कोल्हापुरी
चर्मोद्योगाला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; चर्मकारांना
नव्या संधी उपलब्ध होणार
कोल्हापूर, दि. १९ नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठ आणि
चेन्नई येथील सीएसआयआर-केंद्रीय चर्म संशोधन संस्था (सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट
– सीएलआरआय) यांच्यात आज विद्यापीठाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सामंजस्य करार
करण्यात आला.
या सहकार्यामुळे कोल्हापूरच्या
पारंपरिक चर्मोद्योगाला आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन
आणि कौशल्य प्रशिक्षणाची जोड मिळणार असून, स्थानिक
चर्मकार, पारंपरिक चप्पल उत्पादक आणि
चर्मोद्योगाशी संबंधित कारागिरांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केला.
कुलगुरू डॉ. कामत यांच्यासह
प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, केंद्रीय उच्चशिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव
पाटील आणि केंद्रीय चर्म संशोधन संस्थेचे संचालक डॉ. पी. थनिकैवेलन यांच्या प्रमुख
उपस्थितीत हा सामंजस्य करार झाला.
या सामंजस्य करारामुळे विद्यापीठात
चर्मोद्योगाशी संबंधित संशोधनाला चालना मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आधुनिक
लेदर टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल. स्थानिक
चर्मोद्योगासमोरील विविध तांत्रिक व व्यावसायिक समस्यांचा अभ्यास करून त्यावर
संशोधनाधारित उपाययोजना विकसित करण्यासाठीही या सहकार्याचा उपयोग होणार आहे.
चर्मकार समाजातील कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादन
प्रक्रिया, कौशल्यविकास आणि गुणवत्तावृद्धी
यासंदर्भात प्रशिक्षण देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, कोल्हापूरच्या
चर्मोद्योगाला मोठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. कोल्हापुरी चप्पल ही केवळ
एक वस्तू नसून, ती येथील कारागिरांच्या कौशल्याची, परंपरेची
आणि उद्यमशीलतेची ओळख आहे. या पारंपरिक कौशल्याला आधुनिक विज्ञान आणि
तंत्रज्ञानाची जोड मिळणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठ आणि सीएलआरआय यांच्यातील हा
सामंजस्य करार त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. विद्यापीठातील संशोधन आणि
तांत्रिक ज्ञानाचा लाभ थेट स्थानिक कारागिरांपर्यंत पोहोचवून त्यांच्या
कौशल्यविकासाला, उत्पादनाच्या गुणवत्तेला आणि
व्यवसायवृद्धीला हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. या माध्यमातून पारंपरिक
चर्मोद्योगाचे आधुनिकीकरण करताना त्यातील पारंपरिक कौशल्य आणि सांस्कृतिक वारसाही
जतन केला जाईल.
शिवाजी विद्यापीठ आणि केंद्रीय चर्म
संशोधन संस्था (CLRI) यांच्यात
झालेला सामंजस्य करार हा संशोधन, तंत्रज्ञान
आणि कौशल्यविकासाच्या क्षेत्रातील सहकार्याला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास डॉ. पी. थनिकैवेलन यांनी व्यक्त
केला. विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळा व संशोधन क्षमतेचा उपयोग
स्थानिक चर्मोद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करता येऊ शकतो. कोल्हापुरी
चप्पलांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा वाढविण्यासाठी यापूर्वी सीएलआरआयने केलेल्या
प्रयत्नांचा संदर्भ देत त्यांनी स्थानिक उद्योगांच्या समस्यांवर संशोधनाधारित उपाय
विकसित करण्याची गरज अधोरेखित केली. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यापीठ, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्यातील समन्वय
अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाच्या तसेच संशोधनाच्या नव्या संधी
उपलब्ध होतील, अशी
अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे,
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ.
सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, डॉ. महादेव देशमुख, डॉ. अजय साळी,
डॉ. वर्षा मैंदर्गी, व्यावस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. बबन सातपुते, रसायनशास्त्र
अधिविभागाचे प्रमुख डॉ. संजय चव्हाण, डॉ. राहुल माने, डॉ. सागर डेळेकर, डॉ. संजय
कोळेकर यांच्यासह शिक्षक, अधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment