Thursday, 28 April 2022

कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शन वाचकांसाठी पर्वणी: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

मा. कुलगुरू यांची ग्रंथ प्रदर्शनावरील प्रतिक्रिया (व्हिडिओ)


 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल परिसरात आयोजित विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक सोनाली नवांगुळ आणि किरण गुरव. सोबत (डावीकडून) जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आणि डॉ. नमिता खोत आदी.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल परिसरात आयोजित विशेष ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक सोनाली नवांगुळ आणि किरण गुरव, डॉ. नमिता खोत, डॉ. डी.बी. सुतार आदी.

ग्रंथ प्रदर्शनातील राजर्षी शाहूंविषयीच्या ग्रंथांचा समावेश असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या विशेष दालनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार.

शिवाजी विद्यापीठाच्या स्टॉलचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार. सोबत (डावीकडून) डॉ. नमिता खोत, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, उदय गायकवाड, सोनाली नवांगुळ आदी.

प्रदर्शनातील पुस्तकांविषयी चर्चा करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व जिल्हाधिकारी राहुल रेखावार.

ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावरील ११० ग्रंथांचे विद्यापीठाचे विशेष दालन

कोल्हापूर, दि. २८ एप्रिल: राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेले विशेष ग्रंथ प्रदर्शन वाचकांसाठी एक पर्वणी ठरणार असून ते आबालवृद्धांसाठी ऊर्जादायी आहे. या संधीचा करवीरवासियांनी पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले. छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावरील ११० ग्रंथांचे शिवाजी विद्यापीठाचे विशेष दालन हे या प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता पर्वानिमित्त आज सकाळी श्री छत्रपती शाहू मिल परिसरात विशेष ग्रंथ प्रदर्शनास मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. कोल्हापुरातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक किरण गुरव आणि सोनाली नवांगुळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ग्रंथ प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिर्के, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर आदी प्रमुख उपस्थित होते.

उद्घाटनानंतर कुलगुरू डॉ. शिर्के व जिल्हाधिकारी रेखावार यांच्यासह मान्यवरांनी प्रदर्शनात सहभागी विविध ग्रंथ प्रकाशक व वितरकांच्या स्टॉल्सची पाहणी केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विविध शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थीही उपस्थित होते. त्यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.

सदर ग्रंथ प्रदर्शनात राज्यभरातील ५८ प्रकाशक सहभागी झाले असून एकूण ९५ स्टॉल्स लावण्यात आले आहेत. त्याद्वारे या प्रदर्शनात सुमारे ५० हजारांहून अधिक ग्रंथ उपलब्ध आहेत. शाहू महाराजांच्या जीवनावरील ४४ प्रकाशित प्रबंध आणि संशोधन उपलब्ध आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या ज्ञान महोत्सवात वाचकांना पुस्तक खरेदीवर १० ते ४० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठ आणि करवीर नगर वाचन मंदिर यांनी केवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावरील ग्रंथांची विशेष दालने मांडली आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या दालनात शाहूंविषयीचे ११० ग्रंथ आणि 'कनवा'च्या दालनात ४० ग्रंथ वाचक रसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती डॉ. नमिता खोत यांनी या प्रसंगी दिली.

No comments:

Post a Comment