शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्रज्ञांचे संशोधन
डॉ. साजिद मुल्लाणी |
डॉ. सागर डेळेकर |
कोल्हापूर, दि. २० नोव्हेंबर: येथील शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी मानवी शरीरातील 'आनंददायी मूलद्रव्य’ असलेल्या सेरोटोनिन या मूलद्रव्यासाठी नॅनो-संयुगांच्या सहाय्याने सेन्सिंग पद्धत विकसित केली असून त्यासाठी त्यांना नुकतेच भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे.
विद्यापीठाच्या
रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. सागर दा. डेळेकर आणि संशोधक विद्यार्थी डॉ. साजिद बा. मुल्लाणी यांनी ही कामगिरी केली आहे. डॉ. डेळेकर यांचे या वर्षातील हे सलग दुसरे भारतीय पेटंट आहे. रसायनशास्त्राच्या क्षेत्रामधील हे एक महत्त्वपूर्ण संशोधन असून मानवाच्या विविध मनोविकारांचे निदान आणि उपचारांमध्ये दूरगामी परिणाम करण्याची क्षमता
त्यात आहे.
डॉ. डेळेकर व डॉ. मुल्लाणी यांनी विकसित केलेली ही सेन्सिंग पद्धती अत्यंत सोपी व सुलभ स्वरुपाची आहे. ही पद्धत विकसित करण्याकरिता अल्पखर्चिक नॅनोसंमिश्रांवर आधारित इलेक्ट्रोडचा वापर करण्यात आला आहे. सदरचे संशोधन २०२० साली रसायनशास्त्रातील अत्यंत प्रतिष्ठित अशा "सायंटिफिक रिपोर्ट्स" या ‘नेचर’ संशोधन पत्रिकेमध्येही प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनासाठी स्कॉटलंडमधील (ग्रेट ब्रिटन) संशोधन सहयोगी डॉ. लिन डेन्नी, अमेरिकेतील संशोधक डॉ अन्नदानेश शेल्लेकरी, दक्षिण कोरियातील संशोधक डॉ. नवाज मुल्लाणी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
या संशोधनासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. सागर डेळेकर म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये माणसाचे त्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते आहे. त्यामधून अनेक आजारांना सामोरे जावे लागते. मानवी शरीरातील 'आनंददायी मूलद्रव्य’ मानल्या जाणाऱ्या सेरोटोनिनच्या असंतुलनामुळे माणसाला मानसिक ताण-तणाव, नैराश्य, चिंता, निद्रेच्या समस्या, पचनाच्या समस्या, आत्मघाती वर्तन, वेड लागणे, आघातानंतरची तणावपूर्ण विकृती, स्किझोफ्रेनिया (मानसिक विकार), फोबिया (भीती) यासारख्या विविध मनोकायिक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीरातील सेरोटोनिन या मूलद्रव्याच्या एकूण प्रमाणावरच माणसाचे मानसिक स्वास्थ्य अवलंबून असते. परंतु सेरोटोनिनच्या असंतुलनामुळे मानवाच्या बिघडलेल्या मानसिक संतुलनाचे जर प्राथमिक अवस्थेत योग्य निदान झाल्यास त्याची मानसिक परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते. या निदानासाठी आजघडीला अत्यंत महागड्या वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात. यांना पर्याय म्हणून या संशोधनांतर्गत विविध नॅनोसंमिश्रांचा वापर करून अत्यंत सुलभ व कमी खर्चिक सेरोटोनिन चाचणी पद्धती विकसित करण्यात यश आले आहे. या संशोधनामुळे विविध मानसिक विकारांचे अधिक चांगले आणि प्रभावी निदान करता येईल, त्याचप्रमाणे योग्य उपचार करण्यासही मदत होईल.
सदरच्या भारतीय पेटंटबद्दल डॉ. सागर डेळेकर आणि डॉ. साजिद मुल्लाणी यांचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह सहकारी शिक्षक, संशोधक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
सातत्यपूर्ण
संशोधनाचे फलित: कुलगुरू डॉ. शिर्के
डॉ. सागर डेळेकर आणि डॉ. साजिद मुल्लाणी हे सदर संशोधन प्रकल्पावर सन
२०१८पासून काम करीत आहेत. त्यांच्या अथक परिश्रमाचे फलित म्हणजे हे पेटंट आहे.
महत्त्वाचे म्हणजे आजघडीला लोक अनेक मनोकायिक आजारांना बळी पडत आहेत. या
संशोधनामुळे अशा रुग्णांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. भविष्यात वैद्यकीय
उपचारांमध्येही या पद्धतीचे समावेशन शक्य आहे. या संशोधकांचे अभिनंदन करीत असतानाच
या क्षेत्रातील पुढील संशोधनही त्यांनी सुरू ठेवावे, असे आवाहन शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी या निमित्ताने केले.
No comments:
Post a Comment