डॉ. आर.के. कामत |
कोल्हापूर, दि. ३ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान
विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. रजनीश कमलाकर कामत यांची आज मुंबई येथील डॉ. होमी भाभा
राज्य विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुलपती भगतसिंह
कोश्यारी यांनी आज सायंकाळी ही नियुक्ती घोषित केली. सदरची नियुक्ती पाच वर्षांच्या
कालावधीसाठी आहे.
कुलगुरु
नियुक्तीसाठी राज्यपालांनी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती
यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. पुणे येथील भारतीय
माहिती तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. अनुपम शुक्ल व शासनाचे प्रधान सचिव ओम
प्रकाश गुप्ता समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती
घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ कामत यांची निवड केली.
डॉ. आर. के. तथा रजनीश कामत शिवाजी विद्यापीठात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्र अधिविभागांचे वरिष्ठ प्राध्यापक आणि अधिविभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेल्या २५ वर्षांत त्यांनी गोवा विद्यापीठ, पणजी पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर (पूर्वीचे
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अशा विविध उच्चशिक्षण संस्थांच्या माध्यमातून उच्चशिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या इनोव्हेशन अँड इनक्युबेशन लिन्केजिसचे संचालक, तंत्रज्ञान विभागाचे संचालक, इलेक्ट्रॉनिक्स तसेच संगणकशास्त्र अधिविभागांचे प्रमुख, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाचे प्रभारी ग्रंथपाल, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या करियर कौन्सिलिंग कक्षाचे समन्वयक आदी पदांचा
समावेश आहे.
डॉ. कामत यांचे नामांकित जर्नल्समध्ये दीडशेहून अधिक शोधनिबंध प्रकाशित आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील १६ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली
१८ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संशोधन पूर्ण
केले आहे. शिवाजी विद्यापीठात भारत सरकारच्या निधीतून पंडित मदन मोहन मालवीय या योजनेअंतर्गत सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना करण्याच्या कामी त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अंतर्गत गुणवत्ता हमी
कक्षाचे संचालक म्हणून काम करताना शिवाजी विद्यापीठास ‘नॅक’चे
‘A++’ मानांकन प्राप्त
करण्यामध्ये त्यांची कळीची भूमिका राहिली. गेल्या पाच वर्षांत त्यांना १० कोटी रुपयांचे संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये युरोपियन युनियनने मंजूर केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचा समावेश आहे. डॉ. कामत यांनी युरोप आणि दक्षिण पूर्व आशियातील अनेक देशांमध्ये संशोधनाच्या निमित्ताने प्रवास केला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने त्यांना यंग सायंटिस्ट पुरस्काराने सन्मानित केले आहे. ते शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद,
अधिसभा आणि इतर अनेक संस्थांचे सदस्य आहेत. त्यांनी महाराष्ट्रात परीक्षा सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी राजेश अग्रवाल समितीवर तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य गुणवत्ता परिषदेवरही काम केले आहे. शिवाजी विध्यापीठाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे. विज्ञान भारतीच्या माध्यमातून विज्ञानाच्या प्रचार व प्रसाराची जबाबदारी ते पार पाडत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना ‘द इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स’चा फेलो म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. ते भारतातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या प्रशासकीय मंडळांवर युजीसी-नामांकित सदस्य आहेत. लर्निंग आऊटकम अभ्यासक्रम प्रणालीमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
डॉ. होमी भाभा समूह
विद्यापीठाविषयी:
महाराष्ट्र शासनाने डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी ही इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबईसह क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणून स्थापन केली आहे. एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई; सिडनहॅम कॉलेज, मुंबई आणि माध्यमिक प्रशिक्षण महाविद्यालय, मुंबई ही या विद्यापीठाची घटक महाविद्यालये आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबई ही या विद्यापीठाची प्रमुख संस्था आहे. सर्व घटक महाविद्यालये ९९ वर्षांहून अधिक जुनी आहेत. त्यात सर्वात तरुण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना १९२० मधील आहे. सर्वात जुने असणारे एल्फिन्स्टन कॉलेज १८३५ मध्ये स्थापन झाले आहे. महाराष्ट्र राज्यातील हे अशा प्रकारचे पहिले राज्य विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियाना (RUSA) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ते स्थापन करण्यात आले आहे.
उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात
अधिक गुणवत्तापूर्ण योगदान देण्याची संधी: डॉ. आर.के. कामत
डॉ. होमी भाभा
राज्य समूह विद्यापीठाच्या माध्यमातून उच्चशिक्षणाच्या क्षेत्राची गुणवत्ता
वृद्धिंगत करण्याची संधी दिल्याबद्दल महामहीम कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचे मनःपूर्वक
आभार मानतो, अशी प्रतिक्रिया डॉ. आर.के. कामत यांनी व्यक्त केली.
हा आयुष्यातील एक
अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगून ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
नावाने स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठाचे माझ्या प्रगतीमध्ये बहुमोल योगदान
आहे. त्यांचे स्मरण करून नवी जबाबदारी स्वीकारीत आहे. या विद्यापीठाचे विद्यमान
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह ज्यांच्यासमवेत
काम केले, त्या सर्वच कुलगुरूंप्रती या प्रसंगी कृतज्ञता व्यक्त करतो. माझे
विद्यापीठातील सर्व सहकारी, शिक्षक, विद्यार्थी यांनाही धन्यवाद देतो. उच्चशिक्षणाच्या
क्षेत्रात भरीव योगदान देण्यासाठी कुलगुरू पदाच्या कारकीर्दीत प्रयत्नशील राहू, असेही
ते म्हणाले.
शिवाजी
विद्यापीठासाठी अभिमानास्पद क्षण: कुलगुरू डॉ. शिर्के
डॉ. आर.के. कामत
यांची डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड होणे ही एक सहकारी म्हणून व्यक्तीगत माझ्यासाठी तर अत्यंत आनंदाची बाब आहेच, त्याचबरोबर समस्त शिवाजी
विद्यापीठ परिवारासाठी हा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे. डॉ. कामत यांची उच्चशिक्षण
क्षेत्रातील विशेषतः माहिती तंत्रज्ञानाधारित संवाद व शिक्षण या क्षेत्रातील
कामगिरी उच्च दर्जाची आहे. त्यांच्या अनुभवाचा डॉ. होमी भाभा विद्यापीठाच्या
प्रगतीमध्ये निश्चितपणे लाभ होईल, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
No comments:
Post a Comment