेट देऊन माहिती घेताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. एस.एस. महाजन. 

माणगाव परिषदेच्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या शाळेच्या इमारतीची पाहणी केल्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. एस.एस. महाजन आदी.


(माणगाव भेट व अभिवादन कार्यक्रमाची लघु-चित्रफीत)


कोल्हापूर, दि. २० मार्च: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायकमध्ये प्रकाशित झालेल्या माणगाव परिषदेच्या वार्तांकनाचा अनुवाद विविध भारतीय तसेच परदेशी भाषांमध्ये करून त्यांचे संकलित पुस्तक शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे दिली.

माणगाव परिषदेचा १०१वा वर्धापन दिन उद्या (दि. २१ मार्च) साजरा होतो आहे. त्याच्या पूर्वसंध्येला कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन यांनी माणगावला भेट देऊन तेथील स्मारकाचे दर्शन घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाची घोषणा साक्षात राजर्षी शाहू महाराजांनी माणगाव परिषदेत केली. पुढे डॉ. आंबेडकरांनीही महाराजांचे भाकित प्रत्यक्षात उतरविले. त्या दृष्टीने माणगाव परिषद ऐतिहासिक महत्त्वाची ठरते. या परिषदेची सविस्तर माहिती बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळेच आपल्याला मिळू शकली. या परिषदेची ही माहिती विविध भाषिक वाचकांना मिळायला हवी, यासाठी विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने या वार्तांकनाचे विविध भारतीय व परदेशी भाषांत अनुवाद करण्याचा प्रकल्प तातडीने हाती घेण्यात येईल.

यावेळी डॉ. महाजन यांनी माणगाव परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व तसेच परिषदेसाठी माणगावची निवड करण्यामागील राजर्षी शाहू महाराज यांची भूमिका या विषयी सविस्तर माहिती दिली. अनिल माणगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माणगाव बौद्ध समाज अध्यक्ष अरुण शिंगे यांनी आभार मानले.

या भेटी दरम्यान कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी माणगाव येथे उभारण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या लंडन येथील निवासस्थानाच्या प्रतिरुप निवासस्थानासह माणगाव स्मारकाची पाहणी केली. बाबासाहेबांनी परिषदेच्या वेळी ज्या शाळेत मुक्काम केला होता, त्या शाळेच्या इमारतीसही त्यांनी भेट दिली. अनिल माणगावकर यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.

यावेळी माणगाव येथील अनिल कांबळे, शिरीष मधाळे, योगेश सनदी, नंदकुमार शिंगे, पांडुरंग कांबळे, राहुल शिंगे, श्रीकांत चव्हाण, अनिकेत कांबळे आदी उपस्थित होते.

Thursday 18 March 2021

संशोधन योजनेतून साकारले ‘शिवाजी विद्यापीठातील पक्षीजगत’


कोल्हापूर, दि. १८ मार्च: शिवाजी विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत शिक्षक, संशोधक, विद्यार्थी यांना संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी विविध संशोधन योजना जाहीर केल्या. त्यापैकीच असलेल्या रिसर्च स्ट्रेन्दनिंग स्कीमअंतर्गत प्राणीशास्त्र अधिविभागातील डॉ. एस.एम. गायकवाड यांनी सुमारे दोन वर्षे शिवाजी विद्यापीठ परिसरातील जैवविविधतेबाबत संशोधन केले. त्यातून बर्ड्स ऑन शिवाजी युनिव्हर्सिटी कॅम्पस हे सुमारे ११८ पानी कॉफीटेबल बुक साकार झाले आहे.  

 डॉ. एस.एम. गायकवाड यांनी दोन वर्षांमध्ये विद्यापीठाच्या ८५३ एकर परिसरामध्ये सातत्याने पक्षीनिरीक्षण केले. विशेषतः कोविड-१९ साथीच्या कालखंडात विद्यापीठ परिसरात मनुष्य हस्तक्षेप अत्यल्प असल्याचा लाभ घेऊन निर्भयपणे मुक्त विहार करणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण करणे, त्यांची छायाचित्रे टिपणे या गोष्टी डॉ. गायकवाड यांना अधिक चांगल्या प्रकारे करता आल्या. त्यांनी सर्वसाधारण व दुर्मिळ अशा सर्व प्रकारचे मिळून सुमारे ११५ पक्षी असल्याचे नोंदविले आहे.

या ११५ पक्ष्यांची डॉ. गायकवाड यांनी अत्यंत उत्कृष्ट छायाचित्रेही टिपली आहेत. या छायाचित्रांचे कॉफी टेबल बुक त्यांनी साकारले आहे. यामध्ये पक्ष्याचे छायाचित्र, त्याची थोडक्यात माहिती आणि जिज्ञासूंना अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक पक्ष्याच्या पृष्ठावर एक क्यूआर कोड छापला आहे. ज्याला अधिक माहिती घ्यावयाची असेल, त्याने क्यूआर कोड स्कॅन केला की, लगेच त्या पक्ष्याची सविस्तर माहिती त्यांच्या मोबाईलवर दिसेल.

डॉ. गायकवाड यांना विद्यापीठाच्या ज्या परिसरात जे पक्षी आढळले, त्या ठिकाणी संबंधित पक्ष्याचा सचित्र माहितीफलकही उभारण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात फिरावयास येणाऱ्या नागरिकांनाही त्या परिसरात कोणत्या पक्ष्याचा आढळ होऊ शकतो, याचा अंदाज येण्यास मदत होते.

यासंदर्भात बोलताना डॉ. गायकवाड म्हणाले, विद्यापीठाने रिसर्च स्ट्रेन्दनिंग योजनेअंतर्गत प्रोत्साहन निधी दिल्यामुळेच विद्यापीठ परिसरातील जैवविविधतेबाबत संशोधन करता येऊ शकले. त्यातूनच या परिसरात पक्ष्यांच्या सुमारे ११५ प्रजाती असल्याचे निरीक्षण नोंदविता येऊ शकले. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचे प्रोत्साहन आणि विभागप्रमुख डॉ. व्ही.एस. मन्ने यांचे सहकार्य यामुळे या पक्ष्यांच्या छायाचित्रांचा समावेश असणारे कॉफीटेबल बुक प्रकाशित करता येऊ शकले.


विद्यापीठ परिसर सुरक्षित अधिवास



शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा निसर्गरम्य आणि देखणा तर आहेच, पण त्याचबरोबर विविध पशुपक्ष्यांसाठी सुरक्षित अधिवास असल्याचे डॉ. गायकवाड यांच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी केले. बर्ड्स ऑन शिवाजी युनिव्हर्सिटी कॅम्पस या कॉफीटेबल बुकचे नुकतेच त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.डी. नांदवडेकर, डॉ. आर.के. कामत, डॉ. व्ही.एस. मन्ने, डॉ. एम.व्ही. वाळवेकर यांच्यासह प्राणीशास्त्र अधिविभागातील शिक्षक उपस्थित होते.

  

Wednesday 17 March 2021

शिवाजी विद्यापीठातील घटकांची कार्यशैली, निष्ठा वाखाणण्याजोगी: प्रा. जे.पी. शर्मा

 

शिवाजी विद्यापीठाच्या 'नॅक'च्या चौथ्या पुनर्मूल्यांकनाचा गोपनीय अहवाल कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्याकडे सुपूर्द करताना नॅक पिअर समितीचे अध्यक्ष प्रा. जे.पी. शर्मा. सोबत (डावीकडून) डॉ. आर.के. कामत, प्रा. बी.आर. कौशल, प्रा. हरिश चंद्रा दास, प्रा. सुनील कुमार, प्रा. तरुण अरोरा, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रा. एस.ए. एच. मोईनुद्दीन आणि डॉ. एम.एस. देशमुख. 

नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या फेरीचे काम पूर्ण

कोल्हापूर, दि. १७ मार्च: शिवाजी विद्यापीठातील सर्वच घटकांची कार्यशैली, उत्साह आणि निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. याच पद्धतीने विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकदिलाने कार्यरत राहावे, असे आवाहन नॅक पिअर समितीचे अध्यक्ष प्रा. जे.पी. शर्मा यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या नॅकच्या चौथ्या पुनर्मूल्यांकनासाठी गेले तीन दिवस डॉ. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समिती विद्यापीठात दाखल झाली होती. या प्रक्रियेची सांगता आज औपचारिक एक्झिट मिटींगने झाली. त्या बैठकीत ते बोलत होते.

प्रा. शर्मा म्हणाले, शिवाजी विद्यापीठाची पाहणी हा आम्हा समिती सदस्यांसाठीच एक उत्तम व अनेक नवीन गोष्टी सांगणारा अनुभव राहिला. गेल्या तीन दिवसांत येथील सर्वच घटकांमध्ये एक अनोखा उत्साह आणि मिळून काम करण्याची ऊर्जा सर्वत्र जाणवत राहिली. ही बाब फार महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम तर अतिशय उल्लेखनीय होता. याच एकात्मतेने आपण शिवाजी विद्यापीठाला उंचीवर घेऊन जाल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठामध्ये आपल्याला कोल्हापुरी आतिथ्यशीलतेचा अतिशय उत्तम अनुभव आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, कोविड-१९च्या महामारीचे सावट असतानाही समितीचे सर्वच सदस्य देशाच्या कानाकोपऱ्यातून कोल्हापूर येथे दाखल झाले, याबद्दल त्यांना खरोखरीच धन्यवाद द्यायला हवेत. विविध अधिविभागांना भेटी देऊन पाहणी करताना तसेच विविध घटकांशी संवाद साधताना समिती सदस्यांनी मनमोकळेपणाने मौलिक सूचनाही केल्या. त्या सूचनांचा विद्यापीठ निश्चितपणाने पाठपुरावा करून अंमलात आणेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नॅक मूल्यांकनाची ही फेरी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे विभागप्रमुख, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अधिसभा यांसह सर्वच अधिकार मंडळांचे सदस्य या सर्वांना कुलगुरूंनी मनापासून धन्यवाद दिले.

यावेळी प्रा. शर्मा यांनी नॅकला सादर करण्यात येणाऱ्या गोपनीय अहवालाची एक प्रत कुलगुरू डॉ. शिर्के यांना सादर केली. हा अहवाल समितीतर्फे नॅक बंगळुरू यांना सादर करण्यात येणार आहे.  

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह नॅक पिअर समितीचे सदस्य प्रा. बी.आर. कौशल, प्रा. एस.ए.एच. मोईनुद्दिन, प्रा. तरुण अरोरा, प्रा. सुनील कुमार व प्रा. हरिश चंद्रा दास उपस्थित होते.

Sunday 14 March 2021

सामाजिक चिकित्सालयाची समाजास नितांत आवश्यकता: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

 

शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सामाजिक चिकित्सालयाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत (डावीकडून) डॉ. प्रल्हाद माने, अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन आदी. 

कोल्हापूर, दि. १४ मार्च: समाजशास्त्र विभागाने सामाजिक चिकीत्सालयाची एक आगळी वेगळी संकल्पना समाजासमोर आणली आहे, ज्याची समाजाला नितांत आवश्यकता आहे, असे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केले. समाजशास्त्र अधिविभागाच्या सामाजिक चिकित्सालयाच्या उद्दघाटन प्रसंगी ते काल बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, समाजशास्त्र विभागाच्या वतीने समाज विकासात भर घालण्यासाठी आणि विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात अॅलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि योग या चार स्तरांवर समाजातील व्यक्तीच्या शारीरिक व्याधी कमी करण्यासाठी कार्यरत आहेत. असे असले तरी विविध व्यक्तीगत आणि कौटुंबिक प्रश्नांमुळे अनेक मानवनिर्मित व्याधी निर्माण होतात. सामाजिक नाते संबंध अतिशय संवेनशील असतात. त्यातील गुंता हळूवारपणे सोडवण्यासाठी हे चिकित्सालय उपयुक्त ठरेल. अशा वेळी समाजमन ओळखून त्यावर बऱ्याच प्रमाणात वैद्यकीय गोळ्या, औषधे न घेताही काही आजार बरे होऊ शकतात. हे चिकित्सालय तरुणांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. समाजालाच आज अशा चिकीत्सालयाची आवश्यकता आहे. सदर कार्य समाजशास्त्र अधिविभागाने उत्तम पद्धतीने चालवावे, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी प्र-कुलगुरु डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, व्याधीग्रस्त व्यक्तींची वर्गवारी करुन त्यानुसार ते प्रश्न सोडविण्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या सामाजिक चिकित्सालयाची संकल्पना केवळ विद्यापीठातच नव्हे, तर देशातीलही कदाचित अशा स्वरुपाचा पहिलाच अभिनव उपक्रम असावा, असे मत व्यक्त केले.

कुलगुरु डॉ. शिर्के व प्र-कुलगुरु डॉ. पाटील यांच्या हस्ते सामाजिक चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाजशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. जगन कराडे यांनी सामाजिक चिकित्सालयाची संकल्पना आणि त्याची आवश्यकता व व्याप्ती विषद केली. डॉ. पी. एम. माने यांनी आभार मानले. समारंभास वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. महाजन, डॉ. व्ही. एस. मारुलकर, डॉ. प्रतिमा पवार, डॉ पी.बी. देसाई, डॉ. संजय कांबळे, कोमल ओसवाल, अभिजित पाटील आणि विभागातील संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.