Saturday 31 December 2022

पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंतीमधून नवचैतन्याची अनुभूती: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 

शिव पावन प्रेरणा मोहिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीचे व प्रतिमेचे पूजन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के



पावनखिंड येथे शिव पावन प्रेरणा मोहीम पोहोचली, त्याप्रसंगी अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत अधिकारी व सहभागी.

शिवाजी विद्यापीठातर्फे शिव पावन प्रेरणा मोहिमेच्या वाटेवरील वाड्या-वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.



कोल्हापूर, दि. ३१ डिसेंबर
: पन्हाळा-पावनखिंड शिव पावन प्रेरणा मोहीम पदभ्रमंतीमधून विद्यार्थ्यांच्या मना नवचैतन्य जागृत होते, तसेच संकटाशी झुंजण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल (दि. ३०) पावनखिंड येथे केले.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पन्हाळा पावनखिंड शिव पावन प्रेरणा मोहीमेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ही मोहीम यापुढील काळातही आयोजित करण्यात येईल. या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी, स्वयंसेवकांपर्यंत शिवकालीन इतिहास पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील.

कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील हे काल पांढरेपाणीपासून मोहिमेत सहभागी झाले आणि त्यांनी पावनखिंडीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीसमवेत वाटचाल केली. पालखी पावनखिंडीस पोहोचल्यानंतर बाजीप्रभूंच्या स्मारकास मान्यवरांनी अभिवादन केले. यानंतर सचिन सूर्यवंशी आणि कोल्हापूरच्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांनी शिवकालीन युद्धकलांचे प्रात्यक्षिक दाखवले. वैष्णवी माने हिने खड्या आवाजात शिवगर्जना केली.

मोहिमेकरपेवाडी येथील मुक्कामी शिवशाहीर श्रीरंगराव पांडुरंग पाटील आणि सहकाऱ्यांनी ऐतिहासिक पोवाडा सादरीकरण केले. काल, दुसऱ्या दिवशी सकाळी कळकेवाडी-रिंगेवाडी-माळवाडी येथून पांढरे पाणी येथे मोहीम आली. या गावांमधील छोट्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक अभय जायभाये आणि प्राचार्य डॉ. एस.आर. पाटील यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पांढरे पाणी येथून दुपारी लेझीम, ढोल, ताशा, धनगरी वाद्य यांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. याप्रसंगी कुलगुरू, प्र-कुलगुरूंसह अधिष्टाता डॉ. महादेव देशमुख, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. प्रकाश गायकवाड आदी मान्यवर पायी चालत पालखी सोहळ्या सहभागी झाले. वाटेवरील गावातील महिलांनी पालखीचे दर्शन घेतले, तसेच मान्यवरांचे औक्षणही केले.

दरम्यान, सकाळच्या सत्रात राज्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशातकुमार वनांजे यांनी शिबिरास भेट दिली. यावेळी त्यांनी हा उपक्रम शिवाजी विद्यापीठापुरता मर्यादित न ठेवता राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत त्याची व्याप्ती वाढवावी, असे आवाहन केले. यासाठी राज्य शासनही सर्वोतोपरी मदत करील, असेही त्यांनी सांगितले.

या मोहिमेत कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांसह कर्मचारी, पत्रकार सहभागी झाले. या सर्वांचे अभय जायभाये यांनी आभार मानले. संग्राम मोरे, आनंदा घोडे विजय नागाकर यांच्यासह सांगली जिल्हा समन्वयक डॉ. पोपटराव माळी यांनी उपक्रमाचे यशस्वी संयोजन केले.

Friday 30 December 2022

शिवाजी विद्यापीठात डॉ. आप्पासाहेब पवार यांना अभिवादन

 


शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी-विद्यार्थिनी.


कोल्हापूर, दि. ३० डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या ४१व्या स्मृतीदिनानिमित्त आज विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते डॉ. पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. आप्पासाहेब पवार कमवा व शिका प्रबोधिनीच्या वतीने डॉ. जी.पी. माळी यांनी पुष्पहार अर्पण केला.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. नीलांबरी जगताप, प्रा. किसनराव कुराडे, डॉ. जे.जी. जाधव, हसन देसाई, प्रा. एस. बी. कणसे, डॉ. मानसिंगराव जगताप, विद्यार्थी भवन अधीक्षक डी.एच. भादले, प्रा. संतो गोजारे, प्रा. आर. एस. गाडे आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      मा. कुलगुरू यांच्या हस्ते विद्यापीठ अतिथीगृहासमोरील डॉ. पवार यांच्या पुतळ्यासह विद्यार्थी भवनमधील पुतळ्यासही अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉ. जे.जी. जाधव यांचे डॉ. आप्पासाहेब पवार यांचे काळ आणि कर्तृत्वया विषयावर व्याख्यान झाले. पौर्णिमा पवार यांनी प्रस्ताविक केले. अक्षता बिराजदार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. किसनराव कुराडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. पवन कांबळे, अजय सकटे यांनी सूत्रसंचालन केले. स्वराज पाटील यांनी आभार मानले. विद्यार्थी भवनचे अधीक्षक डी. एच. भादले, जी. आय. नाईक, जे. एस. गुरव, बी. ए. पाटील, ए. एस. चरापले, एस. बी. तुराई यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

