Friday 30 November 2018

शिवाजी विद्यापीठ अव्वल स्थानी; मुंबई विद्यापीठ दुसरे

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धा:
 
मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूची पकड करण्याच्या प्रयत्नात शिवाजी विद्यापीठाचे कबड्डीपटू.

शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूला बाद करण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करणारा मुंबई विद्यापीठाचा खेळाडू.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते विजेतेपदाचा चषक स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाचा संघ

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते उपविजेतेपदाचा चषक स्वीकारताना मुंबई विद्यापीठाचा संघ.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते तृतीय क्रमांकाचा चषक स्वीकारताना औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ.


कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते चतुर्थ क्रमांकासाठीचा चषक स्वीकारताना कोटा (राजस्थान) येथील कोटा विद्यापीठाचा संघ.


कोल्हापूर, दि. ३० नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात गेले पाच दिवस सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धेत आज यजमान शिवाजी विद्यापीठाच्या संघाने मुंबई विद्यापीठास २९-२१ असे नमवित अव्वल स्थान पटकावले.
स्पर्धेच्या प्रथम क्रमांकासाठीची लढत शिवाजी विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाच्या संघांत झाली. अतिशय अटीतटीने सुरू असलेला हा सामना संपण्यास अवघी काही मिनिटे शिल्लक असताना पंचांच्या एका निर्णयाला आक्षेप घेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने सामना सोडला. त्यामुळे २९-२१ अशा आठ गुणांनी आघाडीवर असलेल्या शिवाजी विद्यापीठास विजयी घोषित करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचा संघ अजिंक्य राहिला आणि साखळी फेरीतील तीनही सामने जिंकून सहा गुणांसह गुणतक्त्यात आघाडीचे स्थान प्राप्त केले.
तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि राजस्थानचे कोटा विद्यापीठ यांच्यात रंगला. पहिल्या गुणापासून ते अखेरच्या गुणापर्यंत हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. अगदी बरोबरीने हलणाऱ्या गुणफलकाने प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावले. अखेरच्या मिनिटातही सामना ३८-३८ असा बरोबरीत होता. अगदी अखेरच्या चालीत एक गुण मिळवून औरंगाबाद विद्यापीठाने हा सामना ३९-३८ असा अवघ्या एका गुणाने जिंकला.
सामन्यांनंतर लगेचच राष्ट्रीय फेरीसाठी पात्र ठरलेल्या साखळी फेरीतील चारही संघांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत चषक देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरणानंतर भारतीय विद्यापीठ महासंघ (ए.आय.यु.) आणि शिवाजी विद्यापीठ यांचे ध्वज अनुक्रमे प्रा. सुनील खराडे आणि प्रा. विजय रोकडे यांनी सन्मानपूर्वक उतरविले आणि कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडे सोपविले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य अॅड. धैर्यशील पाटील, संजय जाधव, प्रा. संभाजी पाटील, डॉ. रमेश भेंडेगिरी, उमा भेंडेगिरी-भोसले, डॉ. बाबासाहेब उलपे, अजित पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. दीपक पाटील यांनी स्वागत केले, तर क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांनी आभार मानले.

जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्य
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धा गेल्या पाच दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात मॅटवर खेळविली गेली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये विद्यापीठ प्रशासनाच्या बरोबरीने कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. स्पर्धेला आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्याबरोबरच स्कोअरर आणि पंच म्हणूनही संघटनेच्या सदस्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यामध्ये डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासह उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. बाबासाहेब उलपे, डॉ. एन.डी. पाटील, प्रा. सुनील खराडे, प्रा. विजय रोकडे, डॉ. सुनील चव्हाण, श्री. संभाजी पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले.

