Monday, 17 August 2026

शिवाजी विद्यापीठात एसबीआय ई-पे सेवेला प्रारंभ

डिजिटल आर्थिक व्यवस्थापनाच्या दिशेने विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण पाऊल

 

स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक निशांतकुमार जयस्वाल यांचे ग्रंथभेट देऊन शिवाजी विद्यापीठात स्वागत करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. सोबत प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील.

(एसबीआय ई-पे सेवा प्रारंभ लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. १७ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या आर्थिक व्यवहारांना अधिक गतिमान, सुरक्षित, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने एसबीआय ई-पे (SBIePay) – एफएएस (FAS) एकात्मिक व्हाउचर पेमेंट प्रणालीचे आज कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॉम्पसर्व्ह कन्सल्टंट्स यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या ऑनलाइन पेमेंट प्रणालीमुळे विद्यापीठाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये धनादेशाधारित पारंपरिक पद्धतीऐवजी थेट डिजिटल देयक प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. सध्या ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Basis) सुरू करण्यात आली असून, तिचे यश आणि तांत्रिक बाजू तपासून लवकरच ती टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे.

कुलगुरू डॉ. कामत यांनी विद्यापीठाच्या आर्थिक व्यवस्थापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार आर्थिक व्यवहार अधिक वेगवान, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आधुनिक डिजिटल प्रणालींचा स्वीकार आवश्यक असून, एसबीआय ई-पेच्या माध्यमातून विद्यापीठाच्या आर्थिक व्यवहारांना अधिक कार्यक्षम दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही प्रणाली केवळ देयकाची पद्धत बदलणारी नसून विद्यापीठाच्या एकूण डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासातील हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.

धनादेशापासून थेट डिजिटल हस्तांतरणापर्यंत

सध्या व्हाउचर तयार करणे, त्याची तपासणी व मंजुरी, धनादेश तयार करणे, अधिकृत स्वाक्षरी, बँकेत सादरीकरण, क्लिअरिंग, रक्कम जमा होणे आणि त्यानंतर मॅन्युअल ताळमेळ अशा अनेक टप्प्यांतून देयक प्रक्रिया पूर्ण होते. या प्रक्रियेत वेळखाऊ कामकाज, कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर, मॅन्युअल कामाचा भार, क्लिअरिंगला लागणारा वेळ आणि ताळमेळाचे अतिरिक्त काम अशा अडचणी येतात.

नव्या एसबीआय ई-पे –एफएएस एकात्मिक प्रणालीमध्ये एफएएसमध्ये व्हाउचर तयार झाल्यानंतर त्याची मेकर आणि चेकर पातळीवर तपासणी व मंजुरी केली जाते. त्यानंतर एसबीआय ई-पेकडे देयक सूचना पाठविली जाते. एसबीआय ई-पे मार्फत देयक प्रक्रिया पूर्ण होऊन लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण केले जाते. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर युटीआर क्रमांकाद्वारे त्याची पुष्टी होते आणि एफएएसमध्ये व्यवहाराची स्थिती अद्ययावत केली जाते. त्यानंतर लेखांकन, ताळमेळ, डिजिटल नोंद आणि एमआयएस अहवालाची प्रक्रिया सुलभ होते.

जलद, सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहार

एसबीआय ई-पे प्रणालीमुळे देयक प्रक्रिया अधिक जलद होण्याबरोबरच धनादेशमुक्त आर्थिक व्यवहार शक्य होणार आहेत. लाभार्थ्याला थेट रक्कम हस्तांतरित होत असल्याने प्रक्रियेत सुलभता येईल. प्रत्येक व्यवहाराचा युटीआर क्रमांक उपलब्ध असल्याने व्यवहाराचा मागोवा घेणे सोपे होणार असून आर्थिक व्यवहारांच्या नोंदी अधिक सक्षमपणे जतन करता येतील. तसेच बँक ताळमेळाची प्रक्रिया सुलभ होऊन मॅन्युअल कामाचा भार कमी होईल.

या प्रणालीमुळे आर्थिक व्यवहारांवर अधिक मजबूत नियंत्रण, डिजिटल ऑडिट ट्रेल, एमआयएस व स्थिती अहवालाची सुविधा उपलब्ध होणार आहे. परिणामी विद्यापीठाच्या आर्थिक व्यवस्थापनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

ताळमेळ आणि लेखापरीक्षण अधिक सुलभ

जुन्या धनादेश पद्धतीच्या तुलनेत नव्या प्रणालीमध्ये डिजिटल देयक सूचना, थेट इलेक्ट्रॉनिक हस्तांतरण, कागदपत्रांचा कमी वापर, सुलभ किंवा स्वयंचलित ताळमेळ आणि युटीआर आधारित डिजिटल ऑडिट ट्रेल ही वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे व्यवहारांचा मागोवा अधिक प्रभावीपणे घेता येणार असून लेखापरीक्षणासाठी आवश्यक डिजिटल नोंदीही उपलब्ध राहतील.

डिजिटल आर्थिक व्यवस्थापनाची नवी सुरुवात

व्हाउचर तयार करणे, तपासणी व मंजुरी, एसबीआय ई-पेकडे देयक सूचना, थेट बँक हस्तांतरण आणि त्यानंतर एफएएसमध्ये स्थिती अद्ययावत करणे अशी एकात्मिक प्रक्रिया या प्रणालीद्वारे कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या आर्थिक व्यवस्थापनात जलद, सुरक्षित, पारदर्शक, एकात्मिक आणि कार्यक्षम अशा डिजिटल प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते. वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. लेखा परीक्षक दुर्गाली गायकवाड आणि अंतर्गत हिशेब तपासनीस अजित चौगुले यांनी एसबीआय ई-पे प्रणालीचे सादरीकरण केले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक निशांतकुमार जयस्वाल, मुख्य व्यवस्थापक संदीप कुमार, पंकज पाटील, व्यवस्थापक ओवी सहस्त्रबुद्धे, उपव्यवस्थापक संदीप बुचडे, कॉम्पसर्व्ह कन्सल्टंट प्रा.लि., कोल्हापूरचे विनय गुप्ते, शशिकांत खोत यांच्यासह विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य आणि अधिविभागांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment