शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना संशोधक डॉ. उदयन आपटे. |
कोल्हापूर, दि.
३० नोव्हेंबर: दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या नॉनस्टीक वस्तुंमुळे यकृताचे विकार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचा अतिवापर
टाळावा, असा सल्ला अमेरिकेतील कान्सास
विद्यापीठातील फार्मेकॉलॉजी-टॉक्झिकॉलॉजी विभागातील शास्त्रज्ञ डॉ. उदयन आपटे यांनी आज येथे दिला. शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागात ‘डेसिफरिंग
मॅकेनिझम्स ऑफ लीव्हर टॉक्झिसिटी इन्ड्युस्ड बाय पॉलीफ्लुरोअल्काईल सबस्टन्सेस (पी.एफ.ए.एस.)
युजिंग ग्लोबल जीन एक्स्प्रेशन एनालिसीस’ या विषयावरील विशेष व्याख्यानामध्ये ते बोलत होते.
नॉनस्टिक भांडी, रेनकोट, वॉटरप्रुफ मेकअप उत्पादने आणि स्टेनप्रूफ कपड्यांच्या अतिवापरामुळे यकृताचे आजार होऊ शकतात, असे सांगून डॉ. आपटे
म्हणाले, पी.एफ.ए.एस. रसायनांच्या अतिवापरामुळे रोगप्रतिकारक शक्ती, प्रजननक्षमता, गर्भवाढ आणि यकृतावर दुष्परिणाम होतात. तसेच कर्करोगासारखे घातक आजारही उद्भवू शकतात. अथक सात वर्षांच्या संशोधनानंतर माझ्या असे लक्षात आले की, पी.एफ.ए.एस.चा अर्धायुकाल (हाफ लाईफ पिरियड) तीन वर्षांचा असून त्याचे विघटन लवकर होत नाही. त्याचा यकृताशी संबंध आल्यास यकृताला सूज येणे, यकृतात चरबी साठणे तसेच हायपर कोलेस्ट्रोलेमियाचा धोका उद्भवतो. या संशोधनामध्ये अमेरिकी लोकांच्या रक्तामध्ये पी.एफ.ए.एस.चे अंशही आढळून आले आहेत. त्याचा वापर कमी करण्यासाठी जेन-एक्स या पर्यायी रसायनाचा शोध लावला गेला. त्याचा अर्धायुकाल काही दिवसांचा आहे. तथापि, त्याचा अतिरिक्त वापर देखील धोकादायक ठरू शकतो. दोन्हीही रसायनांची विघटन प्रक्रिया शोधणे आव्हानात्मक आहे. भारतामध्ये याचा वापर अतिरिक्त असूनही त्यावर अजून संशोधन झालेले नाही. भारतामध्ये या संदर्भातील
अधिक संशोधनात्मक माहिती मिळविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माधुरी वाळवेकर यांनी केले. अधिविभागप्रमुख डॉ. आशिष देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. एन. ए. कांबळे यांनी आभार मानले. या वेळी डी.वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. मेघनाद जोशी, वेंगुर्ला येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर
महाविद्यालयाचे डॉ. वसंत पाटोळे, डॉ. नितिन पोटफोडे, सुभाष मुंजे, डॉ. एस. एम. गायकवाड, डॉ. एस. आर. यंकंची, डॉ. एम. पी. भिलावे, संशोधक व एम.एस्सी.चे विदयार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment