![]() |
ग्रंथ प्रदर्शनातील पुस्तकांची पाहणी करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के |
‘आजादी का अमृतमहोत्सव’ उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शनाचे
उद्घाटन
कोल्हापूर, दि. २३
मार्च: देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तेजस्वी कामगिरी
बजावणाऱ्या महान नेतृत्वांविषयी उपलब्ध ग्रंथांचे विद्यार्थ्यांनी वाचन करावे.
त्यांचा आदर्श अंगिकारण्याचा प्रयत्न करावा. तेव्हाच ‘आजादी का अमृतमहोत्सव’ हा उपक्रम खऱ्या अर्थाने सार्थक झाला, असे म्हणता
येईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे
केले.
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या वतीने केंद्र सरकारच्या ‘आजादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमांतर्गत ‘नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार
वल्लभभाई पटेल यांच्यावरील पुस्तकांचे प्रदर्शन’ छत्रपती
शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्रात आयोजित करण्यात आले आहे. या
प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.
डॉ. शिर्के म्हणाले, प्रदर्शनातील पुस्तके पाहून विद्यार्थ्यांमध्ये ती
वाचण्याची प्रेरणा जागृत होणे अधिक आवश्यक आहे. किंबहुना, हा उपक्रम आयोजित
करण्यामागील भूमिका तीच आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या
विषयी तसेच स्वातंत्र्ययोद्ध्यांविषयी अधिविभागात तसेच ग्रंथालयात उपलब्ध विविध
पुस्तकांचे वाचन करावे. त्यावर मनन, चिंतन करावे आणि त्याविषयीचे आकलन वाढवावे, हे
या उपक्रमातून अभिप्रेत आहे.
उद्घाटनानंतर कुलगुरूंनी प्रदर्शनात मांडलेल्या पुस्तकांची पाहणी केली. नेताजी
सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्या जीवनपटासह
त्यांच्याविषयीच्या शंभरहून अधिक पुस्तकांची मांडणी प्रदर्शनात करण्यात आली आहे.
या प्रसंगी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील, बॅ. बाळासाहेब खर्डेकर
ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, डॉ. नीलांबरी जगताप, दत्तात्रय मछले
यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
कोविडविषयक नियमांचे पालन करून सदर प्रदर्शन गुरुवार (दि. २५) पर्यंत
पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे ‘आजादी का अमृतमहोत्सव’ उपक्रमांतर्गत मानव्यशास्त्र इमारतीमध्ये महात्मा
गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने ‘महात्मा
गांधींचे दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य’ या विषयावरील दुर्मिळ
छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. ते सुद्धा शनिवारपर्यंत (दि. २७)
पाहण्यास खुले राहणार आहे.
No comments:
Post a Comment