Thursday 29 December 2022

मर्दानी खेळांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा: सचिन सूर्यवंशी

 शिवाजी विद्यापीठात 'वारसा' लघुपटाचे सादरीकरण

 

'वारसालघुपटाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्याबद्दल दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे व डॉ. शिवाजी जाधव.

कोल्हापूर, दि. २९ डिसेंबर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कोल्हापूरला मर्दानी खेळाची गौरवशाली परंपरा आहे. मात्र, ही परंपरा काळाच्या ओघामध्ये नष्ट होण्याच्या आधी मर्दानी खेळांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा, असे आवाहन फिल्मफेअर पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सूर्यवंशी यांच्या फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त 'वारसा' लघुपटाचे विद्यापीठात सादरीकरण करण्यात आले. यावेळी ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

डॉ. शिर्के यांच्या हस्ते यावेळी सूर्यवंशी यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करण्यात आला. अर्थशास्त्र अधिविभागाच्या सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.

शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगून सचिन सूर्यवंशी म्हणाले,  कोल्हापूरला शिवकालीन मर्दानी खेळांचाही वारसा आहे. हा वारसा जतन करणे खूप आवश्यक आहे. यासाठी जुन्या कोल्हापुरातील लोकांनी जतन केलेली ही कला आणि कौशल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. शिवकालीन युद्धकला लाठ्या- काठ्यासह सर्वच प्रकारचे मर्दानी खेळ शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे आवश्यक आहेत.

'वारसा' लघुपटविषयी ते म्हणाले, या लघुपटामध्ये शिवकालीन संदर्भासह मर्दानी खेळांचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झालेले हस्तांतरण चित्रबद्ध केले आहे. कोल्हापूरच्या मातीमध्ये प्रामाणिकपणा आहे. शिवाय एक प्रकारचा रांगडेपणा आहे. छत्रपती शिवरायांवर काम करायचे असल्यास कोल्हापूरकर उत्स्फूर्तपणे मदत करतात. कोणतेही काम करत असताना अनंत अडचणी असतात. मात्र, त्या अडचणींचे भांडवल न करता हेतू शुद्ध ठेवून काम केले पाहिजे. कामामध्ये तंत्रज्ञानाचा कुशलतेने वापर व्हायला पाहिजे. आपल्याला जे खटकते, ते मांडण्यावर आपला भर असला पाहिजे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कोणत्याही विद्यापीठाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात विद्यार्थ्यांचे योगदान मोठे असते. विद्यार्थ्यांबरोबरच कर्मचारी ही तितकेच महत्त्वाचे आहेत. वस्ताद आनंदराव ठोंबरे यांचे लोकसंस्कृती आणि मर्दानी खेळ जनमासात रुजवण्यात योगदान खूप मोठे आहे. त्यांनी मर्दानी खेळाचा वारसा समर्थपणे पुढच्या पिढीकडे दिला. स्थानिक कला, लोकविद्या आणि लोकसंस्कृती आपण सर्वांनी मिळून जपली पाहिजे. 'वारसा' लघुपटामध्ये सचिन सूर्यवंशी यांनी मर्दानी खेळांना पुढे घेऊन जाण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. किंबहुना त्यांनी या खेळ प्रकाराचे केलेले दस्तावेजीकरण अत्यंत मौलिक आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी.

 यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया, एमएसएमएसचे तांत्रिक सल्लागार मिलिंद पाटील, गार्डन क्लबच्या कल्पना सावंत, पल्लवी कुलकर्णी, चित्रकार स्वप्निल पाटील, आकाश बोकमुरकर, अर्चना माने, मतीन शेख, मल्हार जोशी, सचिन दिवाण आदी उपस्थित होते.

अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. समृद्धी पाटील हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. जावेद तांबोळी यांनी आभार मानले.