Friday, 5 August 2022

साहित्यातील लिंगभेदाचे राजकारण नाहीसे झाल्यासच मानवमुक्तीचा स्वर मोठा: प्रा. अविनाश सप्रे

 

शिवाजी विद्यापीठात ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके आणि कवयित्री दिशा पिंकी शेख यांना आज काळसेकर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी डहाके व शेख यांच्यासमवेत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, प्रा. अविनाश सप्रे, सुप्रिया काळसेकर, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. विलास शिंदे आणि डॉ. नंदकुमार मोरे.

प्रा. अविनाश सप्रे




शिवाजी विद्यापीठात डहाके, शेख यांना काळसेकर पुरस्कार प्रदान

कोल्हापूर, दि. ३ ऑगस्ट: मानवमुक्तीचा स्वर मोठा होण्यासाठी साहित्यातील आणि समाजातील लिंगभेदाचे राजकारण नाहीसे करण्याची तीव्र गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सतीश काळसेकर काव्य पुरस्कार-२०२२ आणि ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार-२०२२ यांच्या प्रदान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

यावेळी प्रा. सप्रे यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी व समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना सतीश काळसेकर काव्य पुरस्कार, तर दिशा पिंकी शेख यांना ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. अनुक्रमे २१ हजार रुपये रोख आणि दहा हजार रुपये रोख तसेच शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि ग्रंथभेट असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.

यावेळी प्रा. सप्रे यांनी आपल्या भाषणात डहाके आणि शेख यांच्या साहित्याचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले, मी कवी आहे, म्हणून मी आहे, असे म्हणणारा ओतप्रोत कवी माणूस म्हणजे डहाके आहेत. साठोत्तरी कालखंडातली मराठीतील श्रेष्ठ दर्जाची कविता त्यांची आहे. त्याचप्रमाणे घडणाऱ्या-बिघडणाऱ्या वर्तमानाचे दर्शन घडविणारीही त्यांची कविता आहे. मूलभूत तात्त्विकतेची मांडणी करणारा सर्जनशील कादंबरीकार आणि चिंतनशील ललितलेखकही ते आहेत. मराठी साहित्याकडे पाहण्याची व्यापक दृष्टी देणारे विचारवंतही ते आहेत. साहित्यातील सृजनाच्या अनेकविध शक्यता लक्षात घेऊन व्यक्त होणारा सर्वव्यापी, श्रेष्ठ प्रतिभावंत म्हणून त्यांनी मराठीत त्यांचे स्थान अधोरेखित केले आहे. दिशा पिंकी शेख या तर भोवतालातील सारी कुरूपता अधोरेखित करणाऱ्या कवी आहेत. त्यांची कविता व्यथा, वेदना, कलह, संघर्ष यांची तर आहेच, पण त्याहूनही ती माणुसकीची कविता आहे, हे महत्त्वाचे. खांदा टेकण्याचे ठिकाण म्हणजे शब्द अशी भावना असणाऱ्या शेख यांच्या त्या शब्दांची कविता कुरूपमध्ये आहे. समग्र प्रस्थापित स्वरुपाचे विध्वंसन त्यामध्ये आहे.


सत्काराला उत्तर देताना वसंत आबाजी डहाके यांनी सतीश काळसेकर यांच्या नावे पुरस्कार मिळण्याचा हा क्षण एकाच वेळी आनंददायी आणि वेदनादायकही असल्याचे बोलून दाखविले. सतीश काळसेकर यांनी थोडकीच पण लक्षवेधी, चिरस्मरणीय कविता लिहीली. त्याचप्रमाणे कवितेची दखल घ्यावयास लावणारी समीक्षाही त्यांनी लिहीली, असे गौरवोद्गार काढले. डहाके म्हणाले, अनियतकालिक चळवळीचा कालखंड हा असंतुष्ट आणि वेगळे, सुंदर जग उभा करू पाहणाऱ्या तरुणांचा होता. त्यांच्या अभिव्यक्तीमध्ये एक निराळा उद्गार होता, त्यामध्ये काळसेकर अग्रणी होते. त्रास झाला, पण मजा आली, हा त्याच्या जगण्याचा मूलमंत्र होता. चळवळींत रस असणारा आणि योग्य राजकीय भान असणारा हा कवी होता. माझं मला वाचू द्या, या त्यांच्या सांगण्यामध्ये मला माझं लिहू द्या, असा सूर होता. त्यांच्या साहित्यावर माणुसकीचा ठसा होता. वाङ्मय ही जगण्याची शिदोरी आहे. त्याला विसरणे म्हणजे जगणेच विसरणे आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी दिशा पिंकी शेख यांनी विद्यापीठाकडून मिळालेला हा पहिलाच अधिकृत पुरस्कार आहे, असे सांगितले. त्या म्हणाल्या, कोल्हापूरशी माझे जुने नाते आहे. लढण्याचे बळ देणारी ही भूमी आहे. लढ्याच्या प्रेरणा आणि लोकशाहीची पाळेमुळे याच मातीत सापडतात. या भूमीतील विद्यापीठाने दिलेल्या या पुरस्कारामुळे शब्दाची किंमत वाढली आहे. माझ्या समुदायातील ज्या भगिनी कधीच व्यक्त होऊ शकल्या नाहीत, त्यांच्या डायऱ्या यापुढे आता लिहीण्यासाठी उघडल्या जातील. आम्ही लिहीण्याचा प्रयत्न करतो आहोत. आमच्या लेखण्यांना सामर्थ्य देण्याचे काम विद्यापीठांनी आणि शिक्षण व्यवस्थेने करावे. विषमतेचे डोस आपण मुलांना लहानपणापासून देतो. आपल्यातला बंधू-भगिनीभाव आता मित्रत्वाच्या, समतेच्या पातळीवर आणण्याची गरज आहे. जेव्हा पोट भरलेलं असते, तेव्हाच पावसातल्या मातीचा सुगंध घ्यावासा वाटत असतो. पोटं भरलेल्या साहित्यिकांच्या रुपकांची छाप उपाशीपोटी लिहीणाऱ्यांच्या साहित्यावर उमटत राहिली आहे. हे वास्तव बदलण्याची गरज आहे.

आता हरणे लिहू लागलीत...

हरणे लिहीत नव्हती, तोपर्यंत शिकाऱ्यांच्या शौर्यगाथा लिहील्या जात राहिल्या. आता हरणांनी हाती लेखणी घेतली आहे. त्या हरणाचे निरागसत्व आणि शिकाऱ्यांचा हिंस्त्रपणा दाखविणाऱ्या वास्तववादी कथा आता सामोऱ्या येतील, असेही दिशा पिंकी शेख म्हणाल्या.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी काळसेकर, हडाके आणि शेख यांच्या लेखनातील वाचनाचा आणि वास्तववादी मांडणीचा समान धागा अधोरेखित केला. केवळ आनंदीआनंद म्हणजे साहित्य नव्हे, तर दुःख, वेदना आणि आक्रंदन म्हणजेही साहित्यच असते, हे या साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून समाजासमोर आणलेले ठळक वास्तव आहे. ते विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. चांगले लेखक होणे जमले नाही तरी चांगले वाचक होण्याचा प्रयत्न जरुर करावा, असे आवाहनही कुलगुरूंनी केले.

यावेळी मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी पुरस्काराच्या अनुषंगाने भूमिका स्पष्ट केली. मानसी काळसेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. यावेळी सुप्रिया काळसेकर यांच्यासह काळसेकर कुटुंबिउपस्थित होते.

कार्यक्रमास वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.जी. कुलकर्णी, डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रभा गणोरकर, डॉ. उदय नारकर, डॉ. माया पंडित, डॉ. व्यंकाप्पा भोसले, डॉ. अरुण शिंदे, डॉ. रघुनाथ कडाकणे, तनुजा शिपूरकर यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment