Monday, 2 November 2026

शिक्षणातील डिजिटल परिवर्तनासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची: कुलगुरु डॉ. राजनीश कामत

विद्यापीठात तीनदिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उद्घाटन

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या उद्घाटन समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत.

शिवाजी विद्यापीठात आयोजित तीनदिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या उद्घाटन समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. मंचावर डॉ. कृष्णा पाटील, डॉ. प्रतीभा पाटणकर, सूरजकुमार बाबर, डॉ. सुहास पाचपांडे, डॉ. भार्गव वाळुंज आणि विनय शिंदे


(कार्यशाळेची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. २ नोव्हेंबर: शिक्षणातील डिजिटल परिवर्तनासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र व महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आयोजित 'ई -कन्टेन्ट विकसन' या विषयावरील तीन दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेच्या नवनिर्मिती आणि अद्ययावत तंत्रज्ञान केंद्र प्रमुख इंजि. सुरजकुमार बाबर, अमरावती येथील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संगणक विभागाचे डॉ.सुहास पाचपांडे, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे डॉ.भार्गव वाळुंज, उपकुलसचिव विनय शिंदे यांच्यासह विविध अधिविभागांतील सहाय्यक प्राध्यापक उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, ई-कंटेंटचे महत्त्व आजच्या काळात शिक्षण क्षेत्राच्या परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. स्वयम, मूक यांसारख्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नि:शुल्क स्वरूपात ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळते. कारण या कोर्सेसना प्रवेशासाठी कोणतेही शुल्क नसते, केवळ प्रमाणपत्र शुल्क असते. ई-कंटेंटच्या फोरमद्वारे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध केले जाते. यामध्ये ई-टेक्स्ट, ई-ट्युटोरियल्स, वेब रिसोर्सेस, सेल्फ असेसमेंट इत्यादींचा समावेश असतो. शिक्षक अध्यापन कार्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ई-कन्टेन्ट तयार करणे, त्याद्वारे विद्यार्थी व शिक्षकांना प्रभावी अध्ययन-अध्यापन कार्य करता येणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे डॉ.कामत म्हणाले.

सुरजकुमार बाबर म्हणाले, शिक्षकांनी सध्याच्या बदलत्या डिजिटल गरजा ओळखून सर्व शिक्षकांनी  ई-कंटेंट निर्मितीच्या आधुनिक पद्धती समजून घेऊन, दर्जेदार शैक्षणिक साहित्य तयार करणे अपेक्षित आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे ज्ञान पोहोचू शकेल.

यावेळी संचालक डॉ. प्रतीभा पाटणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ.कृष्णा पाटील यांनी परिचय करून दिला. प्रियांका सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नगीना माळी यांनी आभार मानले.

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित कौशल्ये देण्याची गरज: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

शिवाजी विद्यापीठाचा ‘टॅली’समवेत सामंजस्य करार

शिवाजी विद्यापीठाने टॅली एज्युकेशनसमवेत सामंजस्य करारप्रसंगी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, टॅलीच्या उपाध्यक्ष भुवनेश्वरी बी., डॉ. केदार मारुलकर, श्रीनिवास गायकवाड, स्वागत परुळेकर, काव्यश्री नलावडे, चिंतामणी पाटील.


कोल्हापूर, दि. २ नोव्हेंबर: आजच्या काळात विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक शिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यांना तंत्रज्ञानावर आधारित कौशल्ये देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने टॅली एज्युकेशनसमवेत झालेला सामंजस्य करार महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) राजनीश कामत यांनी व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठ आणि टॅली एज्युकेशन अँड डिस्ट्रिब्युशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढण्यास मोठी मदत होईल. तसेच इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणे सुलभ होईल. उद्योग व व्यवसाय क्षेत्राच्या गरजा ओळखून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे आणि हा करार त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.

टॅली एज्युकेशनच्या कार्यकारी उपाध्यक्ष भुवनेश्वरी बी. म्हणाल्या, शैक्षणिक संस्था आणि कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांनी हातात हात घालून काम केले, तरच विद्यार्थ्यांना काळाच्या गरजेनुसार शिक्षण देता येईल. या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना लेखाशास्त्र (अकाउंटिंग) आणि वित्त (फायनान्स) या विषयांचे प्रत्यक्ष व्यावहारिक शिक्षण सवलतीच्या शुल्कात उपलब्ध होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञानच नव्हे, तर प्रत्यक्ष कामाचा अनुभवही मिळेल.

या कराराअंतर्गत टॅलीचे प्रमाणपत्र (सर्टिफिकेट), पदविका (डिप्लोमा) आणि प्रगत पदविका (अॅडव्हान्स्ड डिप्लोमा) असे विविध अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

लेखा, वित्त, जीएसटी व करप्रणाली, वेतन (पे-रोल) आणि साठा व्यवस्थापन यांसाठी टॅली सॉफ्टवेअर व्यापार, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्यामुळे टॅलीचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लेखा व वित्त क्षेत्रात नोकरीच्या तसेच स्वयंरोजगाराच्या अधिक संधी मिळू शकतात. विशेषतः वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. हे अभ्यासक्रम विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांत राबविले जाणार आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होणार आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण मिळण्याची संधी यातून निर्माण होईल.

सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी तर टॅली एज्युकेशनच्या वतीने कार्यकारी उपाध्यक्ष भुवनेश्वरी बी. यांनी स्वाक्षरी केल्या.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, व्यवस्थापन परिषद सदस्य अॅड. स्वागत परुळेकर, अधिसभा सदस्य काव्यश्री नलावडे, मनोज पाटील, श्रीनिवास गायकवाड, डॉ. तेजपाल मोहरेकर, पंकज शहा, गिरीश राठी यांच्यासह वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागातील संशोधक, विद्यार्थी उपस्थित होते. वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. केदार मारुलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. टॅली एज्युकेशनचे सहायक व्यवस्थापक तथा क्षेत्रीय व्यवस्थापक (पश्चिम) श्री. चिंतामणी पाटील यांनी आभार मानले.