शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाला प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात व्याख्यान देताना प्रा. सुकुमार कांबळे. मंचावर (डावीकडून) अविनाश भाले, कुलसचिव डॉ. विलास शिंदे. 
शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात व्याख्यान देताना प्रा. सुकुमार कांबळे. 
शिवाजी विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात व्याख्यान देताना प्रा. सुकुमार कांबळे.
कोल्हापूर, दि. १० एप्रिल: माणूस म्हणून जगायचे असेल, तर
बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही या जाणीवेतून आणि समता, स्वातंत्र्य
आणि बंधुता या मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा मार्ग म्हणूनही डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी गौतम बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला, असे
प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुकुमार कांबळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित फुले-शाहू-आंबेडकर
सप्ताहाचे उद्घाटन आज प्रा. कांबळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ‘डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचे धम्मचिंतन’ या विषयावर त्यांचे विशेष व्याख्यान झाले.
त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.
प्रा. सुकुमार कांबळे यांनी आपल्या
व्याख्यानात धम्माचे मानवी मूल्य आणि सामाजिक परिवर्तनातील महत्त्व अधोरेखित केले.
ते म्हणाले, प्राचीन काळातील वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था
आणि विषमताधिष्ठित रचनेने समाजात माणसाला माणूस म्हणून मान्यता दिली नाही. हीच
अन्यायकारक व्यवस्था पालटून टाकण्यासाठी बुद्धांनी “बहुजन हिताय, बहुजन
सुखाय” हा मानवकल्याणाचा मार्ग दिला. सिद्धार्थ गौतम राजघराण्यात जन्माला
आले असले तरी त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत सत्य आणि मानवकल्याणाचा शोध घेतला.
रोहिणी नदीच्या पाण्यावरून उद्भवलेल्या संघर्षाच्या वेळी त्यांनी युद्धाला विरोध
करत शांततामय मार्गाचा आग्रह धरला. “निसर्गाच्या संसाधनासाठी माणसाने माणसाचा जीव
घेऊ नये,” हा त्यांचा विचार पुढे बुद्धधम्माच्या
तत्त्वज्ञानात दिसून येतो. सिद्धार्थांनी उपवास, तपश्चर्या
आणि विविध तत्त्वज्ञानांचा अभ्यास व चिंतन करून शेवटी माणसाच्या दुःखाचे मूळ
‘तृष्णा’ असल्याचे सांगितले. “अत्त दीप भव” या संदेशातून त्यांनी प्रत्येकाला
स्वतःच्या विवेकबुद्धीने विचार करून जीवन जगण्याचा मार्ग दिला.
ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी समाजातील अस्पृश्यता, अन्याय आणि विषमता अनुभवली होती. महाडचा
सत्याग्रह, काळाराम मंदिरप्रवेश या चळवळींच्या माध्यमातून
त्यांनी मूलभूत मानवी हक्कांसाठी लढा दिला. यावेळी आलेल्या विदारक अनुभवातून माणसाला
माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवण्यासाठी नव्या मार्गाची गरज असल्याच्या
निष्कर्षापर्यंत ते आले. याच चिंतनातून १९५६ मध्ये त्यांनी बुद्धाचा
धम्म स्वीकारला. हे केवळ धर्मांतर नव्हते, तर
सामाजिक क्रांतीचा निर्णायक टप्पा होता. बुद्धधर्म हा विज्ञाननिष्ठ, तर्कसंगत
आणि प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देणारा आहे. अंधश्रद्धेला स्थान न देता विचारस्वातंत्र्य
देतो. त्यामुळे आजच्या काळातही बुद्धधम्म मानवकल्याणासाठीचा अत्यंत उपयुक्त मार्ग
आहे.
फुले-शाहू-आंबेडकर या त्रयीच्या
विचारांचा एकात्म दृष्टिकोन मांडण्याची आज गरज असल्याचे अधोरेखित करताना अध्यक्षीय
मनोगतात डॉ. विलास शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोकाभिमुख आणि
कर्तव्यदक्ष कार्यातूनच महात्मा जोतिराव फुले, छत्रपती
शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांच्या परंपरा
विकसनाला बळ लाभले असावे, असे अभ्यासांती माझे मत बनले आहे. शेतकरी हित, स्त्री सन्मान आणि शिक्षण या तीन प्रमुख
आधारस्तंभांवर या सर्व महापुरुषांचे कार्य उभे असून,
समाजपरिवर्तनाचा हा व्यापक वारसा समजून घेण्यासाठी त्यांच्या
विचारकार्याचा तुकड्या-तुकड्यांत नव्हे, तर एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या आंबेडकरी
संदेशाचा पाया ‘शिक्षण’ असून विद्यार्थ्यांनी विवेकनिष्ठ, चिकित्सक आणि स्वविचारक्षम बनण्याचे आवाहन
त्यांनी केले.
यावेळी अविनाश भाले यांनी स्वागत व
प्रास्ताविक केले. डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ
विचारवंत प्राचार्य डॉ. हरिष भालेराव, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे,
शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांच्यासह शिक्षक,
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment