डॉ.
एस.एस. महाजन यांच्या प्रासंगिक शोधनिबंध पुस्तिकेचे प्रकाशन
कोल्हापूर, दि. २४
मार्च: व्यवसायदूतांच्या (बिझनेस कॉरस्पाँडंट) नियुक्तीमुळे
बँकांच्या व्यवसायाभिमुखतेबरोबरच स्थानिक रोजगाराभिमुखतेला बळ लाभले आहे, असे
प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता तसेच दि
युनायटेड वेस्टर्न बँकेच्या रा.ना. गोडबोले अध्यासनाचे प्रमुख डॉ. एस.एस. महाजन
यांनी लिहीलेल्या ‘बिझनेस
कॉरस्पाँडंट मॉडेल अँड इट्स रोल इन बँकिंग सेक्टर’ या प्रासंगिक शोधनिबंधाच्या पुस्तिकेचे प्रकाशन आज
कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. ए.एम. गुरव उपस्थित
होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, बँकांनी गतिमान स्पर्धेला तोंड देण्याच्या
दृष्टीने तसेच व्यवसाय विस्तारासाठी विविध उपाय योजले. त्यामध्ये बिझनेस
कॉरस्पाँडंट्सची नियुक्ती हा एक महत्त्वाचा ठरला. या व्यवसायदूतांमुळे बँकांना थेट
कर्मचारी न नेमता सुद्धा आपल्या व्यवसायाचा पाया ग्रामीण भागापर्यंत विस्तारता येऊ
शकला. आज विविध बँकांचे मिळून एकूण ५ लाख ४१ हजारांहून अधिक व्यवसायदूत कार्यरत
असल्याची आकडेवारी लक्षात घेतली असता या मॉडेलचा बँकांना लाभ झाला, हे तर खरेच
आहे. मात्र, त्याचबरोबर बँकांच्या कक्षेत येऊ न शकणारे ग्राहकही बँकेशी जोडले
गेले, हा दुसरा लाभ झाला. तिसरा आणि अखेरचा लाभ म्हणजे ग्रामीण भागातील युवकांना
जागेवर रोजगार उपलब्ध झाले. एरव्ही बँकांमध्ये नोकरीसाठी यातायात आणि प्रचंड
स्पर्धेला तोंड देण्याची वेळ येत असताना व्यवसायदूत म्हणून बँकांचे अधिकृत व्यवसाय
प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी त्यांना लाभली. ही वाढलेली रोजगाराभिमुखता
अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच, वंचित घटकांचे बँकिंग क्षेत्रामध्ये आर्थिक समावेशन
होण्याच्या दृष्टीनेही हे मॉडेल उपयुक्त ठरत असल्याचे आशादायक चित्र आहे.
विद्यापीठातील संशोधकांनी शोधपत्रिकांमधून आपले शोधनिबंध प्रकाशित केले
पाहिजेत, हे जरी आवश्यक आणि खरे असले तरी प्रासंगिक शोधनिबंध प्रकाशनांच्या
माध्यमातूनही आपले संशोधन समाजाला सादर करण्याचे महत्त्व डॉ. महाजन यांनी अधोरेखित
केले आहे. अशा प्रकारे संशोधनाधारित उत्तम प्रकाशने अधिकाधिक प्रमाणात
विद्यापीठातील संशोधकांकडून निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, आंतरराष्ट्रीय, खाजगी बँकांचे जाळे
देशभरात विस्तारत असताना ग्रामीण भारताच्या आर्थिक सबलीकरणासाठी व्यवसायदूत ही
संकल्पना महत्त्वाची आणि उपकारक ठरली आहे. शेतकरी, महिला, विद्यार्थी आदी
सर्वसामान्य ग्राहकापर्यंत बँकेच्या सेवांचे लाभ पोहोचविण्याच्या दृष्टीने ही चळवळ
उपयुक्त आहे. संशोधकांनी अधिक सूक्ष्म पातळीवर जाऊन या मॉडेलमधील दूरगामी लाभ-हानी
या विषयी सुद्धा अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे.
सुरवातीला प्रा. महाजन यांनी सदर प्रासंगिक शोधनिबंधाविषयी माहिती देऊन स्वागत
व प्रास्ताविक केले. डॉ. के.व्ही. मारुलकर
यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment