शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना प्रा. राजमल जैन. समोर उपस्थित श्रोते. |
शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान अधिविभागात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना प्रा. राजमल जैन. |
कोल्हापूर, दि. ६ एप्रिल: अंतराळातील उच्च ऊर्जा किरणोत्सर्ग
अर्थात गॅलॅक्टिक कॉस्मिक किरणांमुळे पृथ्वीच्या हवामानावर मोठा परिणाम होत असून
त्याच्या प्रभावामुळेच वातावरणातील बदलांना सामोरे जावे लागत आहे, असे प्रतिपादन
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अवकाश सास्त्रज्ञ प्रा. राजमल जैन यांनी आज येथे केले.
आजादी का अमृतमहोत्सव आणि शिवाजी विद्यापीठाचा हिरक
महोत्सव या निमित्ताने विद्यापीठाचा पदार्थविज्ञान अधिविभाग आणि अवकाश संशोधन
केंद्र, पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. जैन यांचे ‘सोलर इन्फ्ल्युएन्स ऑन दि अर्थ इन ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात
आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
प्रा. जैन म्हणाले, चालू एकविसाव्या शतकात सूर्यावरील चुंबकीय बदलांमुळे सौरडाग आणि सौरवादळे तसेच
ग्लिसबर सायकल आणि त्या अनुषंगानेही पृथ्वीवरील वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल संभवतात. गेल्या काही वर्षांपासून सौर डागांची संख्या कमी कमी होत
आहे आणि त्यामुळे पृथ्वीकडे येणारी सौर विकिरणे कमी झाली आहेत. अशा वेळी अंतराळातील उच्च-ऊर्जा किरणोत्सर्ग (गॅलेक्टिक कॉस्मिक किरणे) पृथ्वीच्या वातावरणामध्ये
सहज प्रवेश करतात आणि ढगांचे आवरण वाढवून पृथ्वीच्या हवामानावर
परिणाम करतात. ही कॉस्मिक किरणे
समुद्राच्या तळाशी घन रूपामध्ये असलेल्या कार्बन डायऑक्साईडचे विघटन करत आहेत. त्यामुळे समुद्राच्या
पाण्याचे तापमानही वाढत आहे. येत्या काही वर्षांमध्ये सोळाव्या शतकात जसे हिमयुग आले होते, तसे येईल आणि त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात साथीचे आजार सुद्धा वाढण्याचा धोका असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुरवातीला पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. के.वाय. राजपुरे यांनी प्रा.
जैन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रथमेश चौगुले यांनी प्रास्ताविक, ऐश्वर्या फडतरे यांनी परिचय करून दिला. वेदिका चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रतीक्षा कुंभार यांनी आभार मानले.
या व्याख्यानास पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. के. वाय. राजपुरे, पन्हाळा अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. आर. एस. व्हटकर, डॉ. व्ही.जे. फुलारी, डॉ. आर. जी. सोनकवडे, डॉ. एम.व्ही. टाकळे, डॉ. व्ही. आर. पुरी,
डॉ. एन.एल. तरवाल,
डॉ. सिबा दास,
डॉ. तृप्ती उरुणकर,
डॉ. उमेश चौगुले यांच्यासह विद्यार्थी आणि कोल्हापुरातील विज्ञानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment