शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण केंद्र |
कोल्हापूर, दि. १७ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राकडील सर्व अभ्यासक्रमांना नवी दिल्ली येथील विद्यापीठ
अनुदान आयोग (युजीसी) यांच्याकडून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राकडील प्रवेश
प्रक्रियेस प्रारंभ करण्यात येत आहे. ही माहिती केंद्राचे संचालक डॉ. डी.के. मोरे
यांनी आज येथे दिली.
डॉ. मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, युजीसीकडून मान्यता मिळालेल्या बी.ए., बी.कॉम., एम.ए. भाषा (इंग्रजी, हिंदी, मराठी), एम.ए. सामाजिकशास्त्रे (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र), एम.कॉम., एम.एस्सी. (गणित), एम.बी.ए या पदवी व पदव्युत्तर विषयांची शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन असून कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांतील ८१ अभ्यास केंद्रांमध्ये विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, सैनिक, उद्योजक, शेतकरी, कामगार व बंदीजन आदी शिक्षणापासून वंचित घटकांना प्रवेश घेता येणार आहे. विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर Distance Education या लिंकवर प्रवेशाबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा. एमबीए अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया यापूर्वीच झालेली असून त्यामधील पात्र उमेदवारांना प्रवेश देण्याची कार्यवाही लवकरच होत आहे, याचीही नोंद घ्यावी.
सदरचा ऑनलाइन अर्ज भरणेपूर्वी विद्यार्थ्यांनी स्वतःचा युजर आयडी व पासवर्ड (User ID and Password) तयार करुन नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यार्थ्याने निवडलेले
अभ्यासकेंद्र हेच शक्यतो परीक्षा केंद्र म्हणून दिले जाते, याचीही विद्यार्थ्यांनी
नोंद घ्यावी. प्रथम वर्षाचा ऑनलाइन अर्ज नव्याने सादर करताना ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी विद्यार्थ्यानी
बॅंकेची कागदपत्रे (पासबुक, डेबिट/क्रेडिट कार्ड, युपीआय/ खाते क्रमांक/ आयएफएससी कोड इ.) सोबत ठेवणे गरजेचे आहे. संपूर्ण ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत अभ्यासकेंद्रावर जमा करण्याची मुदत
शुल्कासह दि. १५ ऑक्टोबरपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी
विद्यार्थ्यांनी ०२३१-२६०९४५१ व २६०९४५२ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.
सदर मान्यता मिळणेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.
प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे
संचालक डॉ. अजितसिंह जाधव आणि विद्यापीठाची विविध अधिकार मंडळे यांचे सहकार्य
लाभले.
प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के
दूरस्थ आणि
ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्याकडून आता मान्यता मिळाली असल्याने ज्या व्यक्ती व्यवसाय, नोकरी व अन्य कारणांमुळे प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत, अगर काही कारणांनी ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिलेले आहे, अशा व्यक्तींनी सदर अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले आहे.
विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन
शिक्षण केंद्राची वैशिष्ट्ये-
- १२ प्रोग्राम्स अंतर्गत विविध अभ्यासक्रम
- दर्जेदार स्वयंअध्ययन साहित्य उपलब्ध
- २ विभागीय केंद्रे, ८१ अभ्यासकेंद्रे, दुर्गम भागांचाही समावेश
- अभ्यासकेंद्रांमध्ये संपर्कसत्रांचे आयोजन
- विद्यार्थ्यांना विषयतज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन
- ऑनलाईन
व्हिडिओ मार्गदर्शन सत्रांचाही समावेश
- विद्यार्थ्यांना नेट/सेट तसेच स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन
Very good
ReplyDelete