शिवाजी विद्यापीठात आकर्षक शोभायात्रेसह जयंती साजरी
![]() |
| शिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. प्रशांत बनसोडे. |
कोल्हापूर, दि. १४ एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ भारतापुरते
मर्यादित नसून जागतिक पातळीवर प्रभाव टाकणारे आहेत. आज जगभरात आंबेडकर जयंती साजरी
होत असून, त्यांचे कार्य आणि विचार आंतरराष्ट्रीय
बौद्धिक चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आहे, असे प्रतिपादन पुणे येथील गोखले
इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. प्रशांत
बनसोडे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठात आज डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांची १३५ वी जयंती आकर्षक शोभायात्रेसह लेझीम, हलगीची सादरीकरणे आणि
व्याख्याने अशा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात
आली. या निमित्त फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आंतरराष्ट्रीय
परिप्रेक्ष्य’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी
प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव उपस्थित होत्या.
डॉ. बनसोडे यांनी डॉ. आंबेडकर यांचा
जागतिक प्रभाव स्पष्ट करीत असताना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि जर्मनीतील बॉन
विद्यापीठ येथे आपणाला आलेल्या व्यक्तीगत अनुभवांच्या आधारे विवेचन केले. ते
म्हणाले, आंबेडकरांच्या वैचारिक जडणघडणीमध्ये अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील
शिक्षणाचा मोठा प्रभाव राहिला. येथे त्यांचा लोकशाही, समानता, समाजवाद
आणि सामाजिक न्याय यांसारख्या विचारधारांशी परिचय झाला. विशेषतः जॉन ड्युई यांच्या
प्रागतिक विचारांचा प्रभाव आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनात दिसून
येतो. याशिवाय डॉ. आंबेडकरांनी कार्ल मार्क्स आणि भगवान बुद्ध यांच्या विचारांचे
तुलनात्मक चिंतन करत स्वतःची स्वतंत्र विचारप्रणाली विकसित केली. सामाजिक क्रांती
ही अहिंसक आणि लोकशाही मार्गाने घडवून आणण्याची त्यांची भूमिका ‘डेमोक्रॅटिक
सोशलिझम’ या चौकटीतून समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आंबेडकरांना
‘सोशल जस्टिस क्रुसेडर’ आणि ‘ऑर्गॅनिक इंटेलेक्चुअल’ म्हणून मान्यता मिळाल्याचे
सांगतानाच अँटॉनिओ ग्रामशी यांचा सिद्धांत आणि ड्यु बॉईस यांच्याशी वैचारिक संवादाच्या
अनुषंगानेही विश्लेषण केले. याद्वारेच दलित व आफ्रो-अमेरिकन प्रश्नातील साम्य
याबाबत बाबासाहेबांना विवेचन करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंबेडकरांना केवळ प्रतीक म्हणून नव्हे, तर
त्यांच्या विचारांची सखोल शास्त्रीय मांडणी समजून घेऊन समाजपरिवर्तनासाठी त्याचा
उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे
म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी सांगितलेला शिक्षणाचा खरा अर्थ आणि मानवाधिकार व समतेच्या विचारांची प्रस्तुतता विद्यार्थ्यांनी लक्षात
घेणे आवश्यक आहे. केवळ परीक्षेपुरते न शिकता, मिळवलेल्या
ज्ञानावर चिंतन करून ते समाजात वापरण्याचा आणि स्वतःला एक परिपक्व माणूस म्हणून
घडवणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा "शिका, संघटित
व्हा आणि संघर्ष करा" हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याशी जोडलेला
आहे, असे
वाटते कारण महाराजांची शिकवण, सर्व
जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र करून केलेली संघटनात्मक बांधणी आणि रयतेच्या
राज्यासाठी केलेला लढा हे त्याचेच उदाहरण वाटते. महामानवांच्या जयंती उत्सवातून केवळ तात्पुरता उत्साह न दाखविता
आपल्या आयुष्याला आकार द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
कार्यक्रमाच्या सुरवातीला अधिष्ठाता डॉ. महादेव
देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी सूत्रसंचालन
केले, तर डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी आभार मानले.
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांना अभिवादन
तत्पूर्वी, विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय
इमारतीमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या
हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ.
सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन
अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी
संचालक डॉ. सावलीराम घाणे, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. दीपा
श्रावस्ती, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. सुनील गायकवाड, डॉ. निखिल गायकवाड, डॉ. राहुल
माने, डॉ. नितीन कांबळे, डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. उत्तम सकट, सुरेश बंडगर, सुरेखा
अडके आदींसह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची
उत्साहपूर्ण शोभायात्रा
विद्यापीठाच्या वसतिगृहातील
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज सकाळी विद्यापीठाच्या प्रांगणातून भव्य अशी
शोभायात्रा काढली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ साहेब, सावित्रीबाई फुले, माता रमाई, अण्णाभाऊ
साठे, लहुजी साळवे आदी महामानवांच्या वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी
अग्रस्थानी होते. सजवलेल्या घोडाबग्गीमध्ये डॉ. आंबेडकर यांचे भव्य छायाचित्र
ठेवलेले होते. लेझीम, हलगी आणि ढोल, झांजपथकाच्या निनादात आणि स्फूर्तीगीते गात
विद्यार्थ्यांनी महामानवाला आगळे अभिवादन केले. शोभायात्रेमध्ये प्र-कुलगुरू डॉ.
ज्योती जाधव यांच्यासह सर्वच अधिकारी सहभागी झाले.
रिल
मेकिंग स्पर्धेत प्रतिभा जाधव प्रथम
विद्यापीठाने फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत महामानवांवरील खुल्या रिल्स मेकिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. आज त्याचे प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा: प्रतिभा जयसिंग जाधव (रु. ५००१/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र), केदार सुरेश माने (रु. ३००१/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र), प्रेरणा आर. खटावकर (रु. २००१/-, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र), उत्तेजनार्थ- प्रकाश चांगदेव आवारे (प्रशस्तीपत्र) व कोमल चंद्रकांत गरड (प्रशस्तीपत्र).




No comments:
Post a Comment