शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. अविनाश सप्रे. मंचावर (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. संतोष कोटी, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्रा. अशोक बाबर व राहुल पवार. |
कोल्हापूर, दि. १८ एप्रिल: गो. मा. पवार यांच्या विवेकनिष्ठ जीवनदृष्टीची आजच्या साहित्यसृष्टीला मोठी गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. अविनाश सप्रे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे
पहिले विभागप्रमुख डॉ. गो. मा. पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी 'गो. मा. पवार : व्यक्ती आणि विचार' या विषयावर साहित्यचर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या
नीलांबरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के होते.
प्रा. सप्रे म्हणाले, गो.मा. पवार यांनी मराठीत
नवा समीक्षाविचार निर्भीडपणे मांडला. त्यांनी लिहिलेले लेख
आजच्या समीक्षकांसाठीही मार्गदर्शक स्वरुपाचे आहेत.
यावेळी गो. मा. पवार यांच्या
अनेक आठवणींमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कार्यपद्धतीची ओळख
प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी करून दिली. गो. मा. पवार हे मराठीतील एक स्कूल
होते. या स्कूलमुळे अनेक विद्यार्थ्यांना साहित्याकडे बघण्याची
नवी दृष्टी मिळाली, असे मत प्राचार्य
अशोक बाबर यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, गो. मा. पवार यांनी मराठी विभागाला कामाची आणि विचारांची एक
शिस्त लावून दिली आहे. पुढील वाटचालीसाठी एक वस्तुपाठ घालून दिला
आहे. त्यानुसार हा विभाग
वाटचाल करतो आहे, याचा आनंद वाटतो.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर
शिंदे यांनी केले. याप्रसंगी गो. मा. पवार यांचे चिरंजीव राहुल पवार यांच्यासह त्यांचे विद्यार्थी, शिक्षक व मराठी विभागातील
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेश पाटील यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. संगीता मोहिते यांनी आभार मानले, तर सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment