शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. सुरेंद्र जोंधळे. |
शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. सुरेंद्र जोंधळे. मंचावर (डावीकडून) डॉ. एस.एस. महाजन, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे. |
कोल्हापूर, दि. १४
एप्रिल: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना लोकशाही म्हणजे केवळ शासनव्यवस्था नव्हे, तर नागरिकांची मूल्याधिष्ठित जीवनशैली
आणि त्यामधील सामाजिक नैतिकता व बुद्धीप्रामाण्यवाद अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन
ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या
वतीने डॉ. आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित फुले-शाहू-आंबेडकर
सप्ताहाच्या समारोप समारंभात ‘डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांचे लोकशाहीविषयक विचार’ या विषयावर ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात
झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर
प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा ‘एक
व्यक्ती, एक मूल्य’
हा प्रवास आपल्याला घटनात्मक नैतिकतेच्या जोपासनेतून पूर्ण करावयाचा असल्याचे
सांगून डॉ. जोंधळे म्हणाले, व्यक्तीस्वातंत्र्य, आत्मप्रतिष्ठा आणि व्यक्तीचे
अबाधित हक्क या तीन बाबी बाबासाहेबांना राजकीय लोकशाहीमध्ये अभिप्रेत होत्या.
त्यात व्यक्तीचे सार्वभौमत्व हे सामायिक असल्याखेरीज खरी लोकशाही अस्तित्वात येणार
नाही, असे त्यांचे मत होते. त्यामुळेच समान नागरिकत्व आणि समान प्रतिनिधित्व यांना
बाबासाहेबांच्या घटनात्मक उदारमतवादामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील राजकीय
बहुमत हे जातिभेदाने प्रेरित आहे. येथील संसदीय लोकशाहीतील अंतर्विरोधाचे निराकरण
शक्य तितक्या लवकर होणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय समाजाने विभूतीपुजेचा त्याग करून
सार्वजनिक विवेक विकसित करण्याची गरजही बाबासाहेबांनी अधोरेखित केलेली होती.
भारतातील लोकशाहीचे म्हणूनच राजकारण, समाजकरण व अर्थकारण या अनुषंगाने चिंतन आवश्यक
असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. आंबेडकर हे जागतिक प्रबुद्ध युगाचे विचारवंत असल्याचे सांगून डॉ. जोंधळे
पुढे म्हणाले, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून
नव्हे, तर बुद्धतत्त्वज्ञानापासून घेतल्याचे प्रतिपादन बाबासाहेब करतात. तथापि,
भारतीय समाजात बंधुभावाचा खूप मोठा अभाव आहे. तो निर्माण करण्याची निकड बाबासाहेबांना
वाटत होती. कारण बंधुभावाची भावना निर्माण झाल्याखेरीज स्वातंत्र्य व समता या
मूल्यांना काहीच अर्थ नाही, याची जाणीव त्यांना होती. बाबासाहेबांच्या लोकशाहीत तसेच
‘देशविचारा’त धर्मनिरपेक्षता, बहुलवाद आणि सामाजिक व राजकीय समता
यांचा समावेश आहे. या राष्ट्रात लोकशाही मूल्यात्मक पातळीवर अस्तित्वात आहे, मात्र
ती व्यावहारिक पातळीवरही प्रस्थापित करण्यासाठी अद्यापही दीर्घ वाटचाल करावी
लागणार आहे. जगभर लोकशाहीला जे ग्रहण लागलेले आहे, त्या पार्श्वभूमीवर तर या
बाबीचा अत्यंत गांभिर्याने विचार करावा लागणार आहे. बाबासाहेबांनी भारतीय
लोकशाहीची संहिता आपल्याला राज्यघटनेच्या माध्यमातून केव्हाच दिलेली आहे.
त्याबरहुकूम आपण अंमलबजावणी करण्याची आज मोठी गरज आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
अभिप्रेत लोकशाहीच्या विचारांपासून आणि त्यांच्या अंमलबजावणीपासून आपण किती जवळ
अथवा किती दूर आहोत, याचे आत्मपरीक्षण करण्याचा हा कालखंड आहे. सर्वच क्षेत्रांत
निर्माण झालेल्या नैतिकतेच्या अभावाकडे आपण नागरिक म्हणून कोणत्या दृष्टीकोनातून
पाहतो, याचाही विचार केला जाणे महत्त्वाचे आहे. सांविधानिक मूल्ये जपण्याची आणि
जोपासण्याची आज कधी नव्हे इतकी गरज निर्माण झाली आहे.
यावेळी केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
डॉ. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी
आभार मानले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, डॉ.
पी.एन. वासंबेकर, डॉ. भारती पाटील, डॉ. पी.एस. कांबळे, डॉ. निखिल गायकवाड, डॉ.
आर.जी. सोनकवडे, डॉ. भरत नाईक, अभय जायभाये यांच्यासह अधिविभाग प्रमुख, शिक्षक,
प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेत प्रसाद लोखंडे व विदिरा विभुते
प्रथम
फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रातर्फे पदवीस्तर
आणि पदव्युत्तर अशा दोन गटांत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे पारितोषिक
वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
पदव्युत्तर गट: प्रथम- प्रसाद सुहास लोखंडे (शिवाजी
विद्यापीठ, कोल्हापूर), द्वितीय- तेजस्विनी संजय पांचाळ (वाणिज्य महाविद्यालय,
कोल्हापूर), तृतीय- प्रिती राजेंद्र हेगडे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर),
उत्तेजनार्थ १- कैलास आदित मेहाडा (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), उत्तेजनार्थ २-
ऋषिकेश प्रताप घाटुगडे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर).
पदवीस्तर गट: प्रथम- विदिरा राजाराम विभुते (विवेकानंद
महाविद्यालय, कोल्हापूर), द्वितीय- संकेत कृष्णात पाटील (भारती विद्यापीठाचे
अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर), तृतीय- गुरूराज लक्ष्मण रसाळ (इस्माईलसाहेब
मुल्ला कायदे महाविद्यालय, सातारा), उत्तेजनार्थ १- इंद्रजा विठ्ठल गोरे (विवेकानंद
महाविद्यालय, कोल्हापूर), उत्तेजनार्थ २- श्रुती राजाराम कांबळे (वासंतीदेवी पाटील
फार्मसी संस्था, कोडोली), उत्तेजनार्थ ३- शुभांगी दशरथ माने (राजे रामराव
महाविद्यालय, जत)
No comments:
Post a Comment