Monday 12 December 2022

डॉ. गुरूनाथ मुंगळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ

विद्यापीठास सात लाखांचा निधी प्रदान

 

सद्गुरू डॉ. गुरूनाथ मुंगळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार सुरू करण्यासाठी सात लाख रुपयांच्या निधीचा धनादेश शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द करताना डॉ. गौरी कहाते. सोबत (डावीकडून) डॉ. अजय देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे.



'अध्यात्मिक तत्त्वज्ञान साहित्य पुरस्कार' सुरू करावा: डॉ. गौरी कहाते

कोल्हापूर, दि. १२ डिसेंबर: संतसाहित्य व अध्यात्माचे गाढे अभ्यासक सद्गुरू डॉ. गुरुनाथ मुंगळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार प्रदान करण्यासाठी सात लाख रुपयांचा निधी देऊन त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठावर मोठा विश्वास दाखविला आहे. त्या अनुषंगाने लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी येथे दिली.
डॉ. गुरुनाथ मुंगळे
 सद्गुरू डॉ. गुरूनाथ मुंगळे यांच्या कन्या डॉ. गौरी कहाते यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवाजी विद्यापीठात स्व. सद्गुरू गुरूनाथ मुंगळे अध्यात्मिक तत्त्वज्ञान साहित्य पुरस्कार प्रस्थापित करण्यासाठी सात लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला. त्यावेळी ते बोलत होते.

 यावेळी डॉ. कहाते यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, माझे वडील स्व. सद्गुरू डॉ. गुरूनाथ मुंगळे हे इंग्रजी आणि संस्कृत या दोन्ही विषयांतीलतज्ज्ञ होते. सन १९९९ पर्यंत त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. त्यासोबतच संतसाहित्य, अध्यात्म यांचा अभ्यास व लेखन केले. त्यातून त्यांनी लिहीलेली १५ पुस्तके प्रकाशित आहेत. विविध नियतकालिके, दैनिके यांमधून संतसाहित्य, अध्यात्म, तत्त्वज्ञान आदी विषयांवर विपुल लेखन केले. त्यांनी त्यांच्या अध्यात्मिक प्रवासाबद्दल व्यक्त केलेले मनोगत येत्या २५ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे प्रकाशित करण्यात येत आहे. डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने (मुंबई) त्यांना डी.लिट. मानद पदवी प्रदान केली. त्याचप्रमाणे त्यांना कोल्हापूर भूषण, पुणे भूषण, ऋग्वेद भूषण इत्यादी पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. ६ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवाजी विद्यापीठामार्फत अध्यात्मिक तत्त्वज्ञान साहित्य पुरस्कार देण्यात यावा, असा आमचा मानस असून त्यासाठी रुपये सात लाख इतका निधी ठेव स्वरुपात विद्यापीठाकडे सुपूर्द करीत आहोत.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाच्या वतीने सदर निधीच्या धनादेशाचा स्वीकार केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. अजय देशपांडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment