Wednesday, 13 April 2022

डॉ. डी.वाय. पाटील यांच्यामुळे आधुनिक शिक्षण बहुजन समाजघटकांपर्यंत: श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार' 'पद्मश्री' डॉ. डी.वाय. पाटील यांना प्रदान करताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, सौ. शांतादेवी डी. पाटील आणि प्राचार्य बी.ए. खोत.
 
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज



शिवाजी विद्यापीठात प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात

कोल्हापूर, दि. १३ एप्रिल: पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांनी बहुजन समाजघटकांत आधुनिक शिक्षण वृद्धीचे मोलाचे कार्य केले, असे गौरवोद्गार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा सन २०२२ साठीचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार शाहू महाराज यांच्या हस्ते आज पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, सौ. शांतादेवी डी. पाटील आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील प्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते डॉ. डी.वाय. पाटील यांना प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रुपये १ लाख ५१ हजार रोख असे पुरस्काराचे स्वरुप होते. डॉ. अरुण कणबरकर यांनी कणबरकर कुटुंबियांच्या वतीने डॉ. पाटील यांचा सत्कार केला. तर, डॉ. नमिता खोत यांनी सौ. शांतादेवी पाटील यांचा सत्कार केला.

डॉ. डी.वाय. पाटील यांच्या कारकीर्दीचे आपण गेल्या साठ वर्षांहून अधिक कालखंडाचे साक्षीदार असल्याचे सांगून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. पाटील हे शहाजी महाराजांना भेटावयास यत असत, तेव्हापासूनचा आमचा स्नेह आहे. राजकारणापासून अलिप्त होऊन शैक्षणिक कार्य करण्याचा निर्णय खूप मोठा होता. मात्र, त्यांनी तो धाडसाने घेतला आणि त्यांच्या या कार्याचा लौकिक केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतही विस्तारला आहे. त्यांच्या संस्था विनाअनुदानित असल्या तरी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत तेथे कोणतीही तडजोड दिसून येत नाही, हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी.लिट.सह कणबरकर पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ. डी.वाय. पाटील म्हणाले, प्राचार्य कणबरकर सर हे माझे गुरू आहेत. गुरूंच्या नावे असणारा पुरस्कार मला मिळाला, यामुळे उपकृततेची भावना मनी दाटली आहे. त्यामुळेच अन्य पुरस्कारांपेक्षा हा पुरस्कार माझ्यासाठी खूप वेगळा आणि जवळचा आहे. पूर्वी गुरूदक्षिणा दिली जायची, पण आज गुरूकडून शिष्याचा सन्मान झाला आहे, हे या पुरस्काराचे वेगळेपण आहे.

यावेळी डॉ. डी.वाय. पाटील यांनी पुरस्काराच्या १ लाख ५१ हजार रुपयांच्या रकमेत आणखी १० लाख रुपयांची भर घालून तो निधी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्याची घोषणा केली. या निधीमधून संतसाहित्याच्या क्षेत्रात प्रभावी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कार योजना निर्माण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. पाटील यांच्या हस्ते सदर ११ लाख ५१ रुपये इतक्या निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. डी.वाय. पाटील हे शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी तर आहेतच, शिवाय, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, विद्यापीठाची मानद डी.लिट. धारक व्यक्तीमत्त्व आणि आता त्यांचे शिक्षक असलेल्या कुलगुरूंच्या नावचा पुरस्कार प्राप्त झाल्याने या विद्यापीठाशी त्यांचे असणारे दृढ नातेच अधोरेखित होते. डॉ. पाटील आणि डॉ. कणबरकर कुटुंबिय यांच्यामध्ये दातृत्वाचा आणि त्यागाच्या संस्काराचा एक धागा दिसतो. आजचा समारंभ या दोन कुटुंबियांच्या दातृत्वातून साजरा झाला आहे. डॉ. पाटील यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेची पूर्ती विद्यापीठातर्फे करण्यात येईल, याची ग्वाही अधिकार मंडळांच्या वतीने कुलगुरूंनी दिली.

डॉ. कणबरकर यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा मोठा प्रभाव होता. त्यातून या परिसरात शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक कार्यातही ते हिरीरीने सक्रिय राहिले. त्यांनी केलेल्या भरीव पायाभरणीमुळेच त्यांनी जिथे जिथे काम केले, ती महाविद्यालये आज स्वायत्त बनलेली आहेत, असे गौरवोद्गारही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी काढले.

तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरवात डॉ. कणबरकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. डॉ. प्राचार्य कणबरकर आणि डॉ. डी.वाय. पाटील यांच्या जीवनकार्यावरील ध्वनीचित्रफीती दाखविण्यात आल्या. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी डॉ. पाटील यांना प्रदान करावयाच्या मानपत्राचे वाचन केले. प्राचार्य डॉ. बी.ए. खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमास माजी कुलगुरू डॉ. बी.पी. साबळे, डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. डी.आर. मोरे यांच्यासह विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद तसेच अधिसभा यांचे सदस्य, डॉ. डी.वाय. पाटील समूहाचे पदाधिकारी, शिक्षक, प्रशासकीय सेवक, कणबरकर कुटुंबिय आणि डॉ. पाटील यांच्यावर प्रेम करणारे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment