शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. जी.डी. यादव. मंचावर (डावीकडून) कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, अरविंद देशपांडे आणि डॉ. एम.एस. देशमुख. |
डॉ. जी.डी. यादव |
कोल्हापूर, दि. ९ एप्रिल: सध्या मानवजातीपुढे
इंधन दरवाढीसह ग्लोबल वॉर्मिंगसारखी अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आव्हाने उभी
आहेत. त्यावर उपाययोजना करावयाच्या, तर नवसंशोधन व नवोपक्रमास चालना देण्याखेरीज
पर्याय नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ ‘पद्मश्री’ डॉ. जी.डी. यादव
यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे सेंटर फॉर इनोव्हेशन,
इनक्युबेशन अँड लिंकेजिस, एसयुके संशोधन व विकास फौंडेशन (सेक्शन-८ कंपनी) आणि सांगली
येथील सिस्टेड फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टार्ट-अप सूत्रा’ या मालिकेअंतर्गत आयोजित ‘नवोपक्रमातून
राष्ट्रबांधणी’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील
प्रमुख उपस्थित होते.
डॉ. यादव म्हणाले, प्रत्येक तरुणाने
आता स्वतःचे ध्येय-धोरण ठरविण्याची हीच योग्य वेळ आहे. भविष्यात पदवी मिळाल्यानंतर
नोकरी मागण्याऐवजी नोकऱ्यांची निर्मिती करण्याचे ध्येय प्रत्येक विद्यार्थ्याने
बाळगले पाहिजे. आयुष्यात यशस्वी व्हावयाचे असल्यास स्वतःची भाषा उत्तम व्याकरणासह
आली, तरच आपल्याला अन्य भाषाही उत्तम पद्धतीने येतील. विद्यापीठे ही तर नवसंशोधन आणि
नवोपक्रमाची महत्त्वाची केंद्रेच आहेत. त्यांनी विद्यार्थीकेंद्रित अभ्यासक्रम सुरू
केले पाहिजेत. त्याचप्रमाणे नवसंशोधन व नवोपक्रमास चालना देत राहायला हवे. शिवाजी विद्यापीठाने
या अनुषंगाने एक पाऊल पुढे टाकून स्वतःची सेक्शन-८
कंपनी सुरू करून विद्यार्थ्यांच्या उद्यमशीलतेला बळकटी दिली आहे. त्याचा फायदा
विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.
विद्यार्थ्यांना उद्देशून डॉ. यादव
पुढे म्हणाले, आपण जी गोष्ट करतो, तिला कमी लेखू नका कारण त्यातूनच नवकल्पना आणि
उद्योग सुरू होऊ शकतात. संशोधनाचे पेटंट घेणे आणि त्यांचे प्रकाशन करणे तसेच
त्यापुढे जाऊन स्वतःचा उद्योग सुरू करून उत्कर्ष साधण्याचे ब्रीद विद्यार्थ्यांनी
बाळगले पाहिजे. विद्यापीठाने आंतर-विद्याशाखीय संशोधनास चालना देत राहिले पाहिजे. मुलींसाठी
पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण आपण जर मोफत करू शकलो, तर बऱ्याच मुली संशोधनाच्या
क्षेत्रामध्ये येऊ शकतील. सध्याच्या इंधन दरवाढीस आणि जागतिक तापमान वाढ रोखण्यास
हायड्रोजनसारखे स्वस्त इंधन हा पर्याय होऊ शकतो. त्या दृष्टीने विद्यापीठाने
संशोधनात्मक पाऊले टाकण्याची गरज आहे. याकरिता माजी विद्यार्थ्यांनीही मदतीसाठी पुढे
येणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील म्हणाले,
विद्यार्थ्यांनी समाजाचे काय प्रश्न आहेत, यांचा सातत्याने शोध घेत राहायला हवे. या
प्रश्नांवर काम करून नवनवीन उद्योग करावेत. आपल्या मनात एखादी संकल्पना आल्यास
त्याचे तंत्रज्ञानामध्ये किंवा एखाद्या उत्पादनामध्ये रुपांतरण कसे करता येईल, या
दृष्टीने विद्यापीठ या केंद्राच्या माध्यमातून तत्पर आहे, याची ग्वाही त्यांनी
दिली. विद्यार्थ्यांनी अपयशाची भिती न बाळगता नवसंकल्पना व नवसंशोधनाचे उपक्रम
हाती घेत राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
यांच्या हस्ते सिस्टेड फाऊंडेशनचे
प्रा. भालबा केळकर व डॉ. सुहास खांबे यांनी लिहीलेल्या 'नवशोधन:
मंत्र आणि तंत्र' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी केंद्राचे संचालक डॉ. एम.एस.
देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सेक्शन-८ कंपनीचे मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ. पी.डी. राऊत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अभियंते हर्षवर्धन
पंडित यांनी प्रकाशित पुस्तकाविषयी माहिती दिली. उद्योजक अरविंद देशपांडे यांनी
आभार मानले.
It was pleasure listening to the addressal by Dr G.D Yadav sir and Dr Patil Sir. I call it one of the finest and the boldest addressal ever . Thank you for the wonderful opportunity.
ReplyDelete