कोल्हापूर, दि. ८ एप्रिल: आझादी का अमृत महोत्सव आणि शिवाजी विद्यापीठाचे हिरक महोत्सवी वर्ष अशा संयुक्त निमित्ताने शिवाजी विद्यापीठामार्फत सांस्कृतिक आदान प्रदान उपक्रम आयोजित केला आहे.
या अंतर्गत लव्हली प्रोफेशनल
युनिव्हर्सिटी, फगवाडा, जालंधर (पंजाब) या विद्यापीठात १० ते १४ एप्रिल
या कालावधीत विविध संयुक्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यात सहभागी
होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचा ४३ सदस्यीय संघ काल (दि. ७) फगवाडा (पंजाब) कडे रवाना झाला.
या उपक्रमामध्ये दोन्ही विद्यापीठांचे कलाकार एकत्रितरित्या विविध कलाप्रकार सादर करतील. यात महाराष्ट्राची लोकधारा (वासुदेव, गोंधळ, आराधी, भारुड इ.), लोकवाद्यवृंद, लोकनृत्य, लावणी, कव्वाली, सुगम गायन,
मूकनाटय, देशभक्तीपर लघुनाटिका, देशभक्तीपर सुगम गायन इ. कार्यक्रमांचा समावेश आहे. त्याचबरोबर राग यमन कल्याणवर आधारित विविध भाषांतील, विविध प्रकारातील जवळपास वीस गाण्यांचे मुखडे सादर करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने सदर गाण्यांच्या माहितीचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
शिवाजी विद्यापीठाचा संघ एकूण ४३ सदस्यांचा
आहे. यात विद्यार्थ्यांसह संघ व्यवस्थापक, व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक, युवा महोत्सव समिती सदस्य व प्रशासकीय सेवक यांचा समावेश आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाची रंगीत तालीम शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषा भवन सभागृहात मंगळवारी सायंकाळी (दि. ५) पार पडली.
यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी.
शिर्के यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित
होते. रंगीत तालीम संपल्यानंतर कुलगुरूंनी संघातील विद्यार्थ्यांशी
संवाद साधून उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment