Friday, 8 June 2018

डॉ. एस.आर. यादव यांची संशोधनाप्रती समर्पणवृत्ती आदर्शवत: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा. एस.आर. यादव यांचे प्रशस्तीपत्र व ग्रंथभेट देऊन अभिनंदन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे व वनस्पतीशास्त्र अधिविभागातील सर्व शिक्षक.


राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराबद्दल विद्यापीठातर्फे गौरव
कोल्हापूर, दि. ८ जून: प्रा. एस.आर. यादव यांची संशोधनाप्रती समर्पण वृत्ती आणि निष्ठा ही अत्यंत आदर्शवत असून त्यांना मिळालेला राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार हा शिवाजी विद्यापीठाचाच गौरव आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे काढले.
विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागाचे माजी प्रमुख व वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा.डॉ. एस.आर. यादव यांना नुकताच केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयातर्फे देण्यात येणारा इ.के. जानकी अम्मल जीवन गौरव पुरस्कार हा संशोधनातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळविणारे डॉ. यादव हे राज्यातील एकमेव संशोधक आहेत. त्या निमित्त आज विद्यापीठातर्फे डॉ. यादव यांचे अभिनंदन करण्यात आले. त्या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिंदे बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. यादव यांनी वनस्पतीशास्त्रामध्ये जागतिक दर्जाचे संशोधन केले. त्या संशोधनातून ते स्वतः मोठे झालेच, पण त्यांच्यामुळे शिवाजी विद्यापीठाचा लौकिकही उंचावला. आपल्या संशोधनकार्याची पुस्तके त्यांनी विद्यापीठ प्रकाशनामार्फत प्रकाशित केली, जेणे करून त्या माध्यमातून विद्यापीठही देशोदेशीच्या संशोधकांपर्यंत पोहोचावे. त्यांच्या अथक प्रयत्नांतूनच विद्यापीठात जागतिक दर्जाचे लीड बॉटॅनिकल गार्डन साकार होऊ शकले. आजही त्यांचे संशोधन कार्य अखंडितपणे सुरू आहे. त्यांच्यामुळे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागाला संशोधन क्षेत्रात मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. सध्या अधिविभागात कार्यरत असणारे तरुण शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी या सर्वांनीच डॉ. यादव यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून संशोधन कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी डॉ. यादव म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील इतक्या उंचीचा पुरस्कार हा केवळ माझी मातृसंस्था असलेल्या शिवाजी विद्यापीठामुळेच मिळू शकला. आजवर मी या मातृसंस्थेमुळेच घडलो. माझे संशोधन क्षेत्र असलेल्या टॅक्सॉनॉमीला जीवशास्त्राची माता असे म्हटले जाते. त्या क्षेत्रात गेल्या तीस वर्षांत उत्तम संशोधनाची भर घालण्याचे कार्य हातून झाले, याचे समाधान आहेच. पण, येथून पुढील काळातही त्याच भावनेने संशोधन करीत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठातर्फे प्रशंसापत्र व ग्रंथभेट देऊन डॉ. यादव यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्यासह वनस्पतीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. एस.एस. कांबळे, डॉ. एन.एस. चव्हाण, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. एन.बी. गायकवाड, डॉ. व्ही.डी. जाधव, डॉ. के.बी. पवार, डॉ. एम.एम. लेखक, डॉ. एस.जी. घारे, डॉ. एम.एस. निंबाळकर, उपकुलसचिव डॉ. जी.एस. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment