शिवाजी विद्यापीठात आयोजित 'जगण्यातलं संविधान' या परिसंवादात बोलताना मुक्ता दाभोलकर. मंचावर (डावीकडून) सचिन पवार, गायत्री लेले, डॉ. राहुल सरवटे, सॅबी परेरा, श्रीकांत देशपांडे आणि संवादक डॉ. दीपक पवार, |
कोल्हापूर, दि. २६ नोव्हेंबर:
सांविधानिक मूल्यांच्या परीघविस्तारातूनच खऱ्या अर्थाने आधुनिक भारताची भक्कम
उभारणी शक्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘जगण्यातलं संविधान’ या विशेष परिसंवादामध्ये उमटला.
संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर जिल्हा निवडणूक
अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकशाही गप्पा भाग-८’ या कार्यक्रमांतर्गत ‘जगण्यातलं संविधान’ हा विशेष
राज्यस्तरीय परिसंवाद विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यामध्ये
मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या
कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर, स्तंभलेखक सॅबी परेरा, प्राध्यापक डॉ. राहुल सरवटे,
कीर्तनकार सचिन पवार आणि प्राध्यापक डॉ. गायत्री लेले सहभागी झाले. मुंबई
विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी संवादक म्हणून परिसंवादाचे
समन्वयन केले.
अंधश्रद्धा निर्मूलन
समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, संविधानाने दिलेले अधिकार हे
आपल्या दैनंदिन जगण्यात अंगिकृत व परावर्तित होणे आवश्यक आहे. संविधानिक मूल्यांना
सामाजिक स्वीकारार्हता ही खूप महत्त्वाची बाब आहे. समाजात प्रचलित रुढीपरंपरा,
अंधश्रद्धा याविरोधात कायदा हतबल होणे गैर असून संविधानाच्या कलम ५१-अ नुसार वैज्ञनिक
मूल्यांचा प्रचार व प्रसार होणे, धार्मिकतेचा अंगिकार वैज्ञानिक विचाराधारित असणे
आवश्यक आहे. मूलतः संवैधानिक मूल्यांचा स्वीकार हीच खरी आधुनिक धार्मिकता आहे.
स्तंभलेखक सॅबी
परेरा म्हणाले, मी अभिव्यक्तीस्वातंत्र्य उपभोगणारा लेखक आहे. तथापि, सध्या भावना
ही बाब खूपच संवेदनशील बनलेली आहे. त्यामुळे अभिव्यक्तीचा संकोच होऊ लागला आहे.
विनोद आणि उपहास त्याला बळी पडताहेत. राज्यघटनेचा वापर आपण कशा पद्धतीने करतो,
यावर तिचे भलेबुरेपण अवलंबून आहे.
प्रा. राहुल सरवटे
म्हणाले, भारतासारखा व्यामिश्र, व्यापक देश ब्रिटीशांकडून पराभूत होण्याचे कारण
दोन प्रकारे सांगितले जाते. एक म्हणजे आपल्या प्रथा, परंपरा, रुढींच्या
प्रभावामुळे हरलो आणि दुसरे म्हणजे आपण आपल्या प्रथा, परंपरा, रुढींपासून दुरावलो म्हणून
हरलो. या दोन उत्तरांमधील आंतरविसंगती दूर करण्याचे काम राज्यघटना करते. समता,
बंधुता, सामाजिक न्यायाच्या आधारे आधुनिक भारताची त्याच्या सांस्कृतिक इतिहासाच्या
समावेशासह बांधणी घटना करते. आपल्या शिक्षणाचे रुपांतर मूल्यामध्ये होईल, तेव्हा
खऱ्या अर्थाने देश सुशिक्षणाकडे वाटचाल करेल. राज्यघटना हे सामाजिक
नितीमत्तेबद्दलचे विधान आहे.
वर्गशिक्षण व
संविधान याबाबत बोलताना डॉ. गायत्री लेले म्हणाल्या, वर्गखोली ही लोकशाहीचा
पुरस्कार करणारी जागा आहे. शिक्षकांसाठी वर्गखोली हे सुरक्षितस्थळ आहे. विविध
मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी अधिक अर्थपूर्ण व खुलेपणाने चर्चा शक्य असते. संवाद
हा त्याचा पाया आहे आणि प्रतिसाद हा त्यातील कळीचा मुद्दा आहे. त्या प्रतिसादातही
पारदर्शकता ही महत्त्वाची बाब आहे. हा वर्गातील संवाद अधिकाधिक वृद्धिंगत होत जाणे
गरजेचे आहे.
कीर्तनकार सचिन पवार
म्हणाले, वारकरी संप्रदायामध्ये स्त्री-पुरूष संतांमधील संवाद हा समतेवर आधारित
होता. माणूस म्हणून समोरच्या व्यक्तीचे मूल्य मान्य करणे आणि त्यांच्या अभिव्यक्तीचा
सन्मान करणे हा सर्वसमावेशकतेचा गुण आहे. आज आपण राज्यघटनेच्या ‘आम्ही’ या मूल्यापासून दूर जात अधिकाधिक व्यक्तीकेंद्री होत
चाललो आहोत, हे थांबविले पाहिजे. संविधानाचा व संतविचाराचा मूल्यात्मक गाभा समान
आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
परिसंवादानंतर विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे मान्यवरांनी समाधानही केले.
पल्लवी जाधव यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment