Saturday 30 April 2022

शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेकडून

राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन

 

शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळास भेट देऊन अभिवादन केले. या प्रसंगी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य.

राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळी पुष्प वाहून अभिवादन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि व्यवस्थापन परिषद सदस्य.


कृतज्ञता पर्वानिमित्त समाधीस्थळास भेट देऊन वाहिली आदरांजली

कोल्हापूर, दि. ३० एप्रिल: राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने राजर्षी शाहू समाधीस्थळी भेट देऊन महाराजांच्या पवित्र स्मृतींना मनोभावे अभिवादन केले. या प्रसंगी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती या प्रमुख उपस्थित होत्या.

शिवाजी विद्यापीठात आज व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने एकत्र आलेल्या व्यवस्थापन परिषद सदस्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने समाधीस्थळास भेट देऊन छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचे ठरविले. त्यानुसार सायंकाळी बैठक संपल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह सर्व व्यवस्थापन परिषद सदस्यांनी समाधीस्थळास भेट देऊन राजर्षी शाहू महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती याही उपस्थित होत्या. त्यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह सर्वच सदस्यांसमवेत शिवाजी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांबाबत चर्चा केली. विशेषतः राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षानिमित्ताने विद्यापीठ राबवित असलेल्या उपक्रमांबाबत जाणून घेतले. डॉ. भारती पाटील यांनी त्यांना या कार्यक्रमांबाबत माहिती दिली.

यावेळी व्यवस्थापन परिषदेचे कुलपती नियुक्त सदस्य अमित कुलकर्णी यांच्यासह श्री. जी.आर. पळसे, डॉ. आर.के. कामत, अॅड. धैर्यशील पाटील, संजय जाधव, डॉ. मेघा गुळवणी, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. आर.जी. कोरबू, डॉ. योजना यादव, डॉ. प्रकाश कुंभार आदी उपस्थित होते.

Friday 29 April 2022

धर्माधारित संकुचित विचारधारा देशहितासाठी घातक: डॉ. अशोक चौसाळकर

 

शिवाजी विद्यापीठात 'गांधी विचार: आकलन व औचित्य' या त्रिखंडात्मक ग्रंथाचे प्रकाशन करताना डॉ. किशोर बेडकीहाळ, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. अरूण भोसले आणि डॉ. भारती पाटील.


‘गांधी विचार: आकलन व औचित्य’ या त्रिखंडात्मक ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

 

कोल्हापूर,  दि. २९ एप्रिल: धर्मावर आधारित संकुचित विचारधारा राजकीय सत्ता मिळवून देईल, पण अंतिमतः देशहितासाठी ती घातक ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने ‘गांधी विचार: आकलन व औचित्य’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ‘गांधी विचार: समकालीन संदर्भ’ या विषयावर ते बोलत होते.

कार्यशाळेत ‘गांधी विचार: आकलन व औचित्य’ या त्रिखंडात्मक ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन डॉ. अशोक चौसाळकर व किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते करण्यात आले. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुण भोसले होते.

डॉ. चौसाळकर म्हणाले, लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला असला पाहिजे. राजकीय पक्षांतर्गत लोकशाही असली पाहिजे. परंतु आज असे दिसून येत नाही. जातीय आणि धार्मिक सौहार्द बिघडविण्याचे प्रयत्न होत आहेत. यामुळे देशाची प्रतिमा मलीन होते आहे. महात्मा गांधींनी आयुष्यभर अशा कुरापतखोर राज्यकर्त्यांचा विरोध केला. धर्म आणि राष्ट्र याबाबत महात्मा गांधींची भूमिका स्पष्ट होती. त्यांनी धर्मावर आधारित राष्ट्रवादाचा कधीही पुरस्कार केला नाही. त्यांचे विचार समाजात दुही पसरवणारे नव्हे, तर ऐक्य निर्माण करणारे आहेत.

अध्यक्षीय मनोगतात डॉ भोसले म्हणाले, गांधीविचार साचेबद्ध आणि बंदिस्त नाहीत, तर ते प्रवाही व मानवजातीच्या प्रगतीसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत. हे विचार आजच्या काळात कधी नव्हे इतके औचित्यपूर्ण बनले आहेत.’

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात किशोर बेडकिहाळ यांनी गांधीजींची धर्मकल्पना आणि आजचे वास्तव या विषयावर, तर तिसऱ्या आणि चौथ्या सत्रामध्ये अनुक्रमे गांधीजींचा राष्ट्रवाद व चौथी औद्योगिक क्रांती या विषयांवर डॉ. चैत्रा रेडकर व विजय तांबे यांनी मांडणी केली. या कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक सहभागी झाले.

साधना प्रकाशनाच्या गांधींवरील त्रिखंडात्मक ग्रंथांचे संपादन किशोर बेडकिहाळ, डॉ. अशोक चौसाळकर व रमेश ओझा यांनी केले आहे. याप्रसंगी डॉ. चैत्रा रेडकर व डॉ. भारती पाटील यांनी तिन्ही खंडांवर मनोगत व्यक्त केले. केंद्राच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सचिन भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.


Thursday 28 April 2022

कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शन वाचकांसाठी पर्वणी: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

मा. कुलगुरू यांची ग्रंथ प्रदर्शनावरील प्रतिक्रिया (व्हिडिओ)


 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल परिसरात आयोजित विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक सोनाली नवांगुळ आणि किरण गुरव. सोबत (डावीकडून) जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आणि डॉ. नमिता खोत आदी.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल परिसरात आयोजित विशेष ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक सोनाली नवांगुळ आणि किरण गुरव, डॉ. नमिता खोत, डॉ. डी.बी. सुतार आदी.

ग्रंथ प्रदर्शनातील राजर्षी शाहूंविषयीच्या ग्रंथांचा समावेश असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या विशेष दालनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार.

शिवाजी विद्यापीठाच्या स्टॉलचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार. सोबत (डावीकडून) डॉ. नमिता खोत, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, उदय गायकवाड, सोनाली नवांगुळ आदी.

प्रदर्शनातील पुस्तकांविषयी चर्चा करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व जिल्हाधिकारी राहुल रेखावार.

ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावरील ११० ग्रंथांचे विद्यापीठाचे विशेष दालन

कोल्हापूर, दि. २८ एप्रिल: राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेले विशेष ग्रंथ प्रदर्शन वाचकांसाठी एक पर्वणी ठरणार असून ते आबालवृद्धांसाठी ऊर्जादायी आहे. या संधीचा करवीरवासियांनी पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले. छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावरील ११० ग्रंथांचे शिवाजी विद्यापीठाचे विशेष दालन हे या प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता पर्वानिमित्त आज सकाळी श्री छत्रपती शाहू मिल परिसरात विशेष ग्रंथ प्रदर्शनास मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. कोल्हापुरातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक किरण गुरव आणि सोनाली नवांगुळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ग्रंथ प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिर्के, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर आदी प्रमुख उपस्थित होते.

उद्घाटनानंतर कुलगुरू डॉ. शिर्के व जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासह मान्यवरांनी प्रदर्शनात सहभागी विविध ग्रंथ प्रकाशक व वितरकांच्या स्टॉल्सची पाहणी केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विविध शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थीही उपस्थित होते. त्यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.

सदर ग्रंथ प्रदर्शनात राज्यभरातील ५८ प्रकाशक सहभागी झाले असून एकूण ९५ स्टॉल्स लावण्यात आले आहेत. त्याद्वारे या प्रदर्शनात सुमारे ५० हजारांहून अधिक ग्रंथ उपलब्ध आहेत. शाहू महाराजांच्या जीवनावरील ४४ प्रकाशित प्रबंध आणि संशोधन उपलब्ध आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या ज्ञान महोत्सवात वाचकांना पुस्तक खरेदीवर १० ते ४० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठ आणि करवीर नगर वाचन मंदिर यांनी केवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावरील ग्रंथांची विशेष दालने मांडली आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या दालनात शाहूंविषयीचे ११० ग्रंथ आणि 'कनवा'च्या दालनात ४० ग्रंथ वाचक रसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती डॉ. नमिता खोत यांनी या प्रसंगी दिली.

Tuesday 26 April 2022

रशिया-युक्रेन युद्धाचे जगावर दूरगामी परिणाम: डॉ. अशोक चौसाळकर

 

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करताना केंद्राचे संचालक डॉ. डी.के. मोरे. सोबत डॉ. एस.एल. गायकवाड, डॉ. नितीन रणदिवे, चंद्रकांत कोतमिरे, डॉ. पी.एन. देवळी.

डॉ. अशोक चौसाळकर


कोल्हापूर, दि. २६ एप्रिल: सध्या युरोपात सुरु असलेले रशिया - युक्रेन युद्ध एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे युद्ध असून भारतासह जगभरावर त्याचे दूरगामी परिणाम होतील, असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठातील दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण  केंद्रामार्फत आजादी का अमृत महोत्सव आणि शिवाजी विद्यापीठ हीरक महोत्सवानिमित्त राज्यशास्त्र विषयांतर्गत आयोजित “भारतातील बदलते राजकीय अंतरंग” या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेत रशिया - युक्रेन युद्ध- भारतावरील परिणाम  या विषयावर ते बोलत होते. केंद्राचे संचालक डॉ. डी.के. मोरे अध्यक्षस्थानी होते, तर उपकुलसचिव डॉ. एन. जे. बनसोडे, चंद्रकांत कोतमिरे प्रमुख उपस्थित होते.

डॉ.चौसाळकर म्हणाले, युरोपच्या भूमीवर ७५ वर्षानंतर प्रथमच युद्ध होत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघ निर्माण झाला. या युद्धानंतर संयुक्त राष्ट्र संघाची ताकद मर्यादित झाली. नाटोसारख्या संघटनांमध्ये सामील झाल्यास हल्ला होणार नाही, ही भावना युक्रेनची होती. युएन वा नाटोचा युक्रेन सदस्य नव्हता, परंतु यातील सदस्य राष्ट्रांशी त्याचे मित्रत्वाचे संबंध होते. तसेच, रशियाचे सत्ता सामर्थ्य वाढलेले होते. विस्तारवादाकडे रशियाचा कल होता. गेल्या २०-२२ वर्षांच्या कालखंडात पुतीन यांचे साम्राज्य वाढत होते. अशातच या युद्धामध्ये कुणीही हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळे बळी तो कान पिळी अशी अवस्था निर्माण झाली आहे.

डॉ. चौसाळकर म्हणाले, या युद्धाने जागतिक राजकारणात मोठे बदल झालेले आहेत. पेट्रोल, इंधन, अत्याधुनिक शस्त्रास्रे आणि अन्नधान्य निर्यात यामुळे रशियाची अर्थ व्यवस्था सुरळीत सुरु होती. तसेच, या युद्धामध्ये युरोपातील अनेक देशांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. याचा भारतावर विशेष परिणाम होत आहे. जैव तेलाच्या किंमतीत वाढ होत असून महागाई वाढत आहे. भारतातील खाद्य तेलाच्या किंमती वाढत आहेत. या युद्धामुळे मनुष्य व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे विस्थापितांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोरोनानंतरच्या या युद्धामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत.

डॉ. एस.डी. भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ. एस.एल. गायकवाड यांनी परिचय करून दिला. डॉ. पी.एन. देवळी यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक डॉ.नितीन रणदिवे यांनी आभार मानले.

Monday 25 April 2022

प्रोब स्टेशनविषयक संशोधनाला मिळाले भारतीय पेटंट

 तीन जणांच्या चमूत शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. तुकाराम डोंगळे यांचा सहभाग

डॉ. तुकाराम डोंगळे

प्रा. सुनील कदम

प्रा. सचिन चव्हाण


कोल्हापूर, दि. २५ एप्रिल: शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी या अधिविभागातील डॉ. तुकाराम डोंगळे यांच्यासह येथील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या मेकॅनिकल इंजीनिरिंग शाखेचे विभाग प्रमुख प्रा. सुनील कदम तसेच पुणे येथील भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्रा. सचिन चव्हाण यांनाप्रोब स्टेशन फॉर मेजरींग सेमी-कंडक्टर डिव्हाइसेसया उपकरणासाठी पेटेंट प्राप्त झाले आहे.

सदरचे उपकरण अत्यंत कमी खर्चात तयार करण्यात आले असून त्याचा उपयोग सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे विविध गुणधर्म तपासण्यासाठी होणार आहे. हे उपकरण सूक्ष्म डिव्हाइसेस जसे की, ट्रान्झिस्टर, एलडी, डायोड आणि मेमरी डिवाइस यांचे गुणधर्म तपासण्यासाठी उपयुक्त होऊ शकतो. सदरचे उपकरण आपल्याला सध्या अन्य देशांतून आयात करावे लागते. परंतु स्वदेशी बनावटीच्या या उपकरणाच्या निर्मितीमुळे यावरील आयात खर्चही वाचविता येणे शक्य होणार आहे.

सदरच्या उपकरणांमध्ये एकूण सात प्रमुख घटक आहेत. यामध्ये बेस, चक, प्लॅन्टन, कॅमेरा, तापमान  नियंत्रक मायक्रो मॅनिप्युलेटर यांचा समावेश आहे. या उपकरणाचा उपयोग सध्या शिवाजी विद्यापीठातील नॅनोसायन्सचे बी. एस्सी, एम. एस्सी. संशोधक विद्यार्थी आपल्या संशोधनासाठी करत असून अनेक विद्यार्थ्यांनी आपले संशोधक प्रकल्प पूर्ण केले आहेत. अशा प्रकारे सदरचे उपकरण हे नॅनोसायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रामधील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन वृद्धीसाठी उपयुक्त ठरत आहे. अशा प्रकारच्या संशोधनातून अधिकाधिक उपयुक्त साधनसुविधांची निर्मिती होणेही अपेक्षित आहे.

सदरचे पेटबाबत महाराष्ट्राचे कृषी राज्यमंत्री तथा सेक्रेटरी, भारती विद्यापीठ, पुणे डॉ. विश्वजीत कदम, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत तसेच भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे.