शिवाजी
विद्यापीठाच्या संशोधकांना मिळाले डिझाईन पेटंट
![]() |
| डॉ. अविराज कुळदीप |
![]() |
| डॉ. शरद पाटील |
![]() |
| डॉ. किशोर खोत |
![]() |
| डॉ. के.एम. गरडकर |
![]() |
| डॉ. राहुल माने |
कोल्हापूर, दि. ६ ऑगस्ट: शिवाजी
विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील संशोधक डॉ. अविराज रामचंद्र कुळदीप आणि
त्यांच्या सहकाऱ्यांनी विकसित केलेल्या 'स्मार्ट
कम्पोझिट मटेरियल टेस्टिंग डिव्हाईस'ला
(डिझाईन क्र. 486128-001) भारत सरकारचे पेटंट मंजूर झाले आहे.
डॉ. कुळदीप यांनी दिलेल्या
माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी सेमीकंडक्टर फोटो
कॅटॅलिसिसचा वापर करून रासायनिक डाय डिग्रेडेशन (प्रदूषित रंग घटक नष्ट करणे) पद्धतीवर
आधारित हे उपकरण तयार केले आहे. सदरचे उपकरण ग्राफिटीक कार्बन नायट्रॉइड (g-C3N4) आणि
टायटॅनियम डायऑक्साइड (TiO2) यांच्या प्रगत संयुगापासून तयार केले
आहे. कापड उद्योग (Textile Industries) व रसायनांच्या कारखान्यांतून बाहेर
पडणारे सांडपाणी नदी-नाल्यांमध्ये मिसळल्याने पाण्याचे गंभीर प्रदूषण होते. या
उपकरणाच्या साहाय्याने पाण्यातील घातक आणि विषारी रंग घटक अत्यंत कमी खर्चात नष्ट
केले जाऊ शकतात. उद्योगांना सांडपाणी प्रक्रियेसाठी (Effluent
Treatment) हा एक उत्तम पर्यावरणपूरक पर्याय असून
सर्वसामान्य नागरिकांना प्रदूषणमुक्त, शुद्ध
पाणी मिळवून देण्यासाठी हे संशोधन दिशादर्शक ठरेल. या पेटंटमध्ये डॉ. राहुल मारुती
माने, डॉ. किशोरकुमार खोत, डॉ.
कल्याणराव गरडकर आणि डॉ. शरदचंद्र पाटील यांचा सह-संशोधक म्हणून सहभाग आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला (NEP) पूरक
अशा या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा फायदा थेट समाजाला होणार असल्याने, विद्यापीठाचे
कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, रसायनशास्त्र
विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. चव्हाण आणि इंडस्ट्रियल केमिस्ट्रीचे समन्वयक डॉ. गजानन
राशिनकर यांनी संशोधकांचे अभिनंदन केले आहे.
यूके
पेटंट आणि स्वच्छता सारथी पुरस्कार
डॉ. अविराज कुळदीप राष्ट्रीय आणि
आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने संशोधन करत असून, सन
२०२४ मध्ये त्यांना यूके (UK) डिझाईन पेटंट देखील मिळाले आहे.
याशिवाय कोल्हापूर व इचलकरंजी येथील पंचगंगा नदी प्रदूषणावर त्यांनी केलेल्या
उल्लेखनीय आणि शाश्वत कार्यासाठी केंद्र सरकारचा 'स्वच्छता
सारथी फेलो पुरस्कार-२०२३' त्यांना मिळाला आहे.





No comments:
Post a Comment