![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना असेंब्लेज एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन माधवन. |
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना असेंब्लेज एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन माधवन. मंचावर डॉ. विनोद ठाकूरदेसाई आणि सिद्धार्थ शिंदे. |
कोल्हापूर, दि.
२० ऑगस्ट: भारतातील स्थानिक, अस्सल आणि समृद्ध कथा जागतिक दर्जाच्या
अॅनिमेशन व व्हीएफएक्सच्या माध्यमातून जगभर पोहोचविण्याची मोठी संधी आजच्या
पिढीसमोर आहे. ‘ग्लोबल’ होण्यासाठी स्थानिकत्व सोडण्याची नव्हे, तर
आपल्या मातीतल्या कथा अधिक प्रामाणिकपणे आणि जागतिक दर्जाने मांडण्याची गरज आहे. ‘जितके
अधिक स्थानिक, तितके अधिक अस्सल आणि तितकेच अधिक
जागतिक’, असे प्रतिपादन असेंब्लेज एंटरटेनमेंटचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन माधवन यांनी केले.
शिवाजी विद्यापीठात आज ‘फ्रॉम क्लासरुम टू ग्लोबल स्क्रीन: करिअर्स इन अ चेंजिंग क्रिएटिव्ह इंडस्ट्री’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात
आले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या
वतीने राजर्षी शाहू सभागृहात व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते, तर व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे प्रमुख
उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘नागरी
जाणिवा’ या
विषयावर घेण्यात आलेल्या व्यंगचित्र स्पर्धेचे पारितोषिक वितरणही करण्यात आले.
यावेळी अर्जुन माधवन यांनी अॅनिमेशन, व्हीएफएक्स
आणि क्रिएटिव्ह इंडस्ट्रीतील वाढत्या संधींचा वेध घेतला. ते म्हणाले, आज कलाकार, क्रिएटर्स, कथाकार, व्हिज्युअलायझर्स, डिझायनर्स, तंत्रज्ञ
आणि तंत्रज्ञान जाणणाऱ्या व्यक्ती क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये महत्त्वाची भूमिका
बजावत आहेत. या क्षेत्रात केवळ कलात्मक कौशल्य पुरेसे नसून गणित, नियोजन, व्यवस्थापन, तंत्रज्ञान, कृत्रिम
बुद्धिमत्ता, मानवी संबंध आणि उत्पादन व्यवस्थापन
यांसारख्या विविध कौशल्यांचीही मोठी आवश्यकता आहे.
अॅनिमेशन व व्हीएफएक्समध्ये कला आणि
विज्ञान यांचा अनोखा संगम असल्याचे सांगून ते म्हणाले की, पात्रांची
रचना, शरीराची ठेवण, हाडांची
संरचना, टेक्स्चर, त्वचा, केस, कपडे
आदींचे वास्तवदर्शी सादरीकरण करण्यासाठी शरीरशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, पदार्थविज्ञान
आणि रसायनशास्त्राचे ज्ञानही उपयुक्त ठरते. त्यामुळे या क्षेत्रात ‘लेफ्ट ब्रेन’
आणि ‘राइट ब्रेन’ या दोन्ही क्षमतांचा प्रभावी वापर होतो.
भारतात तयार होणाऱ्या दर्जेदार कामाचा
उल्लेख करताना माधवन यांनी जागतिक चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील अनेक
महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये भारतीय स्टुडिओ आणि कलाकारांच्या योगदानाकडे लक्ष
वेधले. भारत पूर्वी जगाचे ‘बॅक ऑफिस’ म्हणून ओळखला जात होता; मात्र
कौशल्य, अनुभव आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या
बळावर भारत आता जागतिक क्रिएटिव्ह इंडस्ट्रीचा ‘बॅकबोन’ बनत असल्याचे त्यांनी नमूद
केले.
कोल्हापूरच्या
कथांमध्ये जागतिक क्षमता
कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या
इतिहास-संस्कृतीत जागतिक स्तरावर पोहोचू शकतील, अशा असंख्य कथा दडलेल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी
ताराबाई, पोवाडे आणि लोकपरंपरांमधील असंख्य कथा
अॅनिमेशन व व्हीएफएक्सच्या माध्यमातून जगासमोर आणता येऊ शकतात, असे
माधवन यांनी सांगितले. स्थानिक कथा अधिक अस्सलपणे मांडल्या गेल्या, तर त्यांचे
वैश्विक आकर्षण वाढते, असे त्यांनी अधोरेखित केले.
‘पहिले
करिअर अंतिम नव्हे’
आपल्या स्वतःच्या कारकिर्दीचे उदाहरण
देताना माधवन यांनी सांगितले की, गणित व अर्थशास्त्राचे शिक्षण
घेतल्यानंतर त्यांनी लंडनमध्ये गुंतवणूक बँकिंग आणि प्रायव्हेट इक्विटी क्षेत्रात
काम केले. अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स क्षेत्रात येईन, असे
त्या काळी स्वतःलाही वाटले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्या
करिअरलाच अंतिम गंतव्य मानू नये. पदवी आपले अंतिम भवितव्य ठरवत नाही, असा
संदेश त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी आपली इच्छाशक्ती, दृष्टिकोन
आणि कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा. आजच्या
इंटरनेटच्या युगात संधींची कमतरता नाही. ‘स्किल सेट’पेक्षा ‘विल सेट’ अधिक
महत्त्वाचा असून योग्य दृष्टिकोन, शिस्त आणि सातत्याच्या बळावर विद्यार्थी
मोठी झेप घेऊ शकतात, असेही
त्यांनी सांगितले.
कलात्मक
अभिव्यक्तीत समाजपरिवर्तनाची मोठी ताकद: सिद्धार्थ शिंदे
यावेळी ‘नागरी
जाणिवा’ या
विषयावर सिद्धार्थ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कलाकारांकडे समाजाला
सकारात्मक आणि विधायक दिशेने नेण्याची अनोखी ताकद असते. व्यंगचित्र, मिमिक्री, लेखन, नाट्य, पटकथा, शॉर्ट
फिल्म, व्हॉइस ओव्हर अशा कलात्मक माध्यमांतून सामाजिक
प्रश्न प्रभावीपणे मांडता येतात आणि लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करता येते.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांकडे केवळ छंद म्हणून न पाहता समाजपरिवर्तनाचे
प्रभावी साधन म्हणून पाहावे, असे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. विलास
शिंदे म्हणाले, व्यंगचित्र हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजातील प्रश्न, विसंगती
आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे अधोरेखित करणारे अत्यंत सामर्थ्यवान
माध्यम आहे. एखाद्या व्यंगचित्रातून हजारो शब्दांत व्यक्त न होणारा आशय थेट
प्रेक्षकाच्या अंतर्मनापर्यंत पोहोचतो. कलात्मक अभिव्यक्तीच्या माध्यमातून जाणीवा
अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचू शकतात, असे त्यांनी सांगितले.
‘नागरी
जाणिवा’ विषयावरील
व्यंगचित्र स्पर्धेचे पारितोषिक वितरण
संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या
वतीने ‘नागरी जाणिवा’ या विषयावरील व्यंगचित्र स्पर्धा घेतली. तिचे पारितोषिक
वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उत्कृष्ट १० व्यंगचित्रांना गौरविण्यात
आले. विद्यार्थ्यांनी ड्रग्स व डोपिंग, विद्यार्थ्यांची
उपस्थिती, नागरिक म्हणून सामाजिक जबाबदारी आणि
परिसरातील समस्या या विषयांवर व्यंगचित्रे काढली. यामध्ये अपूर्वा रमेश गिरी,
धोंडी नारायण ढवळे, दिग्विजय दुधाणे, गुरूनाथ साताप्पा म्हातुगडे, मृण्मयी सदाशिव
पांचाळ, निखिल विजय जाधव, समर्थ औदुंबर शिरोडकर, सोनल विनायक खडकीकर, उन्नती अनिल
पाटील आणि वैष्णवी सदाशिव मदने या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमात डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. मनीष आपटे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाला डॉ.
सरिता ठकार, डॉ. शिवाजी जाधव, अनुप जत्राटकर, बबन माने, विजय उपाध्ये, राजेश
कांबळे, विवेक प्रभू केळुस्कर, विवेक मंद्रुपकर यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.



No comments:
Post a Comment