Showing posts with label Prin. R.K. Kanbarkar Award. Show all posts
Showing posts with label Prin. R.K. Kanbarkar Award. Show all posts

Wednesday, 13 April 2022

डॉ. डी.वाय. पाटील यांच्यामुळे आधुनिक शिक्षण बहुजन समाजघटकांपर्यंत: श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार' 'पद्मश्री' डॉ. डी.वाय. पाटील यांना प्रदान करताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, सौ. शांतादेवी डी. पाटील आणि प्राचार्य बी.ए. खोत.
 
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज



शिवाजी विद्यापीठात प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात

कोल्हापूर, दि. १३ एप्रिल: पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांनी बहुजन समाजघटकांत आधुनिक शिक्षण वृद्धीचे मोलाचे कार्य केले, असे गौरवोद्गार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा सन २०२२ साठीचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार शाहू महाराज यांच्या हस्ते आज पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, सौ. शांतादेवी डी. पाटील आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील प्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते डॉ. डी.वाय. पाटील यांना प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रुपये १ लाख ५१ हजार रोख असे पुरस्काराचे स्वरुप होते. डॉ. अरुण कणबरकर यांनी कणबरकर कुटुंबियांच्या वतीने डॉ. पाटील यांचा सत्कार केला. तर, डॉ. नमिता खोत यांनी सौ. शांतादेवी पाटील यांचा सत्कार केला.

डॉ. डी.वाय. पाटील यांच्या कारकीर्दीचे आपण गेल्या साठ वर्षांहून अधिक कालखंडाचे साक्षीदार असल्याचे सांगून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. पाटील हे शहाजी महाराजांना भेटावयास यत असत, तेव्हापासूनचा आमचा स्नेह आहे. राजकारणापासून अलिप्त होऊन शैक्षणिक कार्य करण्याचा निर्णय खूप मोठा होता. मात्र, त्यांनी तो धाडसाने घेतला आणि त्यांच्या या कार्याचा लौकिक केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतही विस्तारला आहे. त्यांच्या संस्था विनाअनुदानित असल्या तरी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत तेथे कोणतीही तडजोड दिसून येत नाही, हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी.लिट.सह कणबरकर पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ. डी.वाय. पाटील म्हणाले, प्राचार्य कणबरकर सर हे माझे गुरू आहेत. गुरूंच्या नावे असणारा पुरस्कार मला मिळाला, यामुळे उपकृततेची भावना मनी दाटली आहे. त्यामुळेच अन्य पुरस्कारांपेक्षा हा पुरस्कार माझ्यासाठी खूप वेगळा आणि जवळचा आहे. पूर्वी गुरूदक्षिणा दिली जायची, पण आज गुरूकडून शिष्याचा सन्मान झाला आहे, हे या पुरस्काराचे वेगळेपण आहे.

यावेळी डॉ. डी.वाय. पाटील यांनी पुरस्काराच्या १ लाख ५१ हजार रुपयांच्या रकमेत आणखी १० लाख रुपयांची भर घालून तो निधी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्याची घोषणा केली. या निधीमधून संतसाहित्याच्या क्षेत्रात प्रभावी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कार योजना निर्माण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. पाटील यांच्या हस्ते सदर ११ लाख ५१ रुपये इतक्या निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. डी.वाय. पाटील हे शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी तर आहेतच, शिवाय, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, विद्यापीठाची मानद डी.लिट. धारक व्यक्तीमत्त्व आणि आता त्यांचे शिक्षक असलेल्या कुलगुरूंच्या नावचा पुरस्कार प्राप्त झाल्याने या विद्यापीठाशी त्यांचे असणारे दृढ नातेच अधोरेखित होते. डॉ. पाटील आणि डॉ. कणबरकर कुटुंबिय यांच्यामध्ये दातृत्वाचा आणि त्यागाच्या संस्काराचा एक धागा दिसतो. आजचा समारंभ या दोन कुटुंबियांच्या दातृत्वातून साजरा झाला आहे. डॉ. पाटील यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेची पूर्ती विद्यापीठातर्फे करण्यात येईल, याची ग्वाही अधिकार मंडळांच्या वतीने कुलगुरूंनी दिली.

डॉ. कणबरकर यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा मोठा प्रभाव होता. त्यातून या परिसरात शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक कार्यातही ते हिरीरीने सक्रिय राहिले. त्यांनी केलेल्या भरीव पायाभरणीमुळेच त्यांनी जिथे जिथे काम केले, ती महाविद्यालये आज स्वायत्त बनलेली आहेत, असे गौरवोद्गारही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी काढले.

तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरवात डॉ. कणबरकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. डॉ. प्राचार्य कणबरकर आणि डॉ. डी.वाय. पाटील यांच्या जीवनकार्यावरील ध्वनीचित्रफीती दाखविण्यात आल्या. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी डॉ. पाटील यांना प्रदान करावयाच्या मानपत्राचे वाचन केले. प्राचार्य डॉ. बी.ए. खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमास माजी कुलगुरू डॉ. बी.पी. साबळे, डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. डी.आर. मोरे यांच्यासह विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद तसेच अधिसभा यांचे सदस्य, डॉ. डी.वाय. पाटील समूहाचे पदाधिकारी, शिक्षक, प्रशासकीय सेवक, कणबरकर कुटुंबिय आणि डॉ. पाटील यांच्यावर प्रेम करणारे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 14 March 2022

शिक्षणमहर्षी डॉ. डी.वाय. पाटील यांना

यंदाचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार जाहीर

 

डॉ. डी.वाय. पाटील


१३ एप्रिल रोजी होणार प्रदान समारंभ; कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची माहिती

कोल्हापूर, दि. २७ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांना आज जाहीर करण्यात आला. प्राचार्य कणबरकर यांच्या स्मृतीदिनी बुधवार, दि. १३ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता विद्यापीठाच्या परिसरात पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू (स्व.) प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार निर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाकडे २५ लाख रुपयांची ठेव प्रदान केली आहे. श्रीमती शालिनी कणबरकर यांच्यासमवेत झालेल्या सामंजस्य करारातून शिवाजी विद्यापीठाच्या या माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्काराची संयुक्त निर्मिती करण्यात आली. देशातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांत अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला प्राचार्य कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. रुपये १ लाख ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी.एन.आर. राव (२०१६), रयत शिक्षण संस्था (२०१७), ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल (२०१८) आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील (२०१९) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सन २०२० व २०२१मध्ये कोविड-१९च्या साथीमुळे पुरस्कार जाहीर करण्यात येऊ शकले नाहीत.

यावेळी पुरस्कारासंदर्भात अधिक माहिती देताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासात अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. राज्याबरोबरच देशाच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांनी अत्यंत ध्येयनिष्ठपणे योगदान दिले आहे. व्यावसायिक शिक्षणाचा विकास व विस्तार यांसाठी त्यांनी अव्याहत परिश्रम घेतले आहेत. त्यातून डी.वाय. पाटील समूहाचा शैक्षणिक वृक्ष साकारला आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवाहात सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांचे समावेशन डॉ. पाटील यांच्यामुळे शक्य झाले.

यावेळी शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील म्हणाले की, समितीने एकमताने यंदाच्या पुरस्कारासाठी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांनी व्यावसायिक शिक्षणाच्या प्रसारामध्ये अनेक नवे मानदंड निर्माण केले आहेत. उत्तम शैक्षणिक सुविधांच्या निर्मितीसाठी आग्रही राहतानाच गरजू विद्यार्थ्यांचीही व्यवस्था त्याअंतर्गत कशी होईल, यादृष्टीने ते सजग राहिले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक मूलभूत स्वरुपाचे बदल संभवतात. अशा बदलांना सामोरे जाण्याची सक्षमता असणारी शिक्षणसंस्था त्यांनी उभारली आहे. त्यांच्या समग्र शैक्षणिक कार्याची दखल घेऊनच समितीने त्यांची निवड केली आहे. अतिशय योग्य, पात्र आणि प्रतिष्ठित व्यक्तीला पुरस्कार प्रदान केला जात आहे, याचा आनंद वाटतो.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील, प्राचार्य डॉ. बी.ए. खोत, डॉ. भालबा विभूते, डॉ. अरुण कणबरकर आदी उपस्थित होते.

 

डॉ. डी.वाय. पाटील यांचा संक्षिप्त परिचय पुढीलप्रमाणे-



प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर यांच्याविषयी

नाव - रामकृष्ण कृष्णाजी ऊर्फ रा.कृ. कणबरकर

जन्म - दि. १५  जून, १९२१ बेळगांव.

शिक्षण - १९४० : मॅट्रिक-बेनन स्मिथ हायस्कूलमध्ये सर्वप्रथम.

प्रथम वर्ष - विशेष गुणवत्तेसह

१९४४ ते १९४६: बी.ए., एम.ए. संपूर्ण इंग्रजी (द्वितीय वर्ग), राजाराम कॉलेज, कोल्हापूर.

१९६३ :  बेसीक सर्टिफिकेट कोर्स इन टिचिंग, इंग्लिश ॲज ए फॉरेन लँग्वेज - सी.आय.ई., हैदराबाद.

सेवा - १९४६-४७ :  प्राध्यापक, लिंगराज कॉलेज, बेळगांव

१९४७ ते १९५४ :  कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेत नेले.  छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे इंग्रजी विभागप्रमुख.

१९५४ ते १९५७ :  रयतच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज (कराड) चे पहिले प्राचार्य.

१९५७ ते १९५९ :  प्राध्यापक, गोखले कॉलेज कोल्हापूर.

१९५९ ते १९६४ :  स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य.

१९६४ ते १९७१ : विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूरचे पहिले प्राचार्य.

१९७१ ते १९८० :  न्यू कॉलेज, कोल्हापूरचे पहिले प्राचार्य.

१९८० ते १९८३ :  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे चौथे कुलगुरू.

 

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या कारकीर्दीतील विशेष कार्य - ललित कला विभाग, संख्याशास्त्र विभाग, प्रौढ व निरंतर शिक्षण विभागाची नव्याने सुरुवात.  सोलापूर येथे विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रारंभ.  शाहू संशोधन केंद्राचे पुनरुज्जीवन.  उच्च शिक्षण पत्रोत्तर अभ्यासक्रम, एमपीएड अँड एम.फिल.ची सुरुवात. विद्यापीठ सेवा सल्ला केंद्राची स्थापना.  शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी परीक्षा पद्धतीत बदल, निरंतर अंतर्गत मूल्यमापन पद्धतीचा प्रारंभ.

विद्यापीठ प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव - पुणे व मराठवाडा विद्यापीठ : ॲकॅडेमिक कौन्सिल व सिनेटचे सभासद.  शिवाजी विद्यापीठ कार्यकारिणी सभासद दहा वर्षे, कला शाखा प्रमुख, विद्यापीठाच्या अनेक समित्यांवर सभासद म्हणून उल्लेखनीय कार्य.  नवीन शैक्षणिक व्यवस्थेत विद्यापीठ पातळीवर इंग्रजीचा अभ्यास तयार केला. १९७४चा विद्यापीठाचा नवीन कायदा तयार करण्यात महत्वाचा सहभाग.

विविध महाविद्यालये व संस्थांमधील क्रियाशील भूमिका - लिंगराज महाविद्यालये, बेळगांव  (१ वर्ष) रयत शिक्षण संस्था सातारा (१० वर्ष), गोखले महाविद्यालय, कोल्हापूर (२ वर्ष),  विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर (१२ वर्षे), प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस, कोल्हापूर (९ वर्ष), शाहू मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर, संस्थापक - विश्वस्त (३१ वर्षानंतर निवृत्त), माधवराव बागल विद्यापीठ, संस्थापक - सभासद (२५ वर्ष), ताराराणी विद्यापीठ, विद्यमान विश्वस्त व कार्याध्यक्ष.

पुरस्कार आणि सन्मान - महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार (१९७४), 'एनसीइआरटी'च्या (नवी दिल्ली) संस्थेचे सभासद.  (१९८० ते ८३), दक्षिण भारत जैन सभेचा शैक्षणिक कार्यासाठीचा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार (१९९९), कोल्हापूर महानगर पालिकेचा कोल्हापूर भूषण पुरस्कार, कर्मवीर विठ्‌ठल रामजी शिंदे पुरस्कार, वाई (२००३), संत गाडगे महाराज पुरस्कार, कोल्हापूर (२००४), शाहू पुरस्कार (२०११), शाहू दूरदर्शन मालिका तज्ज्ञ समिती सभासद, रोटरी, लायन्स व अन्य संस्थांचे पुरस्कार.



Thursday, 27 December 2018

ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांना यंदाचा

प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते १२ जानेवारीला प्रदान समारंभ



कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची माहिती

Dr. N. D. Patil
कोल्हापूर, दि. २७ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर.के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांना आज जाहीर करण्यात आला. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात शनिवार, दि. १२ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

कुलगुरू डॉ. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू (स्व.) प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार निर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाकडे २५ लाख रुपयांची ठेव प्रदान केली आहे. श्रीमती शालिनी कणबरकर यांच्यासमवेत झालेल्या सामंजस्य करारातून शिवाजी विद्यापीठाच्या या माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्काराची संयुक्त निर्मिती करण्यात आली. देशातील शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांत अत्युत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला प्राचार्य कणबरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. रुपये १ लाख ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यापूर्वी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी.एन.आर. राव (२०१६), रयत शिक्षण संस्था (२०१७), ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल (२०१८) यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी पुरस्कारासंदर्भात अधिक माहिती देताना कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नेते व विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जडणघडणीत डॉ. एन.डी. पाटील यांचे अतिशय महत्त्वाचे योगदान आहे. समाजकारणासाठी राजकारणाचा वापर करणाऱ्या एका ध्येयनिष्ठ विचारवंतांच्या फळीचे ते प्रतिनिधी आहेत. नैतिकता हा त्यांच्या प्रत्येक कार्याचा आणि आंदोलनाचा प्रमुख कणा आहे. त्या बळावरच त्यांनी अगदी अलिकडच्या टोल हटाव आंदोलनापर्यंतची अनेक आंदोलने यशस्वी केली आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो, शेतकरी, कष्टकऱ्यांची, कामगारांची चळवळ असो किंवा आजही अव्याहत सुरू असलेला कर्नाटक-महाराष्ट्राचा सीमाप्रश्नाचा लढा असो, डॉ. पाटील यांनी या साऱ्या चळवळींना प्राप्त करून दिलेले नैतिक अधिष्ठान ही फार मोलाची बाब आहे. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आग्रही असणाऱ्यांत आघाडीवर असलेल्या डॉ. पाटील यांनी स्थापनेनंतरच्या कालखंडातही विद्यापीठाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीच्या सदस्यत्वापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे अधिसभा सदस्य, कार्यकारिणी सदस्य, सामाजिक शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता असा अनेकांगांनी झाला. शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या योगदानाबद्दल सन २००६मध्ये विद्यापीठाची सर्वोच्च मानद पदवी डी.लिट. देऊन त्यांचा गौरव केला आहे.

यावेळी शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील म्हणाले की, समितीच्या अवघ्या एकाच बैठकीत आणि एकमताने यंदाच्या पुरस्कारासाठी डॉ. एन.डी. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकारिता आणि शिक्षण या पाच क्षेत्रांत अधिकारपूर्ण आणि सहज वावर असणारे हे व्यक्तीमत्त्व आहे. संविधान आणि कायद्याच्या शिस्तीतच त्यांनी आपला संघर्ष मांडला. रायगड येथील विशेष आर्थिक क्षेत्रांसाठी (सेझ) संपादित केलेल्या सुमारे ३६ हजार एकर जमिनीसाठीचा लढा हा ऐतिहासिक स्वरुपाचा आहे. छोट्या छोट्या शेतकऱ्यांना संघटित करून व्यवस्थेविरुद्ध अशा प्रकारचा लढा यशस्वी करणे सहजशक्य बाब नव्हती. मात्र पाटील सरांनी केवळ आपल्या शिस्तबद्ध व्यूहरचनेच्या बळावर तो यशस्वी केला. अद्यावत संदर्भांच्या अभ्यासासह भूमिका घेण्याचा त्यांचा गुणधर्म हा एकमेवाद्वितिय स्वरुपाचा आहे. त्यांना पुरस्कार देताना होणारा आनंद हा त्यामुळे खूप मोठा आहे.


यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, शोध समितीचे सदस्य डॉ. जे.एफ. पाटील, प्राचार्य डॉ. बी.ए. खोत आदी उपस्थित होते.



डॉ. एन.डी. पाटील यांचा संक्षिप्त परिचय


संपूर्ण नाव : डॉ. नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ ढवळी (नागाव), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म
शिक्षण : एम.ए. (अर्थशास्त्र), पुणे विद्यापीठ, (१९५५); एल.एल.बी. पुणे विद्यापीठ (१९६२)
अध्यापन कार्य:
  • १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक तसेच कमवा व शिकाया योजनेचे प्रमुख व रेक्टर
  • १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य:
  • शिवाजी विद्यापीठ पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य (१९६२)
  • शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य (१९६५)
  • शिवाजी विद्यापीठ कार्यकारिणी सदस्य (१९६२-१९७८)
  • शिवाजी विद्यापीठ सामाजिकशास्त्र विभागाचे डीन (१९७६-१९७८)
  • सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य (१९९१)
  • रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- (१९५९ पासून)
  • रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – (१९९० पासून)
  • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बेळगाव अध्यक्ष – (१९८५ पासून)
राजकीय कार्य:
  • १९४८ शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
  • १९५७ मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
  • १९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी एकूण १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
  • १९६९- १९७८, १९८५ २०१० शे.का.प.चे सरचिटणीस
  • १९७८-१९८० सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य
  • १९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी)
  • १९९९-२००२ निमंत्रक, लोकशाही आघाडी सरकार
  • महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते.
मिळालेले सन्मान / पुरस्कार:
  • भाई माधवराव बागल पुरस्कार (१९९४)
  • स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड डी.लीट.पदवी (१९९९)
  • राष्ट्रीय बियाणे महामंडळ (अध्यक्षपद) भारत सरकार (१९९८ २०००)
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ डी.लीट. पदवी (२०००)
  • विचारवेध संमेलन, परभणी अध्यक्षपद (२००१)
  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर डी.लीट. पदवी (२००६)
  • शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार
भूषविलेली पदे:
  • रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल- सदस्य
  • समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी उपाध्यक्ष
  • अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र अध्यक्ष
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा अध्यक्ष
  • जागतिकीकरणविरोधी कृती समिती मुख्य निमंत्रक
  • म.फुले शिक्षण संस्था, इस्लामपूर अध्यक्ष
  • दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था, बेळगाव अध्यक्ष
  • महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती सदस्य
प्रसिद्ध झालेले लेखन:
  • समाजविकास योजनेचे वस्त्रहरण (पुस्तिका)
  • शेतजमिनीवरील कमाल मर्यादा आणि महाराष्ट्र सरकारचा प्रतिगामी कायदा (पुस्तिका) (१९६२)
  • काँग्रेस सरकार आणि शेतकऱ्यांची लूट (पुस्तिका) (१९६२)
  • शेतीमालाला किफायतशीर किमतीची हमी आणि घाऊक व्यापाराचे राष्ट्रीयीकरण (पुस्तिका) (१९६३)
  • वाढती महागाई आणि ग्राहकांची ससेहोलपट (पुस्तिका) (१९६६)
  • महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे (White Paper) कृष्णस्वरूप (पुस्तिका) (१९६७)
  • शेतीमालाच्या किफायतशीर किमतीची कैफियत (पुस्तक) (१९७०)
  • शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी? (पुस्तिका) (१९९२)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (पुस्तिका)
  • नववे विचारवेध संमेलन परभणी, अध्यक्षीय भाषण, (२००१) (नवसाम्राज्यवादी युगातील भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने)
रयत शिक्षण संस्थेतील विशेष कार्य:
  • चेअरमन पदाच्या काळात : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आश्रमशाळा, साखरशाळा, नापासांची शाळा, श्रमिक विद्यापीठ, संगणक शिक्षक केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील इन्फॉर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूट, ‘कमवा व शिकाया योजनेवर भर, स्पर्धा परीक्षा केंद्रे, गुरुकुल प्रकल्प, लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना यांची राबवणूक, दुर्बल शाखा विकास निधी, महर्षी वि. रा. शिंदे अध्यासन केंद्र आदींची स्थापना, कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत विविध पुस्तकांची निर्मिती. 
  • डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी, समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मुलन समिती या संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थी, शिक्षक प्राध्यापक प्रबोधन कार्याला चालना.

Friday, 13 April 2018

विद्यार्थ्यांना किमान एक कलाविषय शिकवायला हवा: डॉ. जब्बार पटेल यांची अपेक्षा


ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार' प्रदान करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) डॉ. जे.एफ. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. भारती पाटील.



डॉ. जब्बार पटेल


शिवाजी विद्यापीठात डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान समारंभ उत्साहात


कोल्हापूर, दि. १३ एप्रिल: कलात्मक विषयांच्या बाबतीत जाणीव निर्मिती होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून किमान एक तरी कलाविषय शिकवायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आज येथे व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार डॉ. पटेल यांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख १ लाख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. पटेल बोलत होते.
Dr. Jabbar Patel
यावेळी डॉ. श्रीमती मणी पटेल यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. जे.एफ. पाटील, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ. जब्बार पटेल म्हणाले, आपल्या समाजात कलात्मक विषय तुलनेने कमी शिकविले जातात. जीवनात कला-संस्कृतीचे महत्त्व मोठे आहे. ते लक्षात घेता या शिक्षणाच्या संदर्भात जागृतीची मोठी गरज आहे. सिनेमा असो अगर कोणतीही कलाकृती या माणसाच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत करतात. त्या दृष्टीने कला क्षेत्राकडे पाहण्याची गरज आहे. कलेच्या क्षेत्रात सृजनशील निर्मितीसाठी कलाकारामध्ये धाडस असणे अत्यावश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्याचवेळी कोणताही शिक्षक हा जातिवंत बंडखोर असला पाहिजे, त्या बंडखोरीतूनच विद्यार्थ्यांना घडविण्याची ऊर्मी जन्माला येत असते, असे मतही डॉ. पटेल यांनी व्यक्त केले.
डॉ. पटेल यांनी या प्रसंगी आपल्या नाट्य व चित्रपट क्षेत्रातील वाटचालीचा पटच उपस्थितांसमोर उलगडला. ते म्हणाले, नाटक हा माझ्यासाठी सर्जनशीलतेचा भाग आहे. रंगमंचावरील प्रायोगिकतेमुळेच भालबा केळकर, डॉ. श्रीराम लागू यांच्यासारखे महान नाट्यकर्मी घडले. घाशीराम कोतवालमधला राजकीय संदर्भ इतका सशक्त होता की, त्यामधून राज्यव्यवस्थेला अशा घाशीरामांची सातत्याने असणारी गरज अधोरेखित होते. सामना हा माझ्या पहिल्या चित्रपटाच्या मुहुर्ताचा पहिला प्रसंग कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत चित्रित करण्यात आला. मुहुर्ताची फटमार करायला भालजी पेंढारकर, चंद्रकांत मांढरे आणि लता मंगेशकर यांचे येणे आणि कॅमेऱ्यासमोर डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले असा एक मोठाच योग त्या निमित्ताने जमून आला. लता मंगेशकरांनी त्यावेळी कोणतीही बिदागी न घेता केवळ शब्दाखातर सख्या रे.. हे गीत म्हटले. मंगेशकर कुटुंबियांशी जडलेल्या या जिव्हाळ्यातूनच पुढे जैत रे जैतसारखा वेगळा चित्रपट घडून आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाशी निगडित आठवणी सांगताना डॉ. पटेल म्हणाले, या चित्रपटाच्या निमित्ताने देशातल्या दलित, शोषित वर्गाचं दुःख मला अभ्यासता आलं, मांडता आलं. बाबासाहेबांवरील लोकांची निष्ठा आणि प्रेम आजही इतकं प्रचंड आहे की, महाड आणि नागपूर येथील चित्रीकरणादरम्यान दोन ते अडीच लाख लोक स्वतःच्या घरचे जुने कपडे नेसून आणि घरून भाजी-भाकरी घेऊन सहभागी झाले. बाबासाहेबांच्या भूमिकेसाठी जगभर फिरुन योग्य अभिनेत्याचा शोध घेतला, तो अखेर दाक्षिणात्य अभिनेता मामुटीवर येऊन संपला. मामुटीने ज्या पद्धतीने बाबासाहेबांना पडद्यावर साकार केले, त्याला तोड नाही. बाबासाहेबांची विद्वत्ता आणि त्यांची ममतापूर्ण आक्रमकता या अभिनयाद्वारे दाखविण्यास अशक्य असलेल्या गोष्टी त्याने अप्रतिमरित्या साकारल्या, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. एस.एम. जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुसुमाग्रज यांच्यावरील माहितीपट करताना आलेले अविस्मरणीय अनुभवही डॉ. पटेल यांनी सांगितले.
यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या महान चित्रपटकर्मीला पुरस्कार देताना शिवाजी विद्यापीठ परिवाराला अतिशय आनंद होतो आहे. डॉ. पटेल यांचा जीवनपट त्यांच्याच तोंडून ऐकण्याची अत्यंत दुर्मिळ अशी संधी या निमित्ताने लाभली. त्यांच्या कलाकृतींना सृजनशीलतेचं एक अभिनव असं कोंदण लाभलेलं आहे. त्यांच्या अजरामर कलाकृती या निरंतर आनंददायी ठरणाऱ्या आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्याविषयी चित्रफीतीचे प्रदर्शन करण्यात आले. डॉ. जे.एफ. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मानव्य विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी डॉ. मणी पटेल यांना सौ. अनिता शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी.पी. साबळे, विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे यांच्यासह कणबरकर कुटुंबीय, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.