Wednesday, 17 March 2021

शिवाजी विद्यापीठातील घटकांची कार्यशैली, निष्ठा वाखाणण्याजोगी: प्रा. जे.पी. शर्मा

 

शिवाजी विद्यापीठाच्या 'नॅक'च्या चौथ्या पुनर्मूल्यांकनाचा गोपनीय अहवाल कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्याकडे सुपूर्द करताना नॅक पिअर समितीचे अध्यक्ष प्रा. जे.पी. शर्मा. सोबत (डावीकडून) डॉ. आर.के. कामत, प्रा. बी.आर. कौशल, प्रा. हरिश चंद्रा दास, प्रा. सुनील कुमार, प्रा. तरुण अरोरा, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रा. एस.ए. एच. मोईनुद्दीन आणि डॉ. एम.एस. देशमुख. 

नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या फेरीचे काम पूर्ण

कोल्हापूर, दि. १७ मार्च: शिवाजी विद्यापीठातील सर्वच घटकांची कार्यशैली, उत्साह आणि निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. याच पद्धतीने विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकदिलाने कार्यरत राहावे, असे आवाहन नॅक पिअर समितीचे अध्यक्ष प्रा. जे.पी. शर्मा यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या नॅकच्या चौथ्या पुनर्मूल्यांकनासाठी गेले तीन दिवस डॉ. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समिती विद्यापीठात दाखल झाली होती. या प्रक्रियेची सांगता आज औपचारिक एक्झिट मिटींगने झाली. त्या बैठकीत ते बोलत होते.

प्रा. शर्मा म्हणाले, शिवाजी विद्यापीठाची पाहणी हा आम्हा समिती सदस्यांसाठीच एक उत्तम व अनेक नवीन गोष्टी सांगणारा अनुभव राहिला. गेल्या तीन दिवसांत येथील सर्वच घटकांमध्ये एक अनोखा उत्साह आणि मिळून काम करण्याची ऊर्जा सर्वत्र जाणवत राहिली. ही बाब फार महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम तर अतिशय उल्लेखनीय होता. याच एकात्मतेने आपण शिवाजी विद्यापीठाला उंचीवर घेऊन जाल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विद्यापीठामध्ये आपल्याला कोल्हापुरी आतिथ्यशीलतेचा अतिशय उत्तम अनुभव आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, कोविड-१९च्या महामारीचे सावट असतानाही समितीचे सर्वच सदस्य देशाच्या कानाकोपऱ्यातून कोल्हापूर येथे दाखल झाले, याबद्दल त्यांना खरोखरीच धन्यवाद द्यायला हवेत. विविध अधिविभागांना भेटी देऊन पाहणी करताना तसेच विविध घटकांशी संवाद साधताना समिती सदस्यांनी मनमोकळेपणाने मौलिक सूचनाही केल्या. त्या सूचनांचा विद्यापीठ निश्चितपणाने पाठपुरावा करून अंमलात आणेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नॅक मूल्यांकनाची ही फेरी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे विभागप्रमुख, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, अधिसभा यांसह सर्वच अधिकार मंडळांचे सदस्य या सर्वांना कुलगुरूंनी मनापासून धन्यवाद दिले.

यावेळी प्रा. शर्मा यांनी नॅकला सादर करण्यात येणाऱ्या गोपनीय अहवालाची एक प्रत कुलगुरू डॉ. शिर्के यांना सादर केली. हा अहवाल समितीतर्फे नॅक बंगळुरू यांना सादर करण्यात येणार आहे.  

विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह नॅक पिअर समितीचे सदस्य प्रा. बी.आर. कौशल, प्रा. एस.ए.एच. मोईनुद्दिन, प्रा. तरुण अरोरा, प्रा. सुनील कुमार व प्रा. हरिश चंद्रा दास उपस्थित होते.

No comments:

Post a Comment