कोल्हापूर, दि. १३
जून: कोल्हापूरकरांचे प्रेम आणि सहकार्य या बळावर उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास
मंडळाच्या अध्यक्षपदाची कारकीर्द निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास मंडळाचे
नवनियुक्त अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी आज येथे व्यक्त केला.
येथील दैनिक
पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांची नुकतीच उर्वरित महाराष्ट्र
वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्या निमित्त शिवाजी
विद्यापीठात आयोजित बैठकीच्या प्रसंगी डॉ. जाधव यांचा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते ग्रंथ, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह प्रदान करून डॉ. जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले.
डॉ. योगेश जाधव
म्हणाले, महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री श्री.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या विकास मंडळाच्या
अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवून मोठा विश्वास दाखविला आहे. पत्रकारिता आणि
सामाजिक क्षेत्रातील कार्याचा आजवरचा अनुभव पणाला लावून अधिकाधिक समाजाभिमुख काम
करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यासाठी शिवाजी विद्यापीठासह कोल्हापुरातील
अभ्यासू, मान्यवर तज्ज्ञांचे आवश्यकतेनुसार वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन मंडळावरील
कारकीर्द संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी
दिली.
यावेळी कुलगुरू डॉ.
देवानंद शिंदे म्हणाले की, डॉ. योगेश जाधव यांच्यावर राज्य शासनाने अतिशय
महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना राज्यातील
बहुसंख्य जनतेचे हितरक्षण करण्यात ते निश्चितपणे यशस्वी होतील. त्यांच्या कारकीर्दीला
शिवाजी विद्यापीठ परिवाराकडून मनापासून शुभेच्छा देताना अतिशय आनंद होत असल्याची
भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी दैनिक
पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व
लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. जी.एस. कुलकर्णी, वृत्तपत्रविद्या
व संवादशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. ग.गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे
डॉ. रत्नाकर पंडित, ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विजय धारुलकर, पुण्याच्या एमआयटीचे
अधिष्ठाता डॉ. सुधीर गव्हाणे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव, डॉ. शिवाजी
जाधव आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment