Saturday, 12 November 2022

महाप्रचंड माहिती-विश्लेषणासाठी संख्याशास्त्राचा प्रभावी वापर आवश्यक: डॉ. प्रकाश पाटील

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करताना अमेरिकेतील मिसिसिपी स्टेट विद्यापीठातील प्रा. प्रकाश पाटील.

शिवाजी विद्यापीठात आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन करताना अमेरिकेतील मिसिसिपी स्टेट विद्यापीठातील प्रा. प्रकाश पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. सोमनाथ पवार, डॉ. के.एस. माधव राव, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. टी.व्ही. रामनाथन, डॉ. शशीभूषण महाडिक.

शिवाजी विद्यापीठात आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. सोमनाथ पवार, डॉ. के.एस. माधव राव, प्रा. प्रकाश पाटील, डॉ. टी.व्ही. रामनाथन, डॉ. शशीभूषण महाडिक.


शिवाजी विद्यापीठात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

कोल्हापूर, दि. १२ नोव्हेंबर: सध्याचे युग बिग डाटाचे आहे. या महाप्रचंड माहितीच्या विश्लेषणासाठी उपलब्ध समस्त संख्याशास्त्रीय पद्धतींचा प्रभावी वापर करण्यासाठी संख्याशास्त्रज्ञांनी अद्यावत माहितीसह सुसज्ज असायला हवे, असे प्रतिपादन अमेरिकेतील मिसिसिपी स्टेट विद्यापीठाच्या गणित व संख्याशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. प्रकाश पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने येथील संख्याशास्त्र अधिविभागाच्या वतीने नॉन-पेरामॅट्रिक स्टॅटिस्टिकल मेथड्स या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

डॉ. प्रकाश पाटील म्हणाले, सद्यस्थितीत कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात डाटा निर्माण होतो आहे. त्याची गती आणि व्याप्ती अफाट आहे. त्यामुळे या बिग डाटाच्या विश्लेषणाच्या प्रचलित पद्धतींमध्येही त्यानुरुप बदल होणे आणि करणे अनिवार्य आहे. माहितीचे सुलभीकरण करण्यासाठी ही अत्यावश्यक बाब आहे. संख्याशास्त्रात डाटा विश्लेषणाची अनेक साधने व पद्धती प्रचलित आहेत. अप्रचालिय पद्धती (नॉन-पॅरामेट्रिक मेथड्स) त्यामध्ये सध्या अधिक प्रभावी ठरत आहेत. पण, त्यांचा वापर योग्य दिशेने प्रभावीरित्या कसा करावयाचा यासाठी विद्यार्थी-संशोधकांनी योग्य प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी दक्षिण आफ्रिकेतील बोट्सवाना विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक तथा मुंबई एनएमआयएमएस अभिमत विद्यापीठाच्या सुनंदन दिवाटिया स्कूल ऑफ सायन्सचे डॉ. के.एस. माधव राव म्हणाले, गेली ५० वर्षांहून अधिक काळ ज्या विषयाचे अध्यापन आणि संशोधन मी करीत आहे, त्यामधील आंतरराष्ट्रीय परिषद शिवाजी विद्यापीठाने आयोजित केली, याचा आनंद वाटतो. संख्याशास्त्रातील अप्रचालिय पद्धती या प्रचालिय पद्धतींच्या तुलनेत विविध क्षेत्रांत अधिक मोठ्या प्रमाणात आणि अधिक सहजतेने वापरल्या जात आहेत. वैद्यकीय, उद्योग-व्यवसाय, सामाजिक संस्था अशी अनेक क्षेत्रे सांख्यिकीय विश्लेषणासाठी अप्रचालिय पद्धतींचा वापर करीत आहेत. त्यामुळे या विषयामधील अधिकाधिक संशोधनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी या विषयाकडे गांभिर्याने पाहण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाचे प्राध्यापक डॉ. टी.व्ही. रामनाथन म्हणाले, सध्या एकूणच जग हे सामान्य आणि एकरेषीय बाबींपासून दूर सरकण्याच्या प्रयत्नात आहे. किंबहुना, बऱ्याच अंशी ते सरकलेले आहे. असामान्य आणि अरेषीय व नैकरेषीय बाबींच्या शक्यतांचा हा कालखंड आहे. या काळात अप्रचालिय सांख्यिकीय पद्धतींना मोठे महत्त्व येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्याची, समजून घेण्याची आणि त्यावर काम करण्याची हीच योग्य वेळ आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांना संख्याशास्त्रात उत्तम कामगिरी  करावयाची असेल, तर गणितातही आपली गती उत्तम असायला हवी, याचे भान सदैव बाळगावे. तसेच, अप्रचालिय संख्याशास्त्रीय पद्धती हा अत्यंत रोचक विषय असून या परिषदेत सहभागी विद्यार्थी, संशोधकांनी त्याच्या सर्व बाजू समजून घेण्यावर भर द्यावा. परिषदेस उपस्थित सर्व मान्यवर तज्ज्ञांनी या विषयाच्या संशोधनात हयात घालविलेली आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ. सोमनाथ पवार यांनी परिषदेविषयी माहिती दिली. डॉ. संतोष सुतार यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. एस.व्ही. राजगुरू यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment