शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत औरंगाबाद येथे होणाऱ्या २४व्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होणारा विद्यापीठाचा संघ. |
कोल्हापूर, दि.
१ डिसेंबर: औरंगाबाद येथे दि. ३ ते ७ डिसेंबर या
कालावधीत होणाऱ्या २४व्या आंतरविद्यापीठ क्रीडामहोत्सव-२०२२ साठी शिवाजी
विद्यापीठाचा १४० जणांचा संघ आज रवाना झाला. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काल (दि. ३० नोव्हेंबर) या
संघाला शुभेच्छा देण्यात आल्या.
औरंगाबाद येथे ३
डिसेंबरपासून २४ वा आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव सुरू होत आहे. या महोत्सवात दहा
संघ व्यवस्थापक आणि दहा प्रशिक्षक यांच्याबरोबरच एकूण १२० खेळाडू विविध क्रीडा
प्रकारांत सहभागी होणार आहेत. यामध्ये खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, एथलेटिक्स
आदी खेळांचा समावेश आहे.
या निमित्ताने
स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छापर कार्यक्रम काल विद्यापीठात कुलगुरू डॉ.
दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. खेळाडूंनी आपल्या
उणीवांवर मात करीत आपल्या क्षमतांचे संवर्धन करावे आणि शिवाजी विद्यापीठाचे नाव
उंचावावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी या प्रसंगी केले. खेळाडूंनी शारीरिक
क्षमतेबरोबरच आपली मानसिक क्षमताही सातत्याने वृद्धिंगत करीत न्यायला हवी, जेणे
करून खेळाकडे अधिक जागरुकतेने पाहता येऊ शकेल, असे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील
यांनी सांगितले. तर, विद्यार्थ्यांनी केवळ खेळावर लक्ष केंद्रित करून यंदा
सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रभारी
कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी केले.
यावेळी ग्रुप
लीडर डॉ. सुनील चव्हाण आणि विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश
गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक
क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी केले. मार्गदर्शक डॉ. एन.डी. पाटील, डॉ. सुनील
चव्हाण आणि खेळाडू प्राजक्ता चव्हाण व ऋतुजा मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.
संजय पाटील यांनी आभार मानले. डॉ. लीना पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर
पृथ्वीराज सरनाईक यांनी संयोजन केले.
No comments:
Post a Comment