![]() |
| समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शिक्षक आणि विद्यार्थी. |
कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट : कृत्रिम बुद्धिमत्तेचा
पाया हा गणित आणि संख्याशास्त्रामध्ये असून विद्यार्थी आणि शिक्षकांनी या
संदर्भातील मूलभूत संकल्पना भक्कम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे,
असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचा संख्याशास्त्र
अधिविभाग आणि सेंटर फॉर एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर सस्टेनेबल
डेव्हलपमेंट (CoEAISD)
यांच्या संयुक्त
विद्यमाने प्रधान मंत्री उच्चतर शिक्षण अभियान या योजनेअंतर्गत "कृत्रिम
बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग" (Artificial
Intelligence and Machine Learning) या
विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी उद्घाटन
समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरू डॉ. कामत बोलत होते. संख्याशास्त्र
अधिविभागाचे माजी प्राध्यापक डॉ. एस. आर. कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
होते.
कुलगुरू डॉ. कामत
म्हणाले, संख्याशास्त्र विषयाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांकडे कृत्रिम
बुद्धिमत्तेमागील गणितीय व सांख्यिकीय तत्त्वे समजून घेण्याची क्षमता असते.
त्याद्वारे त्यांनी मूलभूत संकल्पनांवर प्रभुत्व मिळवून आधुनिक कृत्रिम
बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आत्मसात करावे. संख्याशास्त्र अधिविभाग आणि सेंटर फॉर
एक्सलन्सने कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण
कार्याचे,
अभ्यासक्रम
विकासाचे आणि शिक्षक प्रशिक्षण उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
डॉ. एस. आर.
कुलकर्णी म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अत्यंत गतीने बदल होत आहेत. ते
समजून घेणे आवश्यक आहे. या झपाट्याने घडणाऱ्या घडामोडींचा आढावा घेत शिक्षकांनी
सतत अद्ययावत ज्ञान आत्मसात करावे. विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत संकल्पनांची भक्कम
पायाभरणी करून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे काळाची गरज असल्याचे त्यांनी
सांगितले.
संख्याशास्त्र
अधिविभागाचे प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांनी स्वागत केले. डॉ. सोमनाथ पवार यांनी प्रास्ताविक
केले. अंजली मंगोरे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. एस. व्ही. राजगुरू यांनी आभार
मानले.
या दोन दिवसीय
प्रशिक्षण कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांतील पदवी आणि
पदव्युत्तर स्तरावरील संख्याशास्त्र विषयाचे शिक्षक तसेच संख्याशास्त्र
अधिविभागाचे विद्यार्थी सहभागी झाले.
कृत्रिम
बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या विविध पैलूंवर डॉ. एस. आर. कुलकर्णी, वारणा
विद्यापीठाचे कुलगुरू तथा शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, श्री. एस. ई.
परिट,
डॉ.
एस. एस. सुतार, डॉ. एस. व्ही. राजगुरू आणि डॉ. एस. डी. पवार
यांनी मार्गदर्शन केले. आर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मशीन लर्निंग तंत्रांची
प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.
संजय गंजावे,
डॉ.
सचिन पाटील,
डॉ.
कुंदन कोंडके, प्रसेनजित कांबळे, शुभम पाटील, संजय पाटील, अमोल चव्हाण आणि
डॉ. उल्का दिंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.




.jpeg)
