![]() |
| रवी कोरडे |
कोल्हापूर, दि. २५
ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात
येणारा सन २०२६ चा ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर
यांना तर ‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार’ रवी कोरडे यांना जाहीर करण्यात आला आहे.
नियतकालिकांच्या संपादन व लघुनियतकालिक चळवळीत सक्रीय सहभाग असणाऱ्या सतीश काळसेकर
यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो. शिवाजी विद्यापीठात लवकरच
पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात येईल, अशी माहिती डॉ. रणधीर शिंदे यांनी
दिली आहे.
काळसेकर
कुटुंबियांच्या वतीने सतीश काळसेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेल्या देणगीतून
काव्य क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या कवींना ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’
देण्यात येतो. रुपये २१,०००/- आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे
स्वरूप आहे. तर, आश्वासक कविता लेखन करणाऱ्या तरुण कवीला ‘ऋत्विज काळसेकर पुरस्काराने’
सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप रुपये १०,०००/- आणि सन्मानचिन्ह असे आहे.
‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ
कवयित्री व समीक्षक प्रभा गणोरकर यांना देण्यात येत आहे. प्रभा गणोरकर या मूळच्या
अमरावती येथील असून मराठीतील ज्येष्ठ कवयित्री आणि समीक्षक म्हणून त्यांची
साहित्यविश्वाला ओळख आहे. त्यांचे ‘विवर्त’, ‘व्यतीत’ व ‘व्यामोह’ हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. गणोरकर
यांची कविता पुरुषी पर्यावरणात स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या यातनामय आयुष्याचे
अत्यंत गंभीर व संयत स्वरात केलेलं आर्त प्रकटन आहे. आधुनिक स्त्रीची संवेदनशीलता
व तिच्या अस्तित्वाशी निगडीत वेगवेगळे प्रश्न गणोरकर यांच्या कवितेतून अभिव्यक्त
झाले आहेत. निसर्ग आणि
सृष्टीविषयीचे एक वेगळे संवेदन त्यांच्या काव्यसृष्टीत आहे.
नव्या पिढीतील आश्वासक
काव्य लेखनासाठी दिला जाणारा ‘ऋत्विज काळसेकर पुरस्कार’ हा छत्रपती संभाजीनगर येथील
कवी रवी कोरडे यांना जाहीर झाला. त्यांचे ‘धूसर झालं नसतं गाव’, ‘भुंड्या डोंगरांचे दिवस’ हे महत्वाचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
कृषी जीवनातील पडझड, ग्रामीण व मानवी जीवनातील गुंतागुंत, ग्रामीण माणसाचे
मातीशी असणारे घट्ट नाते, हरवलेल्या भूतकाळ व मातीवरील गाढ निष्ठेची
ही कविता आहे. रवी कोरडे यांना यापूर्वी युवा साहित्य अकादमी पुरस्काराने
गौरविण्यात आले आहे.
काळसेकर काव्य पुरस्काराचे
हे पाचवे वर्ष असून सतीश काळसेकर काव्य पुरस्कार यापूर्वी वसंत आबाजी डहाके, नारायण
कुलकर्णी-कवठेकर, अनुराधा पाटील, अरुणचंद्र गवळी यांना देण्यात आला आहे.
तर ऋत्विज काळसेकर पुरस्कार दिशा पिंकी शेख, वर्जेश सोळंकी, वीरधवल परब, फेलिक्स डिसोजा यांना देण्यात आला आहे.
पुरस्कार निवड समितीचे प्रा. नीतीन रिंढे (मुंबई), प्रा. नंदकुमार मोरे (कोल्हापूर) व प्रा. रणधीर शिंदे यांनी काम पाहिले.


No comments:
Post a Comment