विजेत्या शिवाजी विद्यापीठ संघातील सदस्य
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या शिवाजी विद्यापीठ संघातील खेळाडू (कंसात महाविद्यालय) असे:- अक्षय प्रकाश निकम (के.एन.पी. महाविद्यालय, वाळवा), राहुल अनिल वडार (के.बी.पी. महाविद्यालय, उरुण-इस्लामपूर), सौरभ रविंद्र कुलकर्णी (के.बी.पी. महाविद्यालय, उरुण-इस्लामपूर), ऋषीकेश संभाजी देसाई-कौजलगी (राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, कोल्हापूर), निखील भीमराव पाटील (राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, कोल्हापूर), सौरभ तानाजी पाटील (राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, कोल्हापूर), अक्षय देवानंद पाटील (राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, कोल्हापूर), साईनाथ महादेव कोंडुसकर (राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, कोल्हापूर), रोहित पुरूषोत्तम पाटील (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आसुर्ले-पोर्ले), अनिकेत बाबासाहेब चव्हाण (यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर), संकेत राजू माने (नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अॅन्ड कॉमर्स, इचलकरंजी) आणि रोहन विजय शिंगाडे (कृष्णा महाविद्यालय, रेठरे-बुद्रुक). संघ प्रशिक्षक म्हणून डॉ. रमेश भेंडेगिरी आणि व्यवस्थापक म्हणून डॉ. बाबासाहेब उलपे यांनी काम पाहिले.

प्रेक्षक गॅलरीत कुलगुरूंसह अधिकारी
शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांच्यातील पहिल्या क्रमांकासाठीच्या सामन्यास कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. सामना सुरू करून दिल्यानंतर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी थेट प्रेक्षक गॅलरीकडे कूच केले आणि विद्यार्थ्यांसमवेत गॅलरीत बसून त्यांनी या सामन्याचा आनंद लुटला. यावेळी त्यांच्यासमवेत प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह अन्य अधिकारीही होते.

अंतिम गुणतक्ता
संघ
विजय
पराजय
गुण
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
०३
००
०६
मुंबई विद्यापीठ, मुंबई
०२
०१
०४
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
०१
०२
०२
कोटा विद्यापीठ, कोटा
००
०३
००


Thursday 29 November 2018

शिवाजी व मुंबई विद्यापीठाचे साखळी फेरीत वर्चस्व


पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धा:
औरंगाबाद विद्यापीठाच्या खेळाडूची पकड करण्याच्या प्रयत्नातील शिवाजी विद्यापीठाचे कबड्डीपटू.

औरंगाबाद विद्यापीठाच्या खेळाडूची पकड करण्याच्या प्रयत्नातील शिवाजी विद्यापीठाचे कबड्डीपटू.

कोटा विद्यापीठाच्या खेळाडूची पकड करण्याच्या प्रयत्नातील मुंबई विद्यापीठाचे खेळाडू.

कोटाच्या कबड्डीपटूंची पकड चुकविण्याच्या प्रयत्नातील मुंबई संघाचा खेळाडू.


