Tuesday, 29 November 2022

ढासळत्या नैतिकतेचे देशासमोर आव्हान: प्राचार्य राजेंद्र कुंभार

 

शिवाजी विद्यापीठात प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेत बोलताना डॉ. राजेंद्र कुंभार. मंचावर (डावीकडून) डॉ. जगन कराडे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि सुचिता कोरगावकर.

कोल्हापूर, दि. २९ नोव्हेंबर: ‘ढासळती सामाजिक व राजकीय नैतिकता हे आजच्या अमृतमहोत्सवी भारतासमोरील प्रमुख आव्हान आहे. शिक्षण, महागाई, धर्मवाद आणि जातीवाद इत्यादी समस्यांची सोडवणूक होण्यासाठी शैक्षणिक सुधारणा घडून येणे आवश्यक आहे. त्यासाठी  शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वप्नांची नजर दिली पाहिजे,’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते, तर सुचिता कोरगावकर प्रमुख उपस्थित होत्या.

डॉ. कुंभार म्हणाले, शिक्षण व्यवस्थेसमोर आज अनेक समस्या आहेत. ज्ञान आणि मती यातील भेद ओळखून त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे. आजचे शिक्षक विद्यार्थ्यांना स्वप्नांची नजर देण्यात कमी पडत आहेत. शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. जागातील सर्व प्रश्न प्रेमाने सुटतात आणि बौद्ध विचार त्यासाठी मार्गदर्शक आहेत. तृष्णा आणि गरज यातील भेद आपणास ओळखता आला पाहिजे.

अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी संयम आणि सातत्य यांच्या आधारे आपल्यातील क्षमता वृद्धिंगत केल्या पाहिजेत. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी कष्ट केले पाहिजे.

या व्याख्यानमालेचे आयोजन प्रभाकरपंत कोरगावकर ट्रस्ट यांनी विद्यापीठास दिलेल्या देणगीतून केले जाते. ट्रस्टच्या संचालक सुचिता कोरगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. जगन कराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले. अभिजित पाटील शरद पाटील, श्रीरंग बेलेवडे, श्रीधर साळोखे  आदींनी संयोजन केले.

No comments:

Post a Comment