Tuesday 26 June 2018

शिवाजी विद्यापीठात

राजर्षी शाहू जयंती उत्साहात



कोल्हापूर, दि. २६ जून: शिवाजी विद्यापीठात आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, देविकाराणी पाटील, सचिन घोरपडे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday 22 June 2018

नवनाथ गोरे यांचे यश विद्यापीठासाठी अभिमानास्पद: प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नवनाथ गोरे यांचे अभिनंदन करताना शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत डॉ. ए.एम. गुरव, डॉ. आर.के. कामत, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. भारती पाटील, डॉ. दत्ता घोलप आदी.


'फेसाटी' कादंबरीला साहित्य अकादमीचा 'युवा साहित्य पुरस्कार' जाहीर झाल्याने विद्यापीठात आनंदाचे वातावरण

कोल्हापूर, दि. २२ जून: साहित्याच्या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा साहित्य अकादमीचा पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आणि युवा साहित्यिक नवनाथ गोरे यांच्या फेसाटी या कादंबरीला प्राप्त झाला, ही विद्यापीठाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. नवनाथ यांनी त्यांची साहित्य सेवा अशीच जोमाने सुरू ठेवावी, अशा शब्दांत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी अभिनंदन केले.
साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा साहित्य अकादमीचा यंदाचा युवा साहित्य पुरस्‍कार-२०१८ नवनाथ गोरे यांना प्राप्‍त झाल्याचे समजल्यानंतर विद्यापीठात विशेषतः मराठी अधिविभागात आनंदाचे वातावरण पसरले. त्यानंतर नवनाथ गोरे यांचे प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आपल्या दालनात बोलावून ग्रंथभेट देऊन अभिनंदन केले. त्यावेळी ते बोलत होते.
नवनाथ गोरे हे मूचे सांगली जिल्‍ह्यातील उमदी (ता. जत) येथील आहेत. महाविद्यालयीन शिक्षण उमदी येथे झाले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए. केले. गोरे सध्या विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात डॉ. रणधीर शिंदे यांच्या बृहत्संशोधन प्रकल्पावर फेलो म्हणून कार्यरत आहेत.
या लेखन उपक्रमाची दखल थेट साहित्य अकादमीने घेतल्याने या पुरस्काराचे महत्त्व शब्दातीत तसेच भावी लेखन वाटचालीस प्रेरणादायी आहे, अशी प्रतिक्रिया गोरे यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रसंगी अधिष्ठाता प्रा. डॉ. भारती पाटील, डॉ. .एम. गुरव, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. आर.के. कामत, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. दत्ता घोलप यांच्यासह मराठी विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.
नवनाथ गोरे यांनी आपल्या फेसाटी या कादंबरीमधून दुष्काळी प्रदेशातील पशुपालक समाजातील तरुणाचा शिक्षणविषयक जगण्याचा भोवताल चित्रित केला आहे. या कादंबरीस नवलेखक अनुदान योजनेत महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदानही मिळाले होते. या कादंबरीला महाराष्ट्रातील मान्यवर साहित्य संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.

Thursday 21 June 2018

विद्यापीठातील योग शिबिरात ११०० साधकांचा सहभाग

चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष योग शिबिराचे रोपास पाणी घालून उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह मान्यवर.

योग शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

योग शिबिराविषयी मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक विजय जाधव.
योग शिबिरात सहभागी झालेल्या अनिता शिंदे यांच्यासह अरुंधती महाडिक, रेखा सारडा आदी

योग साधक








योग साधक


संलग्न महाविद्यालयांतून ३० हजार जणांचा सहभाग
कोल्हापूर, दि. २१ जून: शिवाजी विद्यापीठ, श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ (कणेरी) आणि दै. महाराष्ट्र टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात आज सकाळी चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन योग साधकांच्या उत्साही प्रतिसादामध्ये साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात झालेल्या या उपक्रमात सुमारे ११०० योग साधक सहभागी झाले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून ते शिक्षक, अधिकारी, महिला यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांचाही लक्षणीय सहभाग होता. येथील भागीरथी महिला संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला. संलग्नित महाविद्यालयांतून झालेल्या योग शिबिरांत सुमारे ३० हजार साधकांनी सहभाग नोंदविला.
संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार २१ जून जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज शिवाजी विद्यापीठात सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत पार पडला. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे २१ जून, २०१५ पासून 'योगशक्ती - योगयज्ञ'अंतर्गत योग प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठात सलग तीन वर्षे राबविण्यात येत आहे. या योग उपक्रमाचा दैनंदिन २००हून अधिक साधक लाभ घेतात. त्याची यंदा यशस्वीरित्या त्रिवर्षपूर्ती झाली.
या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जगभरातील नागरिकांत योगसाधनेविषयी जागृती निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांना दैनंदिन स्वरुपात योगसाधना करण्यास प्रवृत्त करण्यात शिवाजी विद्यापीठ यशस्वी झाले आहे, याचे समाधान वाटते.
यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक विजय जाधव म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या उपक्रमातून शिवाजी विद्यापीठ आणि दै. महाराष्ट्र टाइम्सने कोल्हापूरच्या नागरिकांशी आरोग्याचे नाते निर्माण केले असून हे सहसंबंध अधिक दृढ झाले आहेत.
यावेळी कणेरी मठाच्या योग प्रशिक्षकांनी सुमारे दीड तास विविध योग प्रात्यक्षिके साधकांकडून करवून घेतली. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, महाराष्ट्र टाइम्सच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक विजय जाधव, मुख्य वार्ताहर गुरूबाळ माळी, सौ. अनिता शिंदे, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, रेखा सारडा यांच्यासह मठाचे अन्य साधक, तसेच विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी सेवक उपस्थित होते.

संलग्न महाविद्यालयांतील शिबिरांत सुमारे ३० हजार जणांचा सहभाग
चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांमधूनही योग शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार संलग्नित महाविद्यालयांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपापल्या आवारात योग शिबिरांचे नियोजन केले. या शिबिरांमध्ये सुमारे ३० हजार योग साधकांनी आपला सहभाग नोंदविला, अशी माहिती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी दिली.