Friday, 22 June 2018

नवनाथ गोरे यांचे यश विद्यापीठासाठी अभिमानास्पद: प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नवनाथ गोरे यांचे अभिनंदन करताना शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत डॉ. ए.एम. गुरव, डॉ. आर.के. कामत, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. भारती पाटील, डॉ. दत्ता घोलप आदी.


'फेसाटी' कादंबरीला साहित्य अकादमीचा 'युवा साहित्य पुरस्कार' जाहीर झाल्याने विद्यापीठात आनंदाचे वातावरण

कोल्हापूर, दि. २२ जून: साहित्याच्या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा साहित्य अकादमीचा पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आणि युवा साहित्यिक नवनाथ गोरे यांच्या फेसाटी या कादंबरीला प्राप्त झाला, ही विद्यापीठाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. नवनाथ यांनी त्यांची साहित्य सेवा अशीच जोमाने सुरू ठेवावी, अशा शब्दांत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी अभिनंदन केले.
साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा साहित्य अकादमीचा यंदाचा युवा साहित्य पुरस्‍कार-२०१८ नवनाथ गोरे यांना प्राप्‍त झाल्याचे समजल्यानंतर विद्यापीठात विशेषतः मराठी अधिविभागात आनंदाचे वातावरण पसरले. त्यानंतर नवनाथ गोरे यांचे प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आपल्या दालनात बोलावून ग्रंथभेट देऊन अभिनंदन केले. त्यावेळी ते बोलत होते.
नवनाथ गोरे हे मूचे सांगली जिल्‍ह्यातील उमदी (ता. जत) येथील आहेत. महाविद्यालयीन शिक्षण उमदी येथे झाले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए. केले. गोरे सध्या विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात डॉ. रणधीर शिंदे यांच्या बृहत्संशोधन प्रकल्पावर फेलो म्हणून कार्यरत आहेत.
या लेखन उपक्रमाची दखल थेट साहित्य अकादमीने घेतल्याने या पुरस्काराचे महत्त्व शब्दातीत तसेच भावी लेखन वाटचालीस प्रेरणादायी आहे, अशी प्रतिक्रिया गोरे यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रसंगी अधिष्ठाता प्रा. डॉ. भारती पाटील, डॉ. .एम. गुरव, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. आर.के. कामत, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. दत्ता घोलप यांच्यासह मराठी विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.
नवनाथ गोरे यांनी आपल्या फेसाटी या कादंबरीमधून दुष्काळी प्रदेशातील पशुपालक समाजातील तरुणाचा शिक्षणविषयक जगण्याचा भोवताल चित्रित केला आहे. या कादंबरीस नवलेखक अनुदान योजनेत महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदानही मिळाले होते. या कादंबरीला महाराष्ट्रातील मान्यवर साहित्य संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.

1 comment:

  1. हार्दिक अभिनंदन नवनाथ सर,
    आपल्या लेखनामुळे नक्कीच नवसाहित्य निर्मिकाना चालना मिळेल.

    ReplyDelete