Saturday, 5 November 2022

रयतसेवक म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची उभारणी करणार

सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचे स्वागत करताना रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील.
 
स्वागत समारंभ प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के


स्वागत समारंभ प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील.


स्वागत समारंभात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची ग्वाही

सातारा:- दि. ५ नोव्हेंबर: रयत शिक्षण संस्थेचे विदयापीठ व्हावे, असे स्वप्न कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पाहिले होते, ते आज सत्यात उतरले आहे आणि या विद्यापीठाचा प्रथम कुलगुरू होण्याचा बहुमान मला लाभला, याचा आनंद मोठा आहे. एक रयतसेवक म्हणून या विद्यापीठाची उभारणी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी काल येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाने कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाची स्थापना केली असून या विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरुपदी शिवाजी विदयापीठाचे कुलगुरु डॉ. शिर्के यांची निवड केली आहे. त्यांनी काल पदाचा कार्यभार स्वीकारला. त्या निमित्ताने सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या स्वागताचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील विदयापीठ आकारास आले आहे, त्यामागे अनेकांचे योगदान आहे. मात्र आता आपली जबाबदारी वाढली आहे. विदयापीठ नावारुपास आणण्यासाठी सर्वांना पूर्ण क्षमतेने योगदान दयावे लागणार आहे. नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणारे काळानुरुप आवश्यक ते अभ्यासक्रम या विदयापीठामार्फत सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सूतोवाच केले.

अध्यक्षीय भाषणात रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेबद्दलची माहिती दिली. कुलगुरू डॉ. शिर्के यांचे स्वागत त्यांच्या हस्ते करण्यात आले.

रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. व्ही. एस. शिवणकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जे. जे चव्हाण यांनी आभार मानले. डॉ. मनिषा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव (उच्च शिक्षण) डॉ. शिवलिंग मेनकुदळे, यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, साताराचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, साताराचे प्राचार्य डॉ. बी. ए. कांबळे यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेर सेवक उपस्थित होते.

दरम्यान, कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्यापीठाचा पदभार स्विकारल्यानंतर डॉ. विजय कुंभार यांची कुलसचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच, विद्यापीठाच्या कामकाजासाठी विविध पदाधिकारी, अधिष्ठाता आणि केंद्र संचालक यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या.

No comments:

Post a Comment