स्पर्धेचा समारोप उद्या; रंगणार अखेरचे दोन सामने
कोल्हापूर, दि. २९ नोव्हेंबर: येथील शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेतील साखळी सामने आज प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगले. साखळी सामन्यांत यजमान शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ या संघांनी आपली विजयी घोडदौड कायम राखत साखळी फेरीतील आजचे प्रत्येकी दोन सामने जिंकत प्रत्येकी ४ गुणांसह गुणतक्त्यात आघाडी मिळविली.
आज सायंकाळच्या सत्रात यजमान शिवाजी विद्यापीठाचा कोटा विद्यापीठासमवेतचा सामना अत्यंत चुरशीने रंगला. अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात कोटा विद्यापीठाच्या संघाने एकेका गुणासाठी शिवाजी विद्यापीठाच्या संघाला झुंजविले. मात्र, शिवाजी विद्यापीठाने अखेरपर्यंत गुणांची आघाडी कायम राखली आणि सामना ३५-२५ असा जिंकला.
या सत्रात दुसरा सामना मुंबई विद्यापीठ आणि औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यात झाला. अतिशय चुरशीच्या अशा या सामन्यात दोन्ही संघांचा गुणफलक साथीने हलत राहिला. अगदी एक-दोन गुणांचा फरक होत राहिला. अखेरपर्यंत दोन्ही संघांनी आपापल्या विजयाची शक्यता जिवंत राखली. मात्र, अखेरच्या क्षणी मुंबई विद्यापीठाने सामना ४२-४१ असा अवघ्या एका गुणाने जिंकला.
तत्पूर्वी, आज सकाळी यजमान शिवाजी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत प्रत्येकी दोन गुणांची कमाई केली. यजमान शिवाजी विद्यापीठ आणि औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यातील सामना अत्यंत चुरशीने रंगला. अत्यंत तुल्यबळ अशा या दोन्ही संघांनी एकमेकांचा अंदाज घेत खेळाला सावध सुरवात केली. त्यामुळे पहिल्या गुणापासून दहाव्या गुणांपर्यंत सामना बरोबरीत रंगत गेला. तिथून पुढे मात्र शिवाजी विद्यापीठाच्या संघाने आक्रमक पवित्रा घेत आपला खेळ उंचावला आणि गुण वाढवित नेले. उत्तम सांघिक खेळाच्या जोरावर हा सामना शिवाजी विद्यापीठाने ३७-२५ असा जिंकला.
मुंबई विद्यापीठाचा सामना कोटा विद्यापीठाशी झाला. हा सामनाही अत्यंत रंगतदार झाला. काल अतिशय फॉर्ममध्ये असलेला कोटा विद्यापीठाचा संघ मुंबई विद्यापीठाच्या संघासमोर मात्र निष्प्रभ ठरला. मुंबईच्या खेळाडूंनी त्यांच्यावर दबाव कायम राखण्यात यश मिळविले आणि सामना ४१-२५ असा जिंकला.
उद्या सकाळच्या सत्रातील सामने:
१)      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद विरुद्ध कोटा विद्यापीठ, कोटा
२)      शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विरुद्ध मुंबई विद्यापीठ, मुंबई
या सामन्यांनंतर लगेचच कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान समारंभ होईल.
साखळी फेरीतील गुणतक्ता:
संघ
विजय
पराजय
गुण
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
०२
००
०४
मुंबई विद्यापीठ, मुंबई
०२
००
०४
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
००
०२
००
कोटा विद्यापीठ, कोटा
००
०२
००


थाळीफेक सुवर्णविजेत्या कीर्तीकुमारचे कुलगुरूंकडून अभिनंदन

मंगळूर येथे झालेल्या राष्ट्रीय थाळीफेक स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या कीर्तीकुमार बेनके याचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत डॉ. पी.टी. गायकवाड व आर.टी. पाटील.


पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून फैजाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विद्यापीठाच्या महिला खो-खो संघासमवेत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. डॉ. पी.टी. गायकवाड, प्रा. हर्षवर्धन पाचोरे, प्रा. दत्ता मोहिते.


खो-खो महिला संघास राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा
कोल्हापूर, दि. २९ नोव्हेंबर: मंगळूर येथे झालेल्या अखिल भारतीय थाळीफेक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता खेळाडू कीर्तीकुमार जयप्रकाश बेनके आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव येथे झालेल्या पश्चिम विभागीय महिला आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक संपादन करणारा शिवाजी विद्यापीठाचा संघ यांचे आज शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी अभिनंदन केले.
मंगळूर विद्यापीठ, मंगळूर (मोडबीद्री) येथे झालेल्या खिल भारतीय थाळीफेक स्पर्धे (२०१८-१९) चंदगड येथील र.भा. माडखोकर महाविद्यालयाचा खेळाडू कीर्तीकुमार जयप्रकाश बेनके याने (५३.५९ मी.) सुवर्णपदक प्राप्त केले. कोवाड येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्रशिक्षक प्रा.आर.टी.पाटील तसेच कडेगाव येथील कन्या महाविद्यालयाच्या संघ व्यवस्थापक सौ. शिफा मोहिते यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
त्याचप्रमाणे पश्चिम विभागीय महिला आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करून फैजाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विद्यापीठाच्या महिला खो-खो संघालाही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा ७ ते १० डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. संघात करिष्मा रिकीबदार, अमृता कोकीकर,तुजा खाडे, पूजा फातले, ज्योती शिंदे, तनुजा शिंदे, सन्मती कोल्हे, कोमल शिंदे, मोनिका झेंडे, धनश्री भोसले, करिष्मा नगारजी, पल्लवी मर्डी यांचा समावेश आहे. संघ मार्गदर्शक प्रा.हर्षवर्धन पाचोरे, संघ व्यवस्थापक प्रा.दत्ता मोहिते आहेत.
यावेळी विद्यापीठाचे क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, श्री. आर.टी. पाटील उपस्थित होते.