कोल्हापूर, दि. १ डिसेंबर:
शिवाजी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी या नात्याने या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आणि प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न व सहकार्य करू, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष
(कॅबिनेट दर्जा) राजेश क्षीरसागर यांनी आज येथे केले.
श्री. क्षीरसागर यांनी आज विद्यापीठास सदिच्छा भेट देऊन कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत विविध
विषयांबाबत चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. क्षीरसागर म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा पदवीधारक विद्यार्थी असल्याने
या विद्यापीठाने अवघ्या साठ वर्षांमध्ये जी प्रगती साधलेली आहे, ती प्रशंसनीय आहे.
नॅकचे ए++ मानांकन असो,
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राप्त झालेला कॅटेगरी-१ दर्जा असो की संशोधनाच्या
क्षेत्रातील जागतिक स्तरावरील चमकदार कामगिरी असो, शिवाजी विद्यापीठाने प्रत्येक
क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. या विद्यापीठाचा विद्यार्थी
असल्याचा त्यामुळे अभिमान वाटतो. विद्यापीठाचा कोणताही प्रश्न सोडविण्यासाठी
तत्परतेने प्रयत्नशील राहीन, असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. क्षीरसागर पुढे म्हणाले, विद्यापीठाने प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक
विद्यार्थिनीला वसतिगृह प्रवेश आश्वासित केला आहे. त्यामुळे येथे आणखी
विद्यार्थिनी वसतिगृहांची आवश्यकता दिसते आहे. त्याचप्रमाणे जलस्वयंपूर्णतेपाठोपाठ
विद्यापीठ आता सौरऊर्जेच्या आधारे ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊ पाहते आहे. याला
जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून मदत करण्याबाबत विचार करता येईल. त्याचप्रमाणे
विद्यापीठाच्य जुन्या पुणे-बंगळूर महामार्गाच्या पूर्व व पश्चिम बाजू यांना
जोडण्यासाठी भुयारी मार्गाची मोठी आवश्यकता आहे. याखेरीज विद्यापीठ हवामान बदल,
गूळ संशोधन आदींबाबतही संशोधन व विकासाचे काम करीत आहे. या सर्व उपक्रमांना मदत
करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू. विद्यापीठाने या संदर्भात शासनाकडे सादर
केलेल्या प्रस्तावांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करू. आवश्यकता भासल्यास कार्यतत्पर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करू, अशी ग्वाही सुद्धा श्री.
क्षीरसागर यांनी या प्रसंगी दिली.
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी
विद्यापीठाविषयी सविस्तर सादरीकरण केले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते
श्री. क्षीरसागर यांचा शाल, श्रीफळ, ग्रंथभेट, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी
स्वागत, प्रास्ताविक केले तसेच आभार मानले.
यावेळी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव,
प्रभारी वित्त व लेखाधिकारी आर.वाय. लिधडे, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ.
महादेव देशमुख, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. आर.जी. पवार, क्रीडा संचालक डॉ.
शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा
योजना संचालक अभय जायभाये, संगणक केंद्र संचालक अभिजीत रेडेकर, दूरशिक्षण व ऑनलाईन
शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. डी. के. मोरे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत
केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार आदी